Friday, June 9, 2023
घर मानिनी Diary सरोगसीची फॅशन!

सरोगसीची फॅशन!

Subscribe

सध्या देशभरात दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि तिचा पती विग्नेश शिवन आणि सरोगसी यावर जोरदार चर्चा सुरू आहे. ९ जून २०२२ ला या दोघांनी चेन्नईत लग्न केलं. लग्नाच्या अवघ्या चार महिन्यानंतरच नयनतारा आणि विग्नेश जुळ्या मुलांचे अम्मा अप्पा झाल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. निर्सग नियमाप्रमाणे नऊ महिन्यानंतर मुलं जन्माला येतं, मग असं असताना या सेलिब्रिटी कपलने असा काय करिष्मा केला की त्यांना लग्नाच्या चार महिन्यानंतरच दोन जुळ्या मुलांचे पालक होण्याचे भाग्य लाभले. यावर गल्लीपासून दिल्लीपर्यंत खरपूस चर्चा रंगल्यात. या चर्चा आता सरोगसीवर येऊन घुटमळत आहेत. यामुळे या सेलिब्रिटीज कपलच्या अम्मा अप्पा झाल्याच्या आनंदावर पुरत विरजण पडले आहे. तर सरोगसीचे नियम -कायदे पायदळी तुडवत हे सेलिब्रिटीज हवे तेव्हा बाळाचे आई बाबा होऊ शकतात ही फॅशन सरोगसीची झाल्याचंही समोर येऊ लागले आहे.

सरोगसीच्या मुद्यावरून दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेशला ट्रोल केले गेले. तामिळनाडू सरकारनेही या सरोगसीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत शंका व्यक्त केली. त्यावर विग्नेशने प्रत्येक गोष्ट योग्य वेळी येते असं सूचक ट्विट करत विषयावरच पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पण मुलं सरोगसीमधून झाली की नयनताराने या दोन बाळांना जन्म दिला याबद्दल तो काहीही बोललेला नाही. यामुळे विग्नेशचे हे ट्विट वेळ मारून नेण्यासाठी किंवा सरोगसी कायद्याच्या कचाट्यात सापडू नये आणि चर्चा थांबवण्यासाठी केल्याचे बोलले जात आहे. पण महत्वाचे म्हणजे या जोडप्याने याबद्दल सविस्तर स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे. बॉलीवूड स्टार शाहरुख खान, आमिर खान, तुषार कपूर, करण जोहर हे वयाच्या ४० नंतरच सरोगसीमधून पिता झाले तर एकता कपूर, शिल्पा शेट्टी आणि देसी गर्ल प्रियंका चोप्रा ही देखील सरोगसीमधून आई झाल्यानंतर चर्चेत आली होती.

 गेल्या काही वर्षांपासून प्रामुख्याने बॉलीवूड आणि इतर धनाढ्य सेलिब्रिटीज सरोगसीचा सरास वापर करत आहेत. यात अनेकवेळा सरोगसीसाठी करण्यात आलेले कायदे आणि नियम, धाब्यावर बसवून पैशाच्या जोरावर एजंटांच्या माध्यमातून हे पालकत्व मिळवण्याचा बाजारच देशात सुरू झाला आहे. याचपार्श्वभूमीवर तत्कालीन केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी सेलिब्रिटीजच्या या सरोगसी फॅडवर कडाडून टीका केली होती. सेलिब्रिटीजसाठी सरोगसी हा फॅशन ट्रेंड झाल्याचे त्यांनी म्हटले होते. विशेष म्हणजे ज्या सेलिब्रिटीजला आधीच दोन मोठी मुलं आहेत त्यांनी केवळ फॅशनसाठी सरोगसीतून तिसर्‍या अपत्याला जन्माला घालण्यावर स्वराज यांनी आक्षेप व्यक्त केला होता.

- Advertisement -

आता सेलिब्रिटीजबरोबरच उच्च मध्यम वर्गीयांमध्येही सरोगसीचा ट्रेंड वाढत आहे. यात प्रामुख्याने गरीब घऱातील महिला सरोगसीसाठी हेरल्या जातात. त्यासाठी त्यांना लाखो रुपये देण्यात येत आहेत. पण अनेकवेळा त्यासाठी कायद्याचे उल्लंघन करण्याबरोबरच पैशांसाठी सरोगेट होणार्‍या महिलाही आपल्या आरोग्यही धोक्यात आले आहे. पण असे असले तरी आजही देशात सरोगसी मोठ्या प्रमाणावर होत आहे. उत्पन्नाचे पर्यायी मार्ग म्हणून लॉकडाऊनमध्ये तर सुशिक्षित महिलाही कमर्शियल सरोगसीकडे वळू लागल्याचे पाहायला मिळाले. आपलं गर्भाशय भाड्याने देत त्या मोबदल्यात लाखो रुपये कमावणार्‍या महिलांचही प्रमाणही आता वाढू लागलं आहे. यामुळे मागणी आणि पुरवठा याच्या गणितावर उभ्या राहणार्‍या कुठल्याही व्यवसायाप्रमाणेच सरोगसीचा बिझनेसही आता गावागावात हातपाय पसरू लागला आहे. यामुळे बर्‍याचवेळा डॉक्टरांच्या मदतीने सरोगसी कायद्याची डोकेदुखी नको म्हणून ग्रामीण भागातल्या सरोगेट आईचा शोध घेऊन कुठलाही गाजावाजा न करता तिचं गर्भाशय भाड्याने घेऊन पालक होत आहेत. यासाठी आपल्या देशात सरोगसीचं कल्चर कसं विकसत झालं ते पाहायला हवं.

आपल्या देशात २००२ साली सरोगसीला कायद्याने मान्यता मिळाली. आजच्या घडीला सरोगसीच्या व्यापारातून देशात वर्षाला ३ हजार कोटी रुपयाहून जास्त आर्थिक उलाढाल होत आहे. यामुळे चार महिन्यात जन्माला आलेल्या नयनताराच्या बाळांच्या निमित्ताने पुन्हा एकदा सरोगसी आणि त्याच्या कायद्यांना धाब्यावर बसवणार्‍या सेलिब्रिटीज चर्चेत आल्या आहेत.

- Advertisement -

गुजरातमधील आनंद शहर हे देशातील सर्वात मोठे सरोगसी क्रेंद्र बनले आहे. अमूल दूधासाठी ओळखल्या जाणार्‍या या शहराला बेबी फॅक्टरी म्हणूनही ओळखले जाते. आनंद शहराबरोबरच देशातील अनेक शहरांमध्ये हजारो महिला आपले गर्भाशय भाड्याने देत सरोगसीद्वारे लाखो रुपये कमवत आहेत. आजच्या तारखेला देशात तीन हजाराहून अधिक फर्टीलिटी क्लिनिक आहेत. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात तर घरातील कर्त्या पुरुषाची नोकरी गेल्याने किंवा त्याचे निधन झाल्याने हजारो महिलांनी सरोगसीच्या माध्यमातून पैसे कमवत कुटुंबाला आधार दिला. विशेष म्हणजे यात फक्त गरीब किंवा अशिक्षित नाही तर उच्चशिक्षित महिलांचाही समावेश आहे. आनंद येथे २००३ साली डॉक्टर नयनतारा पटेल यांनी आकांक्षा रुग्णालयाची स्थापना केली. हे रुग्णालय देशातील पहिले व्यावसायिक सरोगसी केंद्र बनले. तेव्हापासून गरीब आणि गरजू घरातील महिलादेखील सरोगसी या व्यवसायाकडे वळल्या. त्यातून गलेलठ्ठ रक्कम त्या कमवत आहेत. यासाठी देशात अनेकांनी फर्टीलिटी क्लिनिक थाटले असून सरोगेट्सच्या शोधासाठी एजंटचा वापर करण्यात येत आहे.

यामुळे अशाच खासगी क्लिनिकच्या माध्यमातून सरोगेट्स मिळवण्याकडे धनाढ्यांचा ओढा आहे. या व्यवसायात गरजू महिलांची संख्या अधिक आहे. पण त्याचबरोबर त्यांची फसवणूक होण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. २०१४ पर्यंत भारतात मोठ्या प्रमाणावर सरोगसीसाठी परदेशातून जोडपी येत. परदेशात सरोगसीसाठी मोजाव्या लागणार्‍या पैशांच्या तुलनेत भारतात सरोगसीचा खर्च कमी हे त्यामागचे कारण होते. त्यासाठी एजंट या जोडप्याकडून बक्कळ रक्कम उकळायचे आणि सरोगेट आईच्या हातावर त्यातली निम्मी रक्कम ठेवून तिची बोळवण करायचे. २०१४ साली एका ऑस्ट्रेलियन जोडप्याने सरोगसीतून जन्माला आलेल्या जुळ्या मुलांपैकी एकाचा स्वीकार करण्यास नकार दिला. या घटनेचे संसदेत पडसाद उमटले. त्यानंतर १५ जुलै २०१९ मध्ये सरोगसी रेग्युलेशन बिल लोकसभेत सादर करण्यात आले. यात सरोगसी कायद्यात काही तरतुदी करण्यात आल्या. डिसेंबर २०२१ मध्ये ते बिल पास करण्यात आले. त्यानंतर २०२२ मध्ये राष्ट्रपतींनी त्यास मंजुरी दिली त्यानंतर सरोगसीच्या कायद्यात बदल करण्यात आले.

या कायद्यात पूर्वी भारतात होणार्‍या कर्मशियल म्हणजे व्यावसायिक सरोगसीवर बंदी घालण्यात आली आहे. कायद्यानुसार सरोगसी ही निस्वार्थपणे केली जायला हवी. यामुळे सरोगेट आईला पैसे देण्याची गरज नाही. तसेच विवाहित भारतीय जोडप्यालाच सरोगसीद्वारे आई वडील होण्याची मान्यता देण्यात आली. ज्या जोडप्याला वैद्यकीयदृष्ठ्या मूल होणे शक्य नाही अशांनाच सरोगसीद्वारे पालकत्व मिळवण्याची परवानगी देण्यात आली. जोडप्याच्या जवळील नातेवाईक महिलाच सरोगेट आई बनू शकतात. त्यासाठी सरोगेट आईचे वय हे २५ ते ३५ यादरम्यान असणे बंधनकारक करण्यात आले.

तसेच जी महिला विवाहित असेल किंवा विवाहित होती आणि तिलाही मूल असेल तीच महिला सरोगेट आई होऊ शकते असेही कायद्यात स्पष्ट करण्यात आले आहे. अविवाहित महिला सरोगेट आई होऊ शकत नाही असेही कायद्याने सांगितले आहे. त्याचबरोबर सरोगेट होणारी महिला एकदाच सरोगसी करू शकते. तसेच सरोगसीसाठी लिव्ह ईनमध्ये राहणार्‍या कपल्सला परवानगी नाही असेही कायद्याने स्पष्ट केले आहे. ज्या जोडप्याला सरोगसीद्वारे आई-बाबा व्हायचे आहे. त्यातील पित्याचे वय २३ ते ५० वर्ष आणि पत्नीचे वय २५ ते ५५ वर्ष असावे असे सरोगसी कायद्याने स्पष्ट केले आहे. समलैंगिक जोडप्यांनाही सरोगसीसाठी मान्यता देण्यात आलेली नाही.

मात्र या सर्व कायद्यांचे उल्लंघन करत सेलिब्रिटी आपले आई-वडील होण्याचे स्वप्न पूर्ण करत आहेत. नयनतारा आणि विग्नेशने सरोगसीचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे लग्नही झालेले नव्हते. तर ते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. यावर्षी जून महिन्यात त्यांचे लग्न झाले, मग असे असताना ऑक्टोबरमध्ये ते जुळ्या मुलांचे आई-बाबा झाले आहेत. यामुळे या सेलिब्रिटी कपल्सने कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप होत आहे. लिव्ह ईनमध्ये राहत असतानाच त्यांनी सरोगसी करत सरोगसी कायद्याचे उल्लंघन केले. त्यासाठी सरोगसी कायद्यानुसार अशांना ५ वर्षांचा तुरुंगवास आणि दंड ठोठावण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली.

गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात सेलिब्रिटीजकडून आणि श्रीमंतांकडून या नियम आणि कायद्यांना पैशांच्या जोरावर हरताळ फासण्यात येत आहे. बॉलीवूडच्या अभिनेत्री, सेलिब्रिटीज केवळ सौंदय ढळू नये याजबरोबर प्रसव वेदनांपासून बचाव व्हावा यासाठी सरोगसीद्वारे मूल मिळवू लागले आहेत. यासाठी गल्ल्यागल्ल्यात सुरू झालेले आयवीएफ सेंटर त्यांची मदत करत असल्याचे समोर आले आहे. गेल्या काही वर्षात बॉलीवूडमध्ये अनेक स्टार्स सरोगसीद्वारे आई किंवा बाबा झाल्याचे पाहायला मिळाले. यात तुषार कपूर, एकता कपूर आणि करण जोहर हे सेलिब्रिटीज सरोगसीद्वारे मुलांचे पालक झाले आहेत. पण विशेष म्हणजे हे तिघेही अविवाहित आहेत. तर शाहरुख खान आणि आमिर खान सरोगसीद्वारे तिसर्‍यांदा पिता झालेत.

खरं तर तज्ज्ञ सांगतात की मुलं होण्याचं आणि त्यांना वाढवण्याचं एक ठऱाविक वय असतं. जे मुलांच्या पुढील जडणघडणीसाठी त्यांचे पालकांबरोबरचे नातेसंबंध सुदृढ राहण्यासाठी आवश्यक असते. पालकांचं वाढणारं वय आणि मुलांचं वय यात तारतम्य असायला हवं. नाहीतर आई वडील आजी आजोबांच्या वयाचे आणि मुलगा नातवाच्या. यातून निर्माण होणारा जनरेशन गॅप दोघांच्याही दृष्टीने पुढे त्रासदायक ठरतो. म्हणूनच सरोगसी कायद्यात सरोगसी घेणार्‍या पालकांसाठी वयाची मर्यादा घालण्यात आली आहे. पण गेल्या वर्षात सरोगसीतून तिसर्‍यांदा बाप झालेल्या सेलिब्रिटीजकडून त्याचे पालन होताना दिसत नाही. उलट, बाजारातून जसे सहज चणे फुटाणे घ्यावे तसा सरोगसीचा वापर धनाढ्यांकडून फॅशनसारखाच केला जात आहे. ते कधीही आई-बाप होत आहेत.

तर दुसरीकडे शारीरिकदृष्ठ्या निरोगी असलेले कपल्स आपलं तारुण्य सौंदर्य टिकवून राहावं प्रसूती वेदना, प्रसूतीनंतर स्त्रीच्या शरीरात होणार्‍या बदलांमुळे आपलं करियर धोक्यात येऊ नये यासाठी अनेक तंदुरुस्त जोडपी सरोगसीच्या माध्यमातून पालक होत आहेत. कायद्याच्या पळवाटा त्यांना माहीत असल्यानेच आज नयनतारासारखी अभिनेत्री चार महिन्यात जुळ्यांची आई झाल्याचे डंके की चोट पे सांगते तर तिचा पती विग्नेश प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ लागतो असा उपदेशाचा डोस ट्विटमधून लोकांना पाजत गप्प राहण्याचा सल्ला देतो. अशा पैशाच्या जोरावर कायद्याला आव्हान देणार्‍या धनाढ्यांसाठी कोणता कायदा राबवला जातो याकडे सगळ्यांचेच लक्ष आहे. तूर्तास तरी तेरी भी चूप आणि मेरी भी चूप या अवस्थेत हे दाम्पत्य आहे. यामुळे ज्या उद्देशाने सरोगसीला देशात मान्यता देण्यात आली आहे त्याला या अशा व्यक्तींकडून हरताळ फासला जात असेल तर देशात येत्या काही वर्षात लग्नाच्या महिन्याभऱानंतर आई-बाप झाल्याची गुड न्यूज देणार्‍यांचा आकडा वाढतच जाईल. यामुळे सरकारने याकडे गांभीर्याने पाहणे अपेक्षित आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -

Manini