मराठी सिक्वलचा ऑगस्ट उत्सव

मराठी सिक्वलचा ऑगस्ट उत्सव

उत्तम चित्रपट तोच असतो ज्याचा शेवट अनेक वर्ष प्रेक्षकांच्या स्मरणात राहतो, हॅप्पी एंडिंग एन्जॉय करून जेव्हा प्रेक्षक सिनेमागृहातून बाहेर पडतो, तेव्हा त्याच्यासोबत असतात कथेतली काही पात्रं , त्यांचे संवाद आणि कथा.. आता ती पात्रं किंवा कथा किती दिवस त्या प्रेक्षकाच्या स्मरणात राहतात, त्यावरून त्याची लोकप्रियता ठरते. शोलेतील सांबा, ठाकूर,बसंती गब्बर सगळ्यांना आजही लक्षात आहेत म्हणून आपण त्याला ब्लॉकबस्टर सिनेमा म्हणतो, असे अनेक सिनेमे आहेत ज्यांच्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलंय. सिनेमाची कथा संपल्यानंतर पुढे त्यांच्यासोबत काय झालं असेल, असा प्रश्न देखील अनेकदा पडतो, काल्पनिक पात्रांचं वास्तविक आयुष्य कसं असेल याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते आणि कदाचित म्हणूनच जन्म झाला असावा सिनेमांच्या सिक्वलचा.. इंग्रजी, हिंदी, तेलगू आणि इतर विविध भाषांतील सिनेमांनंतर आता मराठी भाषेतही सिक्वल्सचे वारे जोरात वाहू लागले आहेत. जेव्हा नवीन कथांचा अभाव निर्मात्यांकडे असतो, तेव्हा ते जुन्याच हिट झालेल्या सिनेमांच्या कथांचा आणि पात्रांचा वापर करत सिक्वलचा आधार घेतात. हा पॅटर्न हिंदीत बर्‍याच दिवसांपासून चालत आला असला तरी मराठीसाठी एकाच वर्षात इतक्या सार्‍या सिनेमांचे सिक्वल येण्याची ही पहिलीच वेळ आहे.

मराठीत गाजलेल्या अनेक सुपरहिट मराठी सिनेमांचे सिक्वल २०२२ वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत, त्यापैकी काही प्रदर्शित झालेत तर काही प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. ऑगस्ट महिना तसा तर हिंदी सिनेमांसाठी देशभक्तीचा उत्सव साजरा करण्याचा महिना असतो, अनेक देशभक्तीपर सिनेमे याच महिन्यात प्रदर्शित होत असतात, मात्र यावेळी तितकी देशभक्ती किमान सिनेमागृहांवर दिसणार नसल्याने, मराठी सिनेमांच्या सिक्वलसाठी पुरेशी जागा उपलब्ध आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच टाईमपास सिरीजचा तिसरा भाग प्रदर्शित झालाय. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दे धक्का २, तिसर्‍या आठवड्यात टकाटक २ आणि दगडी चाळ २ असे एकूण ३ मराठी सिनेमांचे सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत, तेव्हा हा ऑगस्ट महिना मराठी सिनेमासृष्टीसाठी सिक्वल मंथ ठरेल असं दिसतंय.

मराठी सिनेमासृष्टीत सिक्वलची सुरुवात ही आताच झालीये असं नाही, याआधीही काही बोटावर मोजण्याइतके मराठी सिनेमांचे सिक्वल्स प्रदर्शित झाले होते. सुपरहिट फिल्म ‘झपाटलेला’चा सिक्वल २०१३ साली ‘झपाटलेला २’ म्हणून प्रदर्शित झाला खरा, पण त्याला त्यावेळी तितकासा प्रतिसाद मिळाला नाही. २०१५ साली स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांच्या ‘मुंबई पुणे मुंबई’ सिनेमाचा सिक्वल प्रदर्शित झाला आणि त्याला प्रतिसाददेखील चांगलाच मिळाला, म्हणूनच की, काय दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी अधिकचे धाडस करत या सिनेमाचा तिसरा भाग, मुंबई पुणे मुंबई ३ हा २०१८ साली बनवला. एखाद्या मराठी सिनेमाचे तीन भाग बनल्याची कदाचित ती पहिली वेळ असावी. हिंदीमध्ये अनेक सिनेमांचे ३ किंवा तीनहून अधिक भाग बनलेत आणि त्यांना लोकांचा प्रतिसाद मिळालाय. हाऊसफुल, गोलमाल, सिंघम, मर्डर ही त्यापैकी काही उदाहरणं, पण मराठीत हे धाडस करण्याची तितकी वेळ आली नाही, म्हणून सतीश राजवाडे यांचा ‘मुंबई पुणे मुंबई’, रवी जाधव यांचा ‘टाईमपास’ आणि विशाल देवरुखकर यांचा ‘बॉईज’ वगळता इतर कुठल्याही सिनेमांचे ३ भाग आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. ऑगस्टमध्ये ३ मराठी सिनेमांचे सिक्वल प्रदर्शित होणार आहेत, ज्यातील पहिला या आठवड्यात रिलीज झालाय.

२००८ साली सुदेश मांजरेकर दिग्दर्शित ‘दे धक्का’ सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम सारख्या कलाकारांमुळे हा सिनेमा तुफान चालला, शुक्राची चांदणी, वाट चालावी आणि दे धक्का सारखी गाणी प्रेक्षकांच्या ओठावर खिळली होती. कॉमेडी आणि ड्रामाची उत्तम केमिस्ट्री जुळून आल्याने त्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. म्हणूनच की, काय तब्बल १४ वर्षांनी पुन्हा एकदा मकरंद जाधवच्या संपूर्ण कुटुंबाला सोबत घेऊन, कोल्हापुरातून मुंबईला जाणारी वारी आता थेट विदेशात जाऊन पोहचलीये आणि या सिनेमाचा दुसरा भाग प्रदर्शित झालाय. आता कोल्हापुरी रांगडी कुटुंबांची लंडनमधील धमाल मस्ती प्रेक्षकांना किती आवडेल हे पाहावं लागेल, जुनी सर्व महत्वाची पात्रं सोबत घेऊन महेश मांजरेकर, प्रवीण तरडे सारख्या नवीन कलाकारांची एंट्रीदेखील या भागात करण्यात आलीये, आता त्यांना कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल.

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या जीवनापासून प्रेरित झालेल्या ट्रूनाची कथा असलेला दगडी चाळ सिनेमाचा पहिला भाग २०१५ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. अरुण गवळीच्या भूमिकेत मकरंद देशपांडे आणि सूर्याच्या भूमिकेत असलेला अंकुश चौधरी या दोघांच्या भूमिकेला लोकांनी डोक्यावर घेतलं आणि हा सिनेमा देखील सुपरहिट ठरला, याच सिनेमाचा दुसरा भाग ऑगस्ट महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात अर्थात १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. मकरंद देशपांडे, अंकुश चौधरी आणि पूजा सावंत या मूळ सिनेमातीलच मुख्य कलाकारांना पुन्हा सोबत घेत दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांनी हा सिनेमा बनवलाय, अंकुशच्या नवीन लूकची आणि मकरंद देशपांडेच्या डॅडीच्या भूमिकेची उत्सुकता पुन्हा एकदा प्रेक्षकांना लागलीये आणि ती लवकरच पूर्ण देखील होते आहे. ऑगस्ट महिन्यातला तिसरा मराठी सिक्वल आहे, टकाटक २ ज्याचं दिग्दर्शन केलंय मिलिंद कवडे यांनी.

२०१९ साली टकाटक या अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता. सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतरच तो सिनेमा काही तरी वेगळं करणार हे स्पष्ट होतं, कारण त्यातले अ‍ॅडल्ट विनोद हे बराच काळ चर्चेचा विषय बनले आणि त्यातूनच सिनेमाला उत्तम प्रतिसाददेखील मिळाला होता. प्रथमेश परब याने त्यानंतरच अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमे करायला सुरुवात केली होती, पण जितका प्रतिसाद त्याच्या टकाटक सिनेमाला मिळाला तितका बाकी दुसर्‍या सिनेमांना मिळाला नाही. म्हणून काही फ्लॉप अ‍ॅडल्ट कॉमेडी सिनेमानंतर आत तो पुन्हा एकदा सुपरहिट ठरलेल्या ‘टकाटक २’ सिनेमासह येतोय, या भागाचे दिग्दर्शन जरी मिलिंद कवडे करणार असले तरी याची कास्ट प्रथमेश वगळता बरीच नवीन आहे.

अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, भूमिका कदम यांसारखी काही नवीन नावं टकाटक फ्रॅन्चायजी सोबत जोडली जातायत, प्रथमेशच ठोक्याचं पात्रं जुनंच असलं तरी कथा मात्र काहीशी वेगळी असणार असं दिसतंय. तेव्हा टकाटकच्या या भागाला पहिल्या भागा एवढाच प्रतिसाद मिळतो का ? हे १८ ऑगस्टलाच कळेल. ऑगस्ट महिन्यात जरी हे तीनच सिक्वल येणार असले तरी येणार्‍या काळात आणखी काही मराठी सिनेमांचे सिक्वल आपल्या भेटीला येणार आहेत. ज्यात ‘जत्रा २’, ‘बॉईज ३’, ‘चोरीचा मामला २’, ‘मस्का २’ आणि ‘बघतोस काय मुजरा कर २’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सर्रास वापरला जाणारा सिक्वलचा हा फॉर्म्युला मराठीत किती प्रभावी ठरतो हे यावर्षीच्या अखेरपर्यंत आपल्याला कळेल, तोवर ऑगस्ट महिन्यातला हा सिक्वल महोत्सव एन्जॉय करणं, इतकंच काय ते आपल्या हातात ….

First Published on: August 7, 2022 4:30 AM
Exit mobile version