व्यासांचा वारसा

व्यासांचा वारसा

‘आता आपण चाळीसी पार करुन एकेचाळीसीच्या उंबरठ्यावर उभे आहोत. थोडेफार आयुष्याचे आणि बर्‍यापैकी पुस्तकांचे वाचन झाले आहे. म्हणजे एखाद्या पुस्तकाच्या पहिल्या भेटीत हबकून किंवा वेडावून जाण्याचा ऋतू तसा ओसरला आहे…’ ही आमची स्वतःबद्दलची सर्वसाधारण धारणा. पण या धारणेला जोराचा हादरा देण्याचे काम एका पुस्तकाने केले. आनंद विनायक जातेगावकर यांचे ‘व्यासांचा वारसा’ हे त्याचे नाव. व्यासांच्या महाभारतातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्यातील परस्परसंबंधांचा ललित अंगाने वेगळा अन्वय उलगडून दाखविणारे हे पुस्तक! व्यासांचा वारसा हे पुस्तक 2009 मध्ये प्रकाशित झाल्यापासून त्याच्याबद्दलची बरी-वाईट मते चर्चेत होती. तेव्हापासून हे पुस्तक वाचण्याची उत्सुकता होतीच. ती परवा शमली. उत्सुकता शमली, पण त्याचा परिणाम अद्याप धगधगताच आहे.

कुंती, द्रौपदी, भीष्म, कर्ण, युधिष्ठिर आणि कृष्ण….अशा ज्या-ज्या व्यक्तिरेखांबद्दल आपल्या मनात आदर आणि आत्मियतेचे स्थान आहे, त्याला जबरदस्त हादरा देण्याचे काम हे पुस्तक करते. खरेतर जातेगावकरांनी उलट्या-पालट्या करून टाकलेल्या सगळ्याच व्यक्तिरेखांबद्दल लिहायला हवे; परंतु जागेची मर्यादा आणि गोकुळाष्टमीचे औचित्य यामुळे आपण फक्त कृष्णाच्या व्यक्तिरेखेचा थोडक्यात विचार करू.

केवळ भक्त किंवा भाविकच नव्हे तर सर्वसामान्य माणसाच्या मनात राम आणि कृष्ण या दोघांबद्दल काहीएक आदरभाव आहे.‘व्यासपर्व’मध्ये दुर्गा भागवतांनी म्हटले आहे, ‘कृष्णचरित्र एकाच एका ग्रंथात कोंडून पडलेले नाही. अनेक ग्रंथांनी, काव्यांनी, नरनारींच्या जीवनांनी तिळतीळ देऊन ते बनवले आहे…कारण कृष्ण हा नुसता मानव नाही, तर पुरुष आहे. पूर्णपुरूषआहे.’

बाळकृष्ण, गोपालकृष्ण, गोपीकृष्ण, राधाकृष्ण, तत्वज्ञ कृष्ण अशी कृष्णाची निरनिराळी रूपे आहेत.‘व्यासांचा वारसा’मध्ये जातेगावकर बाल-गोपाल-गोपी-राधा-कृष्णाबद्दल बोलत नाहीत, कारण कृष्णाची ही रूपे महाभारतपूर्व आयुष्यातील आहेत. त्यांचा भर आहे व्यासांनी महाभारतात रेखाटलेल्या कृष्णाच्या व्यक्तिरेखेवर.

272 पृष्ठांच्या या पूर्ण पुस्तकात ते कुठेही कृष्णाकडे ‘भगवान कृष्ण’ म्हणून पाहत नाहीत. दुर्गाबाईंप्रमाणे ‘पूर्णपुरूष’ किंवा राम शेवाळकर यांच्याप्रमाणे ‘आदर्श आणि व्यवहार यांच्यात समन्वय घडवून आणणारा समन्वयकार’ या रूपातही ते कृष्णाकडे पाहत नाहीत. तर प्रसंगी तत्वज्ञान, नीती, तर्क आणि गरजच पडली तर जबरदस्त उपयुक्ततावाद यांचा अतिशय चलाखीने वापर करणारा चतुर राजकारणी (मुत्सद्दी) यारुपात ते कृष्णाला आपल्यापुढे ठेवतात. महाभारतातील सार्‍या घटितांना आणि अखेरच्या युद्धालाही आपल्याला हवी तशी दिशा देणारा कृष्ण हा त्यांना महाभारताच्या सगळ्या कटाचा सूत्रधार वाटतो.

दोन्ही सैन्यात आपलीच माणसे दिसू लागल्यावर अर्जुनाच्या मनातील आस्था, करुणा जागी होते. त्याच्या तोंडाला कोरड पडते. हातपाय थरथरू लागतात.‘युद्ध नकोच’ या निकराच्या भावनेपर्यंत तो येतो. तेव्हा अशा शस्त्र त्यागून ‘संवेदनशील, सहिष्णू, कणवाळू’ बनलेल्या अर्जुनाला ‘शस्त्राळू’ बनविण्यासाठी कृष्ण सायकॉलॉजिकल अर्ग्युमेंट्सची दीर्घ मालिका उभी करतो. ही मालिका म्हणजे ‘भगवद्गीता.’

निखळ मानवी, भावनिक प्रश्नांना परिघावर फेकण्यासाठी कृष्ण जबरदस्त तर्क पेश करतो. तर्क पहिला, युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. दुसरा, युद्धात प्राण गेला तर स्वर्गाचा धनी होशील आणि जिंकलास व जिवंत राहिलास तर पृथ्वीचे राज्य भोगशील. तिसरा, आजोबा, पणजोबा, गुरू यांच्यावर कसे शस्त्र चालवू म्हणून तू विचलित होतो आहेस ना? पण लक्षात घे, तू मारायचं ठरवलं तरी ते काही मरणार नाहीत. कारण मरते ते शरीर; आत्मा तर अमरच राहणार आहे. चौथा, म्हणून शरीराला मारायचे पाप तुला थोडेच लागणार? पाचवा, जास्त विचार करू नकोस. सुखाच्या आशेने लढू नकोस किंवा दुःखाच्या भीतीने पळू नकोस. हारजीत समान मानून युद्ध कर. ‘सुखदु:खे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ.’

मानवता धर्माला धरून असणारे अर्जुनाचे स्वाभाविक प्रश्न बिनतोड युक्तिवादाच्या बळावर कृष्ण बाद ठरवतो, युक्तिवादाची ही लढाई अर्जुन हरतो, कृष्ण जिंकतो.

हे केवळ अर्जुनाच्याच बाबतीत घडते असे नाही. तर युधिष्ठिर आणि भीम यांनाही तो तर्काचे तीर्थ पाजून असेच चीत करतो. युद्धासाठी ‘सैन्याच्या जमवाजमवीला लागा’ असा निरोप कृष्ण जेव्हा पांडवांना देतो. तेव्हा भीम उत्स्फूर्तपणे उद्गारतो,‘आपण आधी सामोपचाराने घेऊन पाहू…सगळे उपाय खुंटले तरच आपण लढू.’ भीमाचा हा सामोपचार कृष्णाला खटकतो. अशावेळी तर्काच्या जोडीला उपरोधाचे अस्त्र बाहेर काढत तो म्हणतो, ‘का रे, ते कौरव म्हणतात तशी झालीय का काही गडबड? किन्नरपणाची?’ म्हणजे युद्ध नको म्हणणार्‍याच्या पुरुषत्वावर शंका घेत कृष्ण त्यांना खुशाल स्त्रैण ठरवतो.

कर्णाला नेमक्या क्षणी त्याचे जन्मरहस्य सांगून त्याच्या मानसिकतेवर ‘कीलर अटॅक’ करतो. साम, दाम, दंड, भेद वापरून भीष्म, द्रोण, दुर्योधन यांचा काटा काढतो. तर युद्धात झालेला सर्वनाश पाहून हळहळणार्‍या युधिष्ठिराला ‘कोणत्याच प्रेताच्या पाठीवर जखमा नाहीत. म्हणजे शत्रूशी लढतांना त्यांचा प्राण गेला…आता तू रडून त्यांचा अपमान करू नकोस’ असा सल्ला देतो.

म्हणजे युधिष्ठिर, भीम, अर्जुन यापैकी कुणालाही युद्ध नको होते, पण ते कृष्णाला हवे होते. अशावेळी संवेदनेला आवाहन करणार्‍या भावनेला बाजूला सारून बुद्धीच्या जोरावर ‘कन्व्हीन्सिंग अर्ग्युमेंट्स’ करत कृष्णानेच हे युद्ध घडवून आणले असे जातेगावकर म्हणतात.

अखेर युद्ध झाले. प्रचंड मानवसंहार होऊन ते संपले. परंतु युद्धानंतर काय झाले? याची चर्चा आपण सतत टाळत राहतो असे जातेगावकर नोंदवतात. युद्ध संपल्यानंतर कित्येक वर्षे उलटली तरी धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, संजय, विदूर, पांडव आणि द्रौपदी यांच्या मनातील दु:खे संपली नाहीत. उलट वाढत गेली.

कृष्णाच्या नियोजनाप्रमाणे पांडवांना अखेर राज्य मिळाले. पण त्याचा उपयोग काय? उपभोग जरी घ्यायचा म्हटला तरी मन तयार हवं, आनंदी हवं; पण अनिच्छेने केलेले युद्ध आणि ते जिंकल्यानंतरही न संपणारा मनातील अपराधभाव…यांना घेऊन पांडव काय राज्य करणार होते? म्हणून शेवटी काय झाले?

…तर कृष्ण बिनतोड तर्क करून अर्जुनाला जे सांगत होता तसे काही झालेच नाही. युद्ध जिंकले पण पृथ्वीचे राज्य भोगण्याची अर्जुनाची लालसाच राहिली नाही. स्वर्गारोहणाच्या रोमँटिक कल्पनेचे म्हणाल तर तीही अपुरीच राहिली. परिणामी तत्वज्ञ कृष्णाचा जो ‘युटोपिया’ होता, त्याची अंतिम परिणती काय? तर ‘अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी!’

बरं हे झालं पांडवांचं. कृष्ण ज्यांचा अग्रपुरुष होता त्या यादवांचं काय झालं? तर यादवी म्हणजे आपापसात तुफान हाणामार्‍या अन् त्यातून अखेर सर्वनाश. आणि कृष्ण? त्याच्या कहाणीचा शेवट तर किती करुण आहे! यादवी, हिंसा आणि रक्तपात पाहून उबग आलेला कृष्ण कमालीचा एकाकी होतो आणि अखेर जरा नावाच्या व्याधाचा (शिकार्‍याचा) बाण लागून विकल अवस्थेत मरण पावतो !

ही आहे आनंद विनायक जातेगावकर यांची ‘व्यासांचा वारसा’ या पुस्तकातील कृष्णाची व्यक्तिरेखा. योगेश्वर कृष्ण, अवतारी कृष्ण, भगवान कृष्ण या रूपांत कृष्णाकडे शतकानुशतके पाहत आलेल्या समाजमनाला जबरदस्त ‘कल्चरल शॉक’ देण्याचे काम ही व्यक्तिरेखा करते. पण त्याचवेळी ‘कॅरक्टर इज डेस्टिनी’ (म्हणजे मूळ स्वभाव हीच नियती) अशा नव्या लोलकातून महाभारताकडे पाहण्यासाठीचे अवकाशही खुले करते.

‘व्यासांचे शिल्प’मध्ये नरहर कुरुंदकरांनी म्हटले आहे, ‘श्रीकृष्णाचे चरित्र मोठे लोकविलक्षण आहे. त्यात इतक्या परस्परविरोधी गोष्टी आहेत की त्याला लबाडांचा शिरोमणीही ठरवता येते आणि गणतंत्राचा नेताही…’ यामुळे त्याचे ‘परमात्मापण’ बाजूला सारून कृष्णचरित्राकडे मोकळेपणाने पाहण्याची अपेक्षा कुरुंदकरांनीही व्यक्त केलेली आहे.

म्हणून कृष्णाच्या व्यक्तिरेखेकडे मानवीपणातून परमेश्वरत्वाकडे होणारा प्रवास या रुपात पाहण्यापेक्षा ती प्रेषितत्त्वाकडून मानव्याकडे सुरू झालेली यात्रा आहे असेही पाहता येऊ शकतेच की ! यासाठी ‘सामूहिक नेणीव’ बनून राहिलेल्या व्यासांचे आपण आभारच मानायला हवेत. कारण या महाकाव्याच्या रचनेत त्यांनी एवढ्या ‘मोकळ्या जागा’ ठेवल्या आहेत की त्याचे ‘रीडिंग बिटवीन द लाईन्स’ करत राहिल्यास नवनवीन अर्थांचे अवकाश आपण शोधू शकतो!

First Published on: December 13, 2020 5:20 AM
Exit mobile version