गाव माझं न्यारं..

गाव माझं न्यारं..

रम्य वाटे मजला, गावा मधली पहाट
हिरवळीच्या पाटावर,पक्ष्यांचा किलबीलाट
कौलारू या घरावरती, किरणांचा थाट
प्राजक्त, चाफ्याची अंगणामध्ये बरसात..

पहाटेचा आल्हाददायक शीतल वारा, रानपाखरांची किलबील, सळसळत्या हिरव्यागार पानांनी केलेला दवबिंदूंचा रत्नजडीत शृंगार, दोन डोंगरा अडून डोकावणारा केशरवर्णीत सूर्य, कोण्या एका कौलारू घरातील स्वयंपाक घराच्या कोनाड्यातून येणारा पांढुरका, उष्ण धूर, दंव पिऊन पालवलेल्या वेली, पाने, फुले, अंगणात शिंपडलेला पांढरा शुभ्र प्राजक्त सडा, चाफ्याची मखमल…आहाहा… !! स्वप्नामधले गाव तरी यापेक्षा वेगळे काय असणार. गाव या शब्दातच सामावलेली आहेत, जिवाला जीव देणारी माणसं अन् नवरंगांची मुक्तपणे लयलूट करणारा तजेलदार निसर्ग..!

कितीही शहरीकरण झाले तरी गावाकडल्या जीवनमानाची सर आधुनिक सिमेंटच्या जंगलात येऊ शकत नाही. उन्हाळा असो अथवा पावसाळा वा हिवाळा या ऋतूचक्रानुसार सृष्टीत होणारे नखशिखांत बदल अनुभवायचे असतील तर गावाशिवाय पर्याय नाही. शालेय जीवनात ऐकलेली मामाच्या गावाला जाऊयासारखी गाणी आपली नाळ नकळत ग्रामीण जीवनाशी जोडतात. हे खास करून शहरात वाढणार्‍या मुलांच्या बाबतीत लागू होते. परंतु, ज्यांचा जन्म गावातलाच आहे त्यांना जन्मजातच हे सुंदर देणे लाभलेले असते.

इथली सकाळ, दुपार, संध्याकाळ पाहताना वाटते, लग्न मंडपात नटून बसलेली नववधू ज्याप्रमाणे दिवसभरात तीनदा पेहराव बदलते. त्याप्रमाणे या तीनही प्रहरात सृष्टीचा वेगळाच थाट दृष्टीस पडतो अन् पाठवणीचा कार्यक्रम सुरू झाल्यावर नवरीला हुंदका आवरेनासा होतो, अगदी तशीच जीवाला कातरणारी निरव, शांत कातरवेळ येते. ही नववधू म्हणजेच आपली वसुंधरा. मग, रात्री या निलांबरीचे चांदण्यांच्या वर्षावाने स्वागत केले जाते. माझे बालपण,शिक्षण मुंबई शहरात झाले असले तरी हे स्वप्नातले गाव माझ्याही भाग्यात आहे. शाळेला सुट्टी पडली की आम्ही थेट गावाकडेच धाव घ्यायचो त्यामुळे तिथल्या संस्कृतीचे,जीवनशैलीचे बारकावे टिपणे शक्य झाले. कोकणात मोठ्या जोमाने साजरा होत असलेले गणेशोत्सव, शिमगोत्सव नंतर वेध लागतात ते श्री हनुमान जयंतीपासून सुरू होणार्‍या गावाकडील जत्रांचे.

जत्रा म्हटली की, लहान थोरांपासून प्रत्येकाचाच जिव्हाळ्याचा विषय. तेथील विविध खाद्यपदार्थ, खेळणी, कपडे, स्त्री शृंगाराचे साहित्य, तमाशाच्या बार्‍या, तंबूतले सिनेमे इ. प्रकारची जीवनावश्यक, मनोरंजनात्मक वस्तूंची दुकाने एकाच ठिकाणी दिमाखात उभी राहिलेली पाहिल्यावर वाटते, शहराकडे जे उंची माँल, मल्टीप्लेक्स आढळतात ते जत्रेतील बाजाराचेच आधुनिकीकरण असावेत.

या मेळ्यातील खास आकर्षण काय असेल तर..गोलाकार, भव्य दिव्य दिसणारे व रात्रीच्या काळोखाचा घनदाट पडदा बाजूला सारत रोषणाईचे झुंबर लेवून डोळ्यांचे पारणे फिटवणारे आकाश पाळणे. लहान मुलांना तर त्याचे फारच अप्रूप असते. गावाकडील जत्रा म्हणजे जगण्याच्या रखरखीत उन्हात चैतन्य सुखद क्षणांची पखरण करणारी शितल सावली अन् आनंदाचा मळा फुलवणारी संजीवनीच..! पंचक्रोशीतून सर्व जातीधर्माची, सर्व वयोगटातील लोक या मेळ्यामध्ये उत्साहाने हजेरी लावून सामाजिक एकोप्याची ग्वाही देतात. काही व्यापार्‍यांकरीता तर आर्थिक व्यवहार करण्यास हे मोक्याचे ठिकाण असते. गावागावात निरनिराळ्या पध्दतीने धार्मिक प्रथा तिथल्या चालीरीतींना अनुसरून पार पाडल्या जातात. त्यामुळे या जत्रांना धार्मिक कोंदण लाभलेले असते.

अशाच काही प्रथा माझ्या कोकणात मंडणगड तालुक्यातील लाटवण या गावात प्रचलित आहेत. जत्रेच्या दिवशी पंचक्रोशीतील विभागातून बांबूच्या काट्या सुंदर पध्दतीने सजवल्या जातात. त्या काट्या ग्रामदेवतेच्या नावाने सजवून वाजत-गाजत जत्रेच्या ठिकाणी आणून त्यांना आपापसात भेटवले जाते. या काट्या भेटवल्यावर पाच गावांतील दैवतं एकमेकांना भेटतात अशी गावकर्‍यांची श्रध्दा आहे.

चैत्र पौर्णिमेच्या दिवशी पहाटेस, एका उंच खांबावर दुसरा खांब आडवा बांधून त्यास शिंकाळीचे स्वरूप देतात आणि त्या शिंकाळीवर एका गावकर्‍याला लटकवतात. तो गावकरी देवीच्या नावाने उपवास करून, मोठ्या भक्ती भावनेने हा कार्यभाग उत्तम करण्यास सहकार्य करतो. मग, त्याच्या हातात असलेल्या दुधाने भरलेल्या घागरीतून मंद दुधारी सरीचा वर्षाव तेथील ग्रामदेवता कालकाई मातेच्या मूर्तीवर केला जातो. हा दुग्ध अभिषेक संपन्न झाल्यावर देवीला पाच प्रदक्षिणा व्हाव्या ह्या हेतूने, त्या लाकडी शिंकाळ्याची दोरी पकडून असलेले गावकरी त्या उपवासकर्‍याला पाच वेळा मूर्ती भोवती फीरवतात. मागोमाग गावातील इतर लोक या फेर्‍यांमध्ये सहभागी होतात. यालाच आमच्या येथे लाट फिरणे असे म्हणतात. अशा तर्‍हेने जत्रेत संस्कृतीचा जागर केला जातो. सारे वातावरण दुमदुमते. अशा प्रसंगी मनात कविता फेर धरू लागते.

गावच्या जत्रेची तर्‍याच न्यारी, उत्साहाच वारं वाहतंय भारी..
सणासुदीची लगबग सारी, चमचमणारी किमया न्यारी..
गावागावात चुरस खरी, मंदिरात गजर
हरी हरी..
मानपानाचे नाट्य क्षणभरी, आनंद चित्र जनांच्या उरी..
अहो म्हणतात,
गावची जत्रा,भानगडी सतरा..
असे गोंधळ असा जरी,
घेऊन आनंद दोन घडीचा..
खुशाल आहे गावकरी…!

असा हा मातीशी नाळ जोडून ठेवायला लावणारा आपला गाव. माणसाचा जन्म मातीतूनच होतो व शेवटी या मातीतच विलीन व्हावे लागते. गंमत म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या यांच्यामधील प्रवास करताना ह्या काळ्या मातीच्या उदरातून उगवलेले पीकच आपल्याला जगवते. त्यामुळे शहरीकरणाच्या हव्यासापोटी गाव नावाचा गोजिरवाणा प्रांत नामशेष होता कामा नये.

शहरातील झगमगाट पाहून थकलेल्या डोळ्यांना शांत नीज येण्यासाठी, जीवघेण्या स्पर्धेत पायपीट करून झाल्यानंतर विश्रांती घेण्यासाठी, खचलेल्या मनाला तणावमुक्त करून नव्या उमेदीची उभारी देण्यासाठी, एक तरी गाव असावं..गावातल्या टुमदार घरट्यात मायेचं गोकुळ वसावं..!

मी शहरात राहत असले तरी, मनाने माझ्या सुंदर गावाशी कायम जोडून आहे. कारण, ती माझी माय..काळी आई, तो हिरवळीचा बादशाह माझा निसर्गराजा, ती जीवाला जीव देणारी माणसं, तो गावचा परिसर हृदयाच्या पटलावर गोंदवून ठेवला आहे. आठवणींच्या हिंदोळ्यावर स्वार होऊन झोके घेताना गावातील चिंचेच्या झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर असल्याचा भास होतो. अवखळ वारा झुला उंच उंच नेतो, रानातल्या करवंदाच्या जाळीत घेऊन जातो.

–कस्तुरी देवरुखकर 

First Published on: May 15, 2022 6:20 AM
Exit mobile version