भोंदूगिरीचा बिगरभांडवली धंदा

भोंदूगिरीचा बिगरभांडवली धंदा

ठकसेन गोराणे

आपल्या देशात संतांनी देवाधर्माच्या माध्यमातून मानवतेचा व करूणेचा मार्ग सांगितला. स्वतः त्यांनी तो आचरूनही दाखविला. मात्र आजची भोंदूगिरी, बुवाबाजी करणारी ही मंडळी मधूनमधून संतांचा नामघोष करतात. मात्र प्रत्यक्ष वर्तनात ते कमालीचे मतलबी असतात. देव, धर्म व अध्यात्माच्या नावाने मोक्षाची लालूच, भीती व दहशत निर्माण करून आपली बुवाबाजी चालवितात. आजची भोंदूगिरी, बुवाबाजी ही समाजासाठी अतिशय घातक आणि भयानक आहे. कारण विज्ञानयुगातही यांचे विचार हे बहुतेक वेळा अत्यंत असंबद्ध, अनेकदा अशास्त्रीय आणि दिशाभूल करणारे असतात.
अंधश्रद्धा बाळगल्याने व्यक्तीचे, व्यक्तिगत जीवन आणि कुटुंबाचे तसेच समाजाचे सामूहिक जीवन हळूहळू दैववादी, भीतीयुक्त व परावलंबी बनत जाते. त्याचबरोबर व्यक्ती व समाजाचे मोठ्या प्रमाणात शोषण, फसवणूक व दिशाभूल होत राहते. अनेक अंधश्रद्धायुक्त रुढी, प्रथा, परंपरा जोपासल्याने, त्यांचे जतन केल्याने अनेक घातक, अनिष्ट गैरप्रकार घडत असतात. कोणतीही अंधश्रद्धा तपासली तरी आपणास तिचे दुष्परिणाम लगेच लक्षात येतील.

आपल्या अवतीभोवती असंख्य असे लहान-मोठे अंधश्रद्धांचे प्रकार घडत असतात. अशा प्रकारांचे जाणीवपूर्वक सखोल निरीक्षण करून, त्यांच्यातील विसंगतीपूर्ण आंतरसंबंध व हेतू लक्षात घेतले तर,त्या त्या घटनेतून उदयास येणारे कमी-अधिक प्रमाणातील दुष्परिणाम कोणत्याही सुज्ञ व्यक्तीच्या सहज लक्षात येतील. ठार अंधश्रद्ध व्यक्ती वगळता, अनेकजण हे मान्य करतात की, अंधश्रद्धा या कमी-अधिक प्रमाणात अनिष्ट आणि घातकच असतात. त्या, समाजाचा व व्यक्तीचा सारासार विवेक हळूहळू नष्ट करतात. चिकित्सक बुद्धी कुंठीत करतात.त्यामुळे व्यक्ती व समाज या दोन्ही घटकांची वाटचाल हळूहळू अविवेकी वर्तनाकडे व मानसिक गुलामगिरीकडे सुरू होते. या वाटचालीत व्यक्ती व समाजाचे विविध प्रकारे शोषण, फसवणूक आणि दिशाभूल होत असते. त्यामुळे उभ्या आयुष्यातील वेळ, श्रम, वित्त व बुद्धी अनाठायी खर्च होतात. व्यर्थ जातात. हे सर्व अरिष्ट दूर करण्यासाठी, थांबविण्यासाठी इच्छा असूनही, लोक सरसावत नाहीत. पुढे येत नाहीत.

दुसर्‍या बाजूला प्रश्न असा पडतो की, अंधश्रद्धांचे हे सारे जीवघेणे प्रकार, दुष्परिणाम बर्‍याच वेळा माहीत असूनही, अनेक व्यक्ती तसेच बहुसंख्येने समाज अशा अनेक दुष्ट, घातक, अनिष्ट अंधश्रद्धांच्या गर्तेत का सापडतो? त्यामध्ये का अडकतो? अंधश्रद्धांचा बळी का ठरतो? वास्तविक विज्ञानाच्या मदतीने, विशेषतः भौतिक पातळीवर जीवनातील विविध क्षेत्रात मानवाने कमालीची प्रगती केलेली आहे. तरीही मानवी जीवनातील अंधश्रद्धा समूळ नष्ट का झाल्या नाहीत? अजूनही जीवनाचे व्यापक क्षेत्र त्यांनी का काबीज करून ठेवले आहे? त्यात वाढ का होत आहे?

अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी पुरातन काळापासून व्यक्तिगत व मागील काही वर्षांपासून संघटितपणे कमी-अधिक प्रमाणात प्रयत्न होत आलेले आहेत. मात्र एवढे असूनही, अपेक्षित तेवढ्या प्रमाणात अंधश्रद्धांचे प्रमाण व प्रकार कमी होताना दिसत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यामागे कोणती कारणे असावीत? याचा सखोल शोध घेतल्यास त्यांची असंख्य कारणं सापडतील. कारण, असंख्य प्रकारच्या आणि कमी-अधिक प्रमाणात सर्वच मानवी समाजात लहान-मोठ्या अशा असंख्य अंधश्रद्धा सदैव सुखेनैव नांदत असतात. त्यामुळे संपूर्ण मानवी जीवनाचा शोध घेण्याइतकाच हा प्रश्न मोठा व गुंतागुंतीचा आहे.

वरवर पाहता अंधश्रद्धा निर्माण होण्यामागे, त्या वाढण्यामागे आणि त्या टिकून राहण्यामागे अनेक कारणे आहेत. व्यक्ती व समाजातील अज्ञान, अगतिकता, वैफल्य, अस्वास्थ्य, चमत्कारांवरील विश्वास, वेगवेगळ्या प्रकारची भीती, ऐतखाऊ व ऐदीपणा, दैववादीपणा, चंगळवाद, हव्यास, अमर्याद कामना, सामाजिक वा अन्य विषमता, भेदाभेद, असुरक्षितता, अस्थिरता, दारिद्य्र, दुर्बलता, लोकसंख्येची अमर्याद वाढ अशी अनेक ठळक कारणे असल्याचे आपणास दिसून येईल. या सर्व कारणांचा शोध घेऊन, ती सर्वच कारणं दूर केली की संपूर्ण मानवी समाज अंधश्रद्धामुक्त झाला, असंच म्हणावे लागेल. मात्र, आजतरी ते अवघड आहे. परंतु अशक्य नाही.

या सर्व अंधश्रद्धांच्या प्रकारातील अत्यंत घातक, जाचक, रुढी-प्रथा, अनिष्ट, अघोरी अंधश्रद्धा यांच्या विविध प्रकारांचा जाणीवपूर्वक सखोल शोध घेता येणे शक्य आहे. त्यांच्या निर्मिती मागील कारणांचा, दुष्परिणामांचा शोध घेणेही अवघड नाही. योजलेल्या उपायांचा अवलंब करणे, सतत पाठपुरावा करणे, हे काम व्यक्तीगत तसेच संघटितपणे करणे शक्य आहे. असे केल्याने, काही प्रमाणात त्या अंधश्रद्धांबाबत जनजागृती होते. त्यातून अनेक अंधश्रद्धांची तीव्रता कमी होते. काही अंधश्रद्धा समूळ नष्ट होण्यास मदत होते. निदान अनुकूलता तरी निर्माण होते, असा अनुभव आहे. मात्र हे अत्यंत जोखमीचे, जबाबदारीचे आणि अत्यंत संवेदनशीलपणे करण्याचे काम आहे. शिवाय अत्यंत जागरूकपणे, सातत्याने चालू ठेवण्याचे काम आहे. याचे सतत भान बाळगणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा, समाज अंधश्रद्ध राहण्यातच ज्यांची रोजीरोटी, स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले आहेत, असे लोक आहेतच. ते त्यांच्यातील मानवतेला आणि माणुसकीला तिलांजली देऊन, अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणार्‍या व्यक्तींची बदनामी करतात. त्यांचा अतोनात छळ करतात. प्रसंगी जीवही घेतात. देशोदेशीचा इतिहास याची साक्ष देतो.

आपल्या देशात संतांनी देवाधर्माच्या माध्यमातून मानवतेचा व करूणेचा मार्ग सांगितला. स्वतः त्यांनी तो आचरूनही दाखविला. मात्र आजची भोंदूगिरी, बुवाबाजी करणारी ही मंडळी मधूनमधून संतांचा नामघोष करतात. मात्र प्रत्यक्ष वर्तनात ते कमालीचे मतलबी असतात. देव, धर्म व अध्यात्माच्या नावाने मोक्षाची लालूच, भीती व दहशत निर्माण करून आपली बुवाबाजी चालवितात. आजची भोंदूगिरी, बुवाबाजी ही समाजासाठी अतिशय घातक आणि भयानक आहे. कारण विज्ञानयुगातही यांचे विचार हे बहुतेक वेळा अत्यंत असंबद्ध, अनेकदा अशास्त्रीय आणि दिशाभूल करणारे असतात. स्वतःवर आक्षेप येऊ नये, ढोंग उघडे पडू नये म्हणून मधूनमधून समाजकार्याचा देखावा केला जातो. त्यात व्यावहारिक शहाणपण पाळले जाते. जपले जाते. त्यासाठी लागणार्‍या सर्व प्रकारच्या सहाय्याची पूर्तताही एकनिष्ठ अनुयायांकडून भागवली जाते. वाईट याचे वाटते की, अनुयायीही हे सर्व, ईश्वरी सेवा समजून इमानेइतबारे करीत असतात. कारण तथाकथित आध्यात्मिक गुरुच्या आदेशाशिवाय आपण स्वयंःप्रेरणेने स्वतः किंवा इतरांना सोबत घेऊन, मोठे कल्याणकारी काम करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांनी गुरुचरणी अर्पण केलेला असतो.बुद्धी गहाण टाकल्यासारखे वर्तन ते करीत असतात.

बुवाबाजीच्या अनेक प्रकारांपैकी धर्माच्या आणि अध्यात्माच्या नावाने चालणारी बुवाबाजी अत्यंत भयानक असते. ती जवळजवळ जगातील संपूर्ण मानवी समाजात चालत आलेली आहे आणि आजही बिनधोकपणे चालू आहे. त्या त्या जाती-धर्मातील, समाजातील व्यक्तींचे व्यक्तिगत तसेच सामुदायिक पातळीवर विविध प्रकारे शोषण करणे, हाच मुख्य हेतू त्यामागे असतो. मात्र आपापल्या धर्मश्रद्धेमुळे आणि देव-धर्मभोळेपणामुळे लोक अशा बुवाबाजीकडे आकर्षित होतात, त्यात गुंतून पडतात, मानसिक गुलामगिरीत अडकतात आणि त्यामुळे जीवनाची कोंडी करून घेतात, हेही तितकेच खरे आहे. त्यामुळे स्वतःच्या अंगी अलौकिक दैवी शक्ती असल्याचा दावा करून, हे गुरु,भक्तगणांच्या जीवनातील सर्वच प्रश्न, समस्या सोडविण्याचे आश्वासन देतात. भक्तीतून पारलौकिक कल्याण साधणार असल्याचे, मुक्ती, मोक्ष मिळणार असल्याचे अनुयायांच्या मनात बिंबवतात.

नेहमीच त्यांना अनेक निरर्थक कर्मकांडात अडकवतात. अनुयायीही हिरीरीने, चढाओढीने भाग घेऊन ते स्वतःचे कार्य समजून पार पाडत राहतात. त्यातच जीवनाची इतिश्री असल्याचे समजतात. यालाच ते आध्यात्मिक असल्याचा आनंदही मानतात. त्यामुळे निर्भेळ, खर्‍या, नैसर्गिक आनंदाला, जीवनाला अनुयायी मुकतात. प्रयत्नवाद सोडल्याने, दैववाद वाढतो. म्हणून त्यांचे गुरू, स्वामी, प्रेषित यांनाच ते आपला तारणहार मानतात. त्यामुळे भोंदूगिरीचा, बनवाबनवीचा हा बिगरभांडवली धंदा अधिकच बरकतीला येतो. वाढत जातो. लाखोच्या संख्येने शिष्य, अनुयायी मिळत जातात. ‘एकमेकां साहाय्य करु, अवघे धरू सुपंथ’, ह्या संत विचाराशी विसंगत अशा विचाराने अनेक धूर्त राजकारणी आणि विनासायास लोकप्रियता मिळवण्यासाठी धडपडणारी प्रसिद्धी माध्यमेही अशा तथाकथित आध्यात्मिक गुरूशी संबंध प्रस्थापित करतात. त्यांच्या दरबारात हटकून हजेरी लावतात. त्यांची सतत तेथे ऊठबस असते. राबता असतो.साहजिकच, अशा गुरुंच्या महान (?) लोकसेवेला कमालीची प्रतिष्ठा आणि प्रचंड प्रसिद्धी मिळत राहते.

First Published on: January 24, 2021 1:45 AM
Exit mobile version