Friday, May 3, 2024
घरमानिनीJoint Pain- पुरुषांपेक्षा महिलांना का असतो गुडघेदुखीचा सर्वाधिक त्रास ?

Joint Pain- पुरुषांपेक्षा महिलांना का असतो गुडघेदुखीचा सर्वाधिक त्रास ?

Subscribe

पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना सांधेदुखीची समस्या जास्त असते. यास अनेक कारणे जरी असली तरी प्राथमिक कारण ही चुकीची जीवनशैली, खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा आणि कमी शारिरीक हालचाल ही आहेत. असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हल्लीच्या आधुनिक जीवनशैलीनुसार नोकरी करणाऱ्या महिला किंवा गृहिणी असलेल्या महिलांच्या घरीही धुणी भांडी करण्यासाठी कामवाली असते. त्यामुळे महिलांचे घरात कामानिमित्त उठबस करणे, वाकणे, जमिनीवर बसणे अशी शारिरीक हालचाल होत नाही. यामुळे महिलांना सांधेदुखीचा त्रास पुरुषांच्या तुलनेने लवकर सुरू होतो. यात प्रामुख्याने गुडघेदुखीचा त्रास महिलांमध्ये तीव्र असतो.

स्नायू लवचिक होण्यासाठी शरीराला आवश्यक व्यायाम किंवा हालचाल होत नसल्याने स्नायू कडक होणे आणि सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. त्यातही महिलांची शारीरिक रचना अशी असते की त्यांच्या सांध्याच्या अधिक हालचालींसोबतच त्यांचे अस्थिबंधन देखील अधिक लवचिक असतात, ज्यामुळे त्या त्यांच्या गुडघ्यांच्या अधिक हालचाली करतात. त्यामुळे वेदनांचा धोका वाढतो. इस्ट्रोजेनची पातळी कमी झाल्यामुळे गुडघ्याच्या सांध्यांना आधार देणाऱ्या कूशनिंग कार्टिलेजवर परिणाम होतो.

- Advertisement -

 

- Advertisement -

पुरुषांपेक्षा महिलांना लठ्ठपणाचा धोकाही जास्त असतो, त्यामुळे दाब पडून गुडघे खराब होतात. वाढत्या वजनामुळे गुडघ्यांवर अधिक दबाव येतो. तुमचे वजन तुमच्या गुडघ्यांवर पाचपट जास्त दबाव टाकेल. जर तुमचे वजन सामान्यपेक्षा 5 किलो जास्त असेल तर गुडघ्यांवर 25 किलो जास्त दबाव येतो.

दुखण्याकडे दुर्लक्ष केल्याने गुडघेदुखीचा धोकाही वाढतो. गुडघ्यांमध्ये सतत दुखत असेल, सूज येत असेल किंवा त्यांना वाकताना त्रास होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास गुडघ्याला इजा होऊ शकते. ऑस्टियोआर्थरायटिस रिसर्च सोसायटी इंटरनॅशनलच्या मते, गुडघेदुखी एक वर्षापेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास, ते सहसा ऑस्टियोआर्थराइटिसमुळे होते.

गुडघ्याला दुखापत झाल्यास त्यावर ताबडतोब उपचार करावा. गुडघ्याचे अस्थिबंधन ताणणे किंवा तुटणे यामुळे देखील गुडघ्याचा त्रास होऊ शकतो. शिवाय अति व्यायामही तुमच्या गुडघ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. जास्त व्यायाम आणि धावण्यामुळे गुडघ्यावर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे त्यांचे नुकसान होण्याचा धोका वाढतो. महिलांमध्ये वयाच्या ४० नंतर वेगाने हार्मेान्स बदलतात. त्यामुळे त्यांची हाडेही लवकर कमकुवत होतात आणि सांधे खराब होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे शरीराचे जास्त वजन गुडघ्यांवर खूप दबाव आणते. त्यामुळे गुडघ्यांचे आरोग्य राखण्यासाठी वजन संतुलित ठेवा.

त्यामुळे महिलांनी वय आणि आरोग्य बघूनच व्यायाम करावा. झुंबा, फंक्शनल वर्कआउट ज्यामध्ये उडी मारणे, बसणे आणि वेगाने पुढे जाणे किंवा अशी काही योगासने (सूर्यनमस्कार, पद्मासन) गुडघ्यांमध्ये वेदना आणखी वाढवू शकतात. यामुळे वजन कमी करण्याच्या नादात कसलेही व्यायाम करू नयेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यायामाचे टाईम टेबल आणि वेळ ठरवावी. त्यासोबतच आहारामध्येही हाडे मजबूत करणारे कॅल्शियमयुक्त पदार्थांचे समावेश करावा.


Edited By- Aarya Joshi

- Advertisment -

Manini