पुरुषपणाची कोंडी

पुरुषपणाची कोंडी

‘मर्द को दर्द नहीं होता’ याइतकं भोंगळ वाक्य दुसरं कुठलं नाही. आपली माध्यमं, सिनेमे ही वाक्य डोक्यात बिंबवतात आणि तीच पुढे पुढे रेंगाळत राहतात. आताच्या पिढीचीच नाही तर आमच्या पिढीचीही अशी काही वाक्यं होती ज्यांनी आमच्या पिढीची विचार करण्याची पद्धतच कुरतडून टाकली. जसं ‘ब्रह्मचर्य हेच जीवन, वीर्यनाश हाच मृत्यू’ ‘स्त्री ही अनंतकाळाची माता आणि क्षणभराची पत्नी असते आणि पुरुष अनंतकाळाचा प्रियकर किंवा पती असतो’ ,‘स्त्रीचं सौंदर्य हाच तिचा पराक्रम आणि पुरुषाचा पराक्रम हेच त्याचे सौंदर्य’ अशी सगळी टाळीबाज वाक्य जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन नियंत्रित करत असतात. आणि स्त्री पुरुष समता हवी हे सगळं सगळ्यांना पटत जरी असलं तरी आपल्या ग्रुपमध्ये, चार मित्रांमध्ये वावरताना मात्र आपण मर्द म्हणूनच वावरतो.

मग पुरुषांना बदलण्याची आपल्याला गरज का आहे? बातम्यांमध्ये, अनेक माध्यमांमध्ये आपण कुठल्यातरी मुलींना जाळून मारल्याच्या, खून केल्याच्या, बलात्काराच्या, अ‍ॅसिड हल्ल्याच्या बातम्या बघतो, पण ज्याला बलात्कारी म्हणतो तो काही आपल्यापेक्षा फार वेगळा नाही. तो आपल्या सगळ्यांच्या आत दडलेला जनावर (खरं तर जनावर म्हणणंही चुकीचंय) आहे. म्हणजे एखाद्या मुलीने सोशल मीडियावर काही लिहिलं, जे आपल्याला पटलं नाही तर तिला आपण ज्या पद्धतीने प्रतिसाद देतो, प्रतिक्रिया देतो तेसुद्धा काही बलात्कारापेक्षा फार कमी नाही. आणि म्हणून पुरुष असण्याची लाज वाटावी असं सगळं वातावरण आजूबाजूला आहे, पुरुष असणं जणू काही शिवीच झालीय. पण तसं नाहीये. पुरुषांनाही समस्या असतात. पण फक्त पुरुषांनी आत्महत्या केल्या किंवा टोकाचं पाऊल उचललं तरच आपण त्यावर बोलतो किंवा लक्ष देतो, पण स्त्रियांवर हुकूमत गाजवण्याच्या एका गोष्टीच्या बदल्यात खूप मोठी किंमत पुरुषांनीही पितृसत्तेला मोजली आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही. पुरुषसत्तेचा काटेरी मुकुट पुरुषाला खंबीर, कठोर, ताकदवान या उपाध्या जरी डकवत असला तरी ते पुरुषाला आणि पुरुषाच्या आतल्या माणसाला पोखरून रक्तबंबाळ करत असते.

स्त्री जेव्हा वयात येते तेव्हा मासिक पाळीची घटना घडते. तिच्या शरीरात बदल होतात. त्याचा तिला त्रास होतो. बंधनं घातली जातात हे खरं आहे. पण त्या घटनेने तिचा इतर स्त्रियांशी गोफ विणला जातो. बाईपणाच्या धाग्याने त्या एकमेकींशी बांधल्या जातात. आणि या सगळ्यात बाई मोठी होत असते. तिचे एका मोठ्या जगाशी, विश्वाशी नातं विणलं जातं. बाई त्यामुळे अतिशय निशंक असते, अनेक गोष्टी सहज सांगते, घडघड बोलते. पण याउलट पुरुषांसाठी वयात येण्याची अशी एक विशिष्ट घटना घडत नाही तर अनेक बदल अनेक वेळासाठी शरीरात, मनात घडत असतात. मुलींकडे पाहावंसं वाटतं, कामभावना जाग्या होतात आणि या सगळ्याची लाजसुद्धा वाटत असते. पण हे सगळं सांगायला बोलायला कुणी नसतं. त्यामुळे कोंडी तयार होते. हे सगळं नैसर्गिक आहे, पण याविषयी बोलणार कुणाजवळ? त्याच काळात पुरुषाला आईच्या जवळ जावं वाटतं, कुशीत जावं वाटतं. पण आई त्याला दूर लोटत असते. या सगळ्यात एक vaccum म्हणजे निर्वात पोकळी तयार होते. आणि त्यात भरीसभर म्हणजे मुलगा मोठा झाला की, त्यावर अपेक्षांचं ओझं लादलं जातं. शिक्षण, नोकरी, लग्न, घर, आईवडिलांचा सांभाळ, त्यांच्या इच्छा हे सगळं करताना त्याला स्वतःला काय करायचंय हे तो आणि त्याच्या आजूबाजूची माणसं विसरतातच. मग पुरुषसत्तेच्या या नाटकात काम करणारा एक कलाकार ठरतो. त्याची भूमिका काय, त्याचे डायलॉग काय? त्याने कुठे काय react करायचं हे सगळं पितृसत्ता ठरवते. त्याला नेमकं आयुष्यात काय हवंय हे कुणीच विचारत नाही. आणि इथूनच सुरु होते पुरुषपणाची कोंडी.

माजघर सगळ्यांना माहीत असेल. तसं प्रत्येक बाई आपल्या काळजात माजघर घेऊन फिरत असते. त्या एकमेकींशी निशंक बोलतात. अगदी भाजी बाजारात, लोकल ट्रेनमध्ये एकमेकींशेजारी एखाद्या तात्पुरत्या प्रवासासाठी बसलेल्या बायका मनभरून एकमेकींशी बोलतात. याउलट पुरुष आपल्या सगळ्यात जवळच्या मित्रांशी काय शेअर करतो? तर तो पितृसत्तेने तयार केलेली पुरुषाची खरीखोटी प्रतिमा पोलिश करण्याचं, तिला चकचकीत करण्याचं काम करतो. कसं चार पोरी कशा माझ्यावर लाईन मारतात, कसं मी इतकं अवघड काम केलं हे सांगतो. पण माझ्या मैत्रिणीशी भांडण झालंय, मला टेंशन आलंय हे सगळं पुरुष एकमेकांशी बोलत नाहीत. पुरुष सोबत दारू पितो, फिरायला जातो, एकत्र वेळ घालवतो पण एकमेकांना काळजातलं दुख: सांगत नाही. आणि बाई सगळ्या विश्वालाच आपलं माजघर समजून मनातलं सगळं मोकळं करते. हा सगळा आपल्या जडणघडणीचा फरक आहे. ज्या पद्धतीने स्त्रियांना आणि पुरुषांना आपण घडवतो त्यावर हे अवलंबून आहे. मर्दानगीचा काटेरी मुकुट पुरुषाची एक विशिष्ट प्रतिमा ठसवतो आणि त्यातून पुरुषपणाची कोंडी होते.

पण आपल्याला दिसतो तो शिवीगाळ करणारा, हिंसा करणारा पुरुष. पण त्याला ते व्यक्त करण्याच्या वेगळ्या पद्धती माहीत नाहीत. जर त्याला हे सगळं व्यक्त करण्याच्या इतर पद्धती शिकवल्या तर पुरुषांना आपली नाती आणखी प्रस्थापित करता येतील, वाढवता येतील. पुरुषाला मनातलं सगळं व्यक्त करण्याची अभिव्यक्तिच नसते. त्याची शिकवणच त्याला आपण दिलेली नसते. पुरुषाचा EQ कमी आहे आणि आपल्या जडणघडणीने तो वाढूच दिला नाहीये. आणि हे सगळं आत साचलेलं जेव्हा उडेल, त्याचा भडका होईल तेव्हा त्याचा उद्रेक आपल्याला सहन होणार नाही आणि आपण त्याची कल्पनासुद्धा केलेली नसेल.

आणि ह्यातूनच मग पुरुष आपली कोंडी आपल्या खालच्या व्यक्तींवर, व्यवस्थांवर काढतो. आणि स्त्री ही या व्यवस्थेत पुरुषाच्या खाली असते हे व्यवस्थेने पुरुषाला खूप आधीच शिकवलंय. आणि स्त्री – पुरुषांमधलं हे वाघा बोर्डर म्हणून बाऊ केलेला मोठं अंतर आपण ओलांडतच नाही. आणि स्त्रीमुक्ती चळवळीने पुरुषांना हा उंबरठा ओलांडून आत नेलंच नाही. आतला, स्त्रियांचा जग दाखवलंच नाही. त्यातून पुरुष नात्यांना मुकतो. नात्यातला प्रेमाला मुकतो. कुणावर जीवापाड प्रेम करण्याचे अनुभव पुरुष घेत नाही आणि मग व्यवस्था पुरुषाचं माणूसपणच नाकारते. आपण अधिकार गाजवू शकतो ह्याचा गर्व करण्यात अर्थ नाही त्यामुळे आपलं माणूसपण छाटलं गेलंय हे स्वीकारलं पाहिजे. हे सगळं सांगतांना मी स्त्रियांवर अन्याय होतो, त्यांचं शोषण होतंय हे अजिबात नाकारत नाहीये. हे सगळं पितृसत्तेने स्त्रियांच्या मागे लावलंय हे मान्यच. पण पुरुष हे सगळं कशातून करतात हे समजून घेतलं पाहिजे. कुणीच पुरुष किंवा स्त्री काळे किंवा पांढरे नसतातच, पण दोघांच्याही ग्रे शेड्स असतात. त्या आपण स्वीकारुया, त्याशिवाय आपला एकत्र प्रवास शक्य नाही.

खूप वर्षांपूर्वी स्त्री मुक्ती चळवळीत सक्रीय असताना माझ्या स्त्रीवादी मैत्रिणींना मी प्रश्न विचारला की, या सगळ्या समतेच्या आणि स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रयत्नात आपण पुरुषांना सहभागी करून का घेत नाही? पुरुष बदलल्याशिवाय स्त्री बदलेल का? आणि स्त्रीवादी चळवळीचा अजेंडा पुरुषांना बदलणं हा का नाही? तेव्हा ह्यावर फार काम झालं नाही, पण हाच प्रश्न आजच्या तरुण मुली विचारताय. प्रश्न कसला जाबच विचारतायत. अशाच एका आधुनिक स्त्रीने पुरुषाला उद्देशून लिहिलेली ही कविता:

एवढा कसला गर्व आहे रे तुला?
तुझ्या मर्दानगीचा?
फोर packs सिक्स packs आजकाल कुठल्याही जिममध्ये मिळतात. नोंदवल्यावर चार महिन्यांनी भाड्यावर मिळतात.
मला सांग तुला दंडातल्या बेडकुळीने बदाम फोडता येतो?
मिश्यांच्या झुपक्यात दोन दोन लिंब पेलता येतात?
चुकून हो म्हणालास तर विचारेन अडकित्ता, हातोडा वगैरे नाही का तुमच्या घरात?
आणि अशा गोष्टींचं निरर्थक कौतुक तरी कशाला?
इतकेच निरर्थक तुझ्या मालकीचे शेकडो apps
गाडी गाडी खेळायच्या वयातून अजून बाहेरच पडला नाहीयेस तू.
आणखी खाली उतरणारच असशील तर लक्षात ठेव ज्याच्या जीवावर तुझं सगळं पुरुषपण गहन टाकलंस तू, dropper आहे तो साधा. अतिरिक्त द्राव शरीराबाहेर टाकणारा.
मला सांग, खवळणार्‍या दर्यात कधी घातलीयेस तू होडी?
अंगठ्यासारख्या सरळ सोट्ट्यावर चढायची कधी केलीयेस हिंमत?
जीव कुर्बान केला आहेस कुणा झाडा-फुला-पानावर, आईवर? बाईवर?
दोन रात्री झोपलास, उपाशी? बिनतक्रार? आणि आणि तिसर्‍या रात्री अर्धी भाकर मिळाल्यावर त्यातली पाव दिली कुणाला प्रेमाने?
फ्रोईड शप्पथ! मला नाही रे वाटत हेवा तुझ्या मर्दपणाचा,
त्याच्या कुरूप दीनवाण्या प्रतीकांचा.
पूर्वी यायची कीव आता येतं हसू. पुढे जाऊन त्याची कीव वाटू नये म्हणून कसोशीने प्रयत्न करते आहे मी.

First Published on: November 22, 2020 5:15 AM
Exit mobile version