घरातील स्त्रीमधील दैवीशक्ती !

घरातील स्त्रीमधील दैवीशक्ती !

नवरात्र! घरोघरी अतीव आनंदाने, उत्साहाने, श्रद्धेने आणि भक्तीने साजरा केला जाणारा सण. खास करुन स्त्री शक्ती ला अभिवादन करणारा, स्त्री शक्ती चा महिमा वर्णन करणारा आणि स्त्रीला देवीचं रुप समजून तिचा आदर, पूजा अर्चना करण्याचे दिवस. नवरात्र म्हणजे घरगुती स्वरूपातच नाही तर सामाजिक स्तरावरदेखील विविध उपक्रमांचे आयोजन, स्पर्धा, दांडिया, होम हवन पूजापाठ यामुळे वातावरण चैतन्यमय झालेले असते. या नऊ दिवसात प्रत्येकाला जाणीव होते की स्त्री शक्ती आहे, स्त्री भक्ती आहे, स्त्रीला नाना उपमा उपाध्या देऊन तिला विविध पुरस्कार विविध सन्मान बहाल केले जातात.

अतिउत्साहाने, हसत मुखाने महिलादेखील सर्व कार्यक्रमात हजेरी लावतात स्वतःमधील आत्मविश्वास पुन्हा रिचार्ज होतो, पुन्हा नव्याने स्त्री कामाला लागते. या बरोबरच घरोघरी घटस्थापना, त्यामधील शास्त्रीय विधी, विविध रंगांच्या साड्या दागदागिने परिधान करणे, गरबा खेळणे, त्यात फोटो सेशन, सेल्फीचा आनंद घेणे, उपवास करणे, यथाशक्ती देवींची साधना करणे यातदेखील ती स्वतःला गुंतवून घेते.

नवरात्रात सहभागी झालेल्या प्रत्येक स्त्रीला खरंच तिच्या घरात कायमस्वरूपी देवीचा दर्जा, देवीसारखाच आदर मिळतोय का? हा आजच्या लेखमधील विचार मंथनाचा मुद्दा आहे. घरातील लक्ष्मी रुपी सुनेने, मुलीने, आईने, घरातील महिलेने प्रत्येक नवरात्र कस व्यवस्थित करावं, त्यासाठी काय काय तयारी करावी, काय खरेदी करावी, कोणत्या रीती भाती, कुलाचार, कुलधर्म, पूर्वांपार चालत आलेल्या पद्धती पाळाव्यात, सगळ्या कुटुंबात कसं मिळून मिसळून हा सण साजरा करावा याबाबत तिला अनेक उपदेश केले जातात आणि अपेक्षादेखील ठेवल्या जातात. अगदी एक वर्षाच्या लहान कुमारिकेपासून ते वयस्कर महिलेपर्यंत प्रत्येक स्त्री जन्माला वंदन करणारं हे नवरात्र.

महिलादेखील आपल्या घराची, घराण्याची परंपरा म्हणून, आपली देवीवर असलेली वैयक्तिक श्रद्धा म्हणून अतीव आनंदाने सर्व विधी पार पाडण्यासाठी धडपडताना दिसतात. कुटुंबात, समाजात आपण कुठेही कमी नाही, मागे नाही, आपला पण उत्साह कसा ओसंडून वाहतो आहे हे दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. कुठेही आपलं दुःख, आपला त्रास, आपला कोंडमारा इतरांना समजू न देता चेहर्‍यावर हसू ठेऊन वावरतात.

खोलवर विचार केला तर, नवरात्रात बहुतांश जणी हाच विचार करत असतात की निदान आता तरी आपल्या प्रापंचिक परिस्थितीमध्ये काही चांगला, सकारात्मक बदल होईल, आपल्या अडचणी दूर होतील, आपल्या घरात आपल्याला मान सन्मान मिळेल, गृहकलह थांबतील, वाद मिटतील, आपल्या नवर्‍याला, सासरच्यांना आपली जाणीव होईल, आपल्याला आपल्या नवर्‍याचे प्रेम मिळेल, सासरी होणारा मानसिक त्रास थांबेल. अनेक महिला अशी भाबडी अशा मनात ठेऊन सर्व कार्यक्रम यथासांग पार पाडताना दिसतात. अनेकजणी मनोमनी देवीला तसा नवस बोलतात, साकडं घालतात. अनेकजणी नवरात्रात मनातलं दुःख आणि डोळ्यातलं पाणी न दाखवता रोजच्या रंगांशी स्पर्धा करत, स्वतःचे फोटो सामाजिक माध्यमातून शेअर करत सणाचा आनंद घेताना दिसतात.

आजही अनेक घरांमध्ये महिलांप्रती अन्याय, अत्याचार, त्यांना वागवताना राक्षसी वृत्ती, रानटी विचार, घरातील सुनांना घरातून मिळणारी राक्षसी वागणूक ही व्यथा कायम आहे. तोच मानसिक, भावनिक, शारीरिक रूपाने छळणारा मनुष्यरुपी राक्षस जिवंत आहे. स्त्रीवर लादले जाणारे चुकीचे प्रसंग, तिच्या भावनांशी खेळणं, तिचा होणारा अपमान, तिला मिळणारा मनस्ताप आताही अस्तित्वात असल्याचे दिसते.

स्त्रीचं बाह्य रुप तिने कितीही रंगीबेरंगी साड्यांनी, मेकअपने, भारी भारी फॅशन करुन सजवलं आणि मिरवलं तरी तिचं अंतर्मन तितकंच प्रफुल्लित आहे का? ती आतूनदेखील तितकीच सुखी समाधानी आणि आनंदी आहे का हे तिला कोण विचारत? तिचा संसार तिच्या स्वप्नांना वाव देणारा आहे का? तिच्या घरात तिच्या संसारात तिची जागा काय आहे? यावर कोण विचार करतं.

तिच्या मनातील सल समजून घेऊन त्यावर उपाय कोण करत? तिचा त्रास दूर करण्यासाठी पुढे कोण येत? आलंच कोणी पुढे तर त्याला कितपत यश येत? एक स्त्री म्हणून तिच्या आत्मसन्मानाची किंमत कोण ठेवत? तिच्या मतांना, निर्णयाना, भावनांना न्याय कोण देत? तिचा घरात अपमान होणार नाही, ती दुखावली जाणार नाही याची जबाबदारी कोण घेत? या प्रश्नांची जर अनेक महिलांनी मनापासून खरीखरी उत्तर द्यायची ठरवली तर उत्तर कोणीच नाही! हेच येणार यात शंका नाही.

नवरात्र उत्सवात फक्त नावाला स्त्रीचे गुणगान गावून, तिचं कौतुक करुन तूच कर्ती-धर्ती, तू गृहलक्ष्मी, तू सौभाग्यवती, तू धर्मपत्नी, तू शक्ती, तू महती अशी विविध लेबल लावून महिलांना तिच्या दुःखाचा तात्पुरता विसर पडायला नक्कीच मदत होते. परंतु या तात्पुरत्या, वरवरच्या स्तुतीने तिच्या आयुष्यात आलेले नकोसे विषय, तिचा कौटुंबिक त्रास, तिच्या आयुष्यातील संघर्ष संपतो का? तिचं प्रापंचिक, वैयक्तिक ध्येय साध्य होतं का?

या नवरात्रात आपण हा विचार जरूर करावा की आपल्या घरातील कोणतीही स्त्री जर अंतःकरणातून सुखी, समाधानी नसेल, फक्त तडजोड म्हणून आयुष्य जगत असेल, तिला तिचं अस्तित्व नसेल, तिचं मन मारून ती दुःख पचवत असेल, ती तिच्या हक्क आणि अधिकारांपासून वंचित असेल, तिला तिचं स्थान मिळत नसेल तर आपण नवरात्रात कितीही वेळा कितीही देवींची पूजा, उपवास, साधना आणि प्रार्थना केली तरीही देवी आपल्याला इच्छित फळ देईल का? ती आपल्याला शुभ आशीर्वाद देईल का? आपल्या घरातील दैवी शक्तीला म्हणजेच आपल्या गृहलक्ष्मीला अंधारात ठेऊन, त्रासात ठेऊन आपण देवीच्या मूर्तीसमोर कितीही दिवस दिवा जाळला तर आपल्या आयुष्यात प्रकाश पडेल का? या विषयावर विचार होणे अपेक्षित आहे.

आजच्या कलियुगात स्त्रीला देवी म्हणून नाही, पण निदान माणूस म्हणून वागणूक मिळणं आवश्यक आहे असे वाटते. निदान प्रत्येक स्त्रीला तिचे मूलभूत हक्क अधिकार मिळतील, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून तिला तिच्या नात्याप्रती असलेलं अस्तित्व मिळेल, ओळख मिळेल, मान सन्मान मिळेल इतका प्रयत्न आपण करू शकतो. कोणत्याही स्त्रीचा अवमान होणार नाही, ती आपल्यासोबत सुरक्षित राहील, तिला कधीच आत्महत्या करावीशी वाटणार नाही, ती एकटी पडणार नाही, तिला कधीच आयुष्याचा कंटाळा येणार नाही, तिची घुसमट होणार नाही यासाठी आपण नवरात्रीपासून प्रयत्न करूयात.

कोणत्याही स्त्रीला लाचारी पत्कारावी लागणार नाही, हतबल व्हावं लागणार नाही, मजबुरीमुळे कोणत्याही स्त्रीला तिच्या चारित्र्याशी तडजोड करावी लागणार नाही, समाज तिच्या दुःखाच भांडवल करुन तिचा गैरफायदा घेणार नाही, तिच्या वर होणारे शारीरिक, मानसिक बलात्कार थांबतील, तिची पिळवणूक, फसवणूक थांबेल, तिच्यावर होणारे प्राणघातक हल्ले बंद होतील, तिला खोटं आमिष दाखवलं जाणार नाही या सर्व बाबींची दखल घेऊन जर येत्या नवरात्रीपासून आपण काम केलं तर निश्चितच ती आदिमाया, आदिशक्तीची खरी पूजा असेल आणि त्यातून आपल्याला प्रसादरूपी जो आशीर्वाद मिळेल तो नक्कीच आपलं कल्याण करेल.

First Published on: September 25, 2022 3:04 AM
Exit mobile version