वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन

वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन

पर्यटन म्हणून आपण जगभर वेगवेगळ्या स्थळांना भेटी देतत असतो. त्याबद्दल लोकांना माहिती देत असतो. एखाद्या ठिकाणी फिरायला गेल्यानंतर त्या ठिकाणचा फोटो काढून सोशल मीडियावर आपण पोस्ट करतो. मित्र-मैत्रिणींच्या कमेंट आणि लाईकच्या वर्षावात आपण आनंदी होतो. पण याच पर्यटन स्थळांना भेट देत असताना काही ठिकाणी असे दिसून येते की, त्या स्थळांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. अर्थात काही ठिकाणं हजार पाचशे वर्षांपासून बांधलेली असल्यामुळे त्यांची पडझड झालेली आपण समजू शकतो. पण काही ठिकाणी मुद्दाहून त्या स्थळांना पोहोचवलेली हानी पाहिल्यानंतर वाईट वाटते. तिथल्या भिंतीवर उगाच काहीतरी लिहिणे.

परिसरात अस्वच्छता करणे. एखाद्या मंदिराचे दगड नेऊन दुसरीकडे त्याचे बांधकाम करणे. इत्यादी उपद्रव काही लोक करत असतात. काही अंशी पर्यटन स्थळांबद्दलची त्या-त्या खात्याची उदासीनतासुद्धा वारसास्थळांना हानी पोचवत असते. जगातील इतर देशांमध्ये पर्यटनस्थळांची किती काळजी घेतली जाते, तिथे कशा प्रकारची स्वच्छता आहे. वगैरेच्या बाता मारणारे आपण, आपल्या देशात आल्यावर मात्र ते नियम पाळत नाही. कचराकुंडी जवळ असून त्याचा योग्य वापर न करणारे महाभाग कमी नाहीत. उत्खनन करताना पुरातत्व विभागाला मिळालेली मूर्ती, शिलालेख किंवा एखादी वस्तू यावर योग्य संशोधनसुद्धा कधी-कधी होत नाही. या सर्वांचा अभ्यास करून ‘भारतातील जागतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन’ व्हावे या उद्देशाने सुनील थोरात नावाचा तरुण सध्या भारतभर प्रयत्न करत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड या छोट्याशा गावातील सुनील थोरात नावाचा 23 वर्षाचा तरुण भारतातील जागतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी तन-मन-धनाने प्रयत्न करतोय. यासाठी सुनीलने सायकलवर 15 राज्यातून 11 हजार किलोमीटरचा प्रवास करण्याचे ठरवले. 20 डिसेंबर 2020 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातून सायकलवर सुरू झालेला त्याचा 110 दिवसांचा तब्बल 8 हजार किलोमीटरचा प्रवास कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, कन्याकुमारी पासून पुन्हा चेन्नई, मध्य प्रदेश ,उत्तर प्रदेश दिल्ली पर्यंत भारतातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना भेट देऊन पोहोचला आहे. ना कुठली सोशल मिडिया टीम, ना आर्थिक पाठबळ सोबत फक्त आणि फक्त स्वतःची जिद्द आणि ध्येय. कडाक्याची थंडी असो, मुसळधार पाऊस असो किंवा रखरखते उन. ठरलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी पोचायचे. दिवसाकाठी 140 ते 150 किलोमीटर सायकल चालवायची हा गेल्या 110 दिवसांचा सूनीलाचा दिनक्रम. उद्देश एकच ‘पर्यटन स्थळांचं जतन आणि संवर्धन.’ विशेष म्हणजे त्याचे सर्व काम तो सीमेवरील भारतीय जवानांना समर्पित करणार आहे.

सुनीलसोबत फोनवरून संपर्क केल्यावर तो विविध पर्यटन स्थळांबद्दल भरभरून बोलत होता. भारतातील जागतिक वारसा स्थळांची यादी तर त्याला तोंडपाठ आहे. महाराष्ट्रसह भारतातील सर्वच राज्यातील पर्यटन स्थळांबद्दल तो एक प्रकारचे संशोधन करत आहे. छोट्या मोठ्या शहरातील एखादे मंदिर किंवा किल्ला कोणत्या काळात बांधला, त्या ठिकाणी त्यावेळी लोक धार्मिक उत्सव कसे साजरे करत. तसेच मंदिरामध्ये न्यायदानाचे काम कसे पार पाडले जाई. त्याचे तेव्हाचे विशाल वैभव आणि आत्ताची त्याची अवस्था याविषयी तो खंत व्यक्त करतो. भारतातील वारसा स्थळांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. परदेशातील वारसा स्थळांचे तसे नाही. खरे तर ही लीगसी (ङशसरलू) आहे, पण आपण या लिगसीचा वापर करन्सी (र्लीीीशपलू) मिळवण्यासाठीच करतो. म्हणजेच पर्यटनापुरता. त्यातून आलेलं कोट्यवधीचं उत्पन्न नंतर कोणत्या कामासाठी वापरलं जातं हे सुद्धा आपल्याला माहीत नाही. परदेशातून आलेले पर्यटक, इतिहास संशोधक, पुरातत्त्व विभागातील तज्ञ भारतात फक्त पर्यटन स्थळ पाहण्यासाठी किंवा भेट देण्यासाठी येत नाहीत. तर ते भारताचा सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, साहित्यिक, शैक्षणिक इतिहास कसा होता. याची माहिती मिळवण्यासाठी येतात. त्या- त्या काळातील या वास्तू भारताचे ऐतिहासिक वैभव कसे होते, याचा पुरावा म्हणून दिमाखात उभ्या आहेत. त्यांचे जतन आणि संवर्धन केले नाही तर भविष्यातील पिढीला फक्त फोटो पाहूनच त्याबद्दल माहिती मिळवावी लागेल. याकडे होणारे दुर्लक्ष हे या वास्तूला इतिहास जमा करु शकते असे मत या क्षेत्रातील तज्ञ नोंदवतात.

युनोस्कोद्वारा तयार करण्यात आलेल्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत सध्या भारतातील वेगवेगळ्या राज्यातील 38 स्थळे आहेत. यामध्ये 30 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्रित निकष स्थान आहे. जगातील वारसा स्थळांच्या यादीत भारत हा चीन इटली, स्पेन, जर्मनी, व फ्रान्सनंतर सहाव्या क्रमांकावर आहे. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ,घारापुरी लेणी, कासचे पठार, चर्चगेट आणि फोर्ट परिसरातील गौथिक शैलीतील इमारती इत्यादी स्थळ ही जागतीक वारसा स्थळ म्हणून आहेत. सात आश्चर्यांपैकी एक ताजमहल सुद्धा भारतातच पण या सर्वांचे जतन खरेच होत आहे का..? हा एक प्रश्नच. थोड्या बहुत प्रमाणात केलेल्या प्रयत्नांनी काहीच होणार नाही. त्यासाठी ठोस उपाययोजना महत्त्वाच्या असतात. देशातील वारसास्थळे ही राष्ट्राची फार मोठी संपत्ती आहेत. उपेक्षित राहिलेल्या पुरातत्व खात्याला नवसंजीवनी देऊन वारसा स्थळांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. समाज एकसंध राहण्यासाठी वेगवेगळ्या शैलीची मंदिरे आणि वास्तू बांधून आपली संस्कृती यादव शिलाहार किंवा त्यापूर्वी आलेल्या राज्यकर्त्यांनी टिकून ठेवण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गडकोट किल्ले आजही महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपून, सह्याद्रीचे शौर्य सांगतात.

हे गडकोट किल्ले स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहेत. पराक्रमाचा हा ईतिहास या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत असतो. आज गरज आहे पुन्हा हा वारसा जपण्याची. येत्या 18 एप्रिलला आपण जागतिक वारसा दिन साजरा करणार आहोत. त्या निमित्ताने का होईना या विषयावर युवकांनी चर्चा घडवून आणावी. म्हणजे सुनील आणि त्याच्यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणार्‍या युवकांना प्रेरणा मिळेल.

जागतिक स्तरावर पर्यावरण रक्षणासाठी ग्रेटा थनबर्ग तिकडे परदेशात प्रयत्न करते. तिथल्या सरकारला ती प्रश्न विचारते. आपण मोठ्या दिमाखात सोशल मीडियावर तिचे कार्य व्हायरल करतो. स्टेटस ठेवून ती कशी योग्य आहे, हे पटवून सांगतो. अगदी याच प्रकारची भूमिका आपल्याला भारतात काम करणार्‍या तरुणांबद्दल घ्यावी लागणार आहे. सुनीलच्या कामाची दखल टाइम्स ऑफ इंडिया, दैनिक जागरण, अमर उजाला, दूरदर्शन तसेच आकाशवाणी सारखे माध्यम घेतच आहेत. भारत हा विविधतेने नटलेला आणि संस्कृती टिकवून ठेवणारा देश आहे. त्यासाठी आपला ऐतिहासिक ठेवा तीतकाच साक्षीदार आहे. भविष्यात राष्ट्रांच्या या प्रतीकांचा नव्याने उल्लेख व्हावा यासाठी पुन्हा एकदा गरज आहे, युवकांच्या हातातील समाज माध्यमाची. जी प्रत्येकापर्यंत तात्काळ पोचतात नवा बदल घडवून आणण्यासाठी….

First Published on: April 11, 2021 4:20 AM
Exit mobile version