तेलही गेले,तूपही गेले!

तेलही गेले,तूपही गेले!

राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी सातत्याने तारखांचे वायदे करणार्‍या भाजप नेत्यांचे कमळ विधान परिषदेच्या निवडणुकीत पुरते कोमजले आहे. सहाच्या सहा जागा जिंकण्याची वल्गना करणार्‍या भाजप नेत्यांना सुशिक्षित मतदारांनी जागा दाखवली आहे. इतका दारूण पराभव आजवर भाजपने कधी पाहिला नव्हता. यामुळे तो सध्या पचवणं त्या पक्षाच्या नेत्यांना अवघड जाणं स्वाभाविक आहे. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून वरिष्ठ अधिकार्‍यांना आपल्या कार्यालयात बोलवायचं वा त्यांच्या कार्यालयात जथ्याने जायचं आणि तिथे सरकारच्या अस्तित्वाची चर्चा करायची असा बालीश खेळ भाजप नेत्या आमदारांनी सुरू केला होता. जेेणेकरून अधिकार्‍यांना या सरकारच्या अस्तित्वाचा संशय यावा. एक वर्ष होऊनही सरकार पडलं नाही. आता मुहूर्त काढणार नाही, त्यांच्या कर्मानेच पडतील, असा रडीचा शब्द माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. दुसरे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तर कमालच केली. पाडापाडीचे उद्योग हेच आपलं काम असल्यागत त्यांची बोलती सुरू असते. असल्या वक्तव्यांचा परिणाम पक्ष नेत्यांच्या विश्वासार्हतेवर होत असतो, याची जाणीव भाजप नेत्यांना जोवर येत नाही तोवर कोण काय बोलेल याचा पत्ता लागणार नाही.
शुक्रवारी निकाल लागलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचारात भाजपच्या नेत्यांनी टीकेचा मार्ग पत्करला. एकीकडे प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील काहीबाही बडबडत असताना दुसरीकडे दरेकर, अतुल भातखळकर आणि राणेंची मुलं त्यात खालच्या पातळीवर टीका करत भर घालत होते. शुचिर्भूत असलेल्या पक्षातील नेत्यांकडून इतक्या खालच्या पध्दतीची टीका होऊनही त्यांना कोणीच कसं विचारत नाही, असा प्रश्न राज्यातल्या जनतेला पडला आहे. निवडणूक हरल्यानंतर किमान मौन पाळावं. कारण पराभवाचं परिमार्जन हे दु:खात मोजलं जातं. पराजयाची चिकित्सा करायची असते. आत्मपरीक्षण करण्याची गरज असते. ते करण्याऐवजी विरोधी पक्षनेते आता सरकार पाडण्याचा मुहूर्त नाही थेट कृती करणार, असं बोलू लागले आहेत.
अति घाई संकटात नेई, असं म्हटलं जातं. भाजपच्या बाबतीत ते खरं ठरत आहे. धुळे-नंदुरबार मतदारसंघातील अमरिश पटेल यांच्या विजयानंतर राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता आता संपेल असं सांगणार्‍या भाजपच्या नेत्यांची बोलती नंतरच्या निकालांनी बंद करून टाकली. अमरिश पटेल काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेस सोडून भाजपात प्रवेश केला. या मतदारसंघातील विजय हा भाजपचा नसून व्यक्तिगत पटेल यांचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात धनशक्तीचा विजय होतो, हे वारंवार स्पष्ट झालं आहे. एखाद्या पक्षाकडे कितीही मतं असली, तरी त्यांचा उमेदवार पैसा खर्च करणारा नसेल, तर तो निवडणुकीला तोंड देऊ शकत नाही. पैशाशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं शक्य नसतं हे या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेसला कळलं असेल.
राज्यातील सत्ता गेल्यापासून हाती असलेल्या संस्था भाजप राखू शकला नाही. आता तर निवडणुकीत ५५ वर्षांचा दावा करणार्‍या विदर्भाला राखणंही भाजपला शक्य झालं नाही. भाजपची गेली तीन दशकं सत्ता असणारी संस्थाने खालसा झाली. नितीन गडकरी, जयसिंगराव गायकवाड, प्रकाश जावडेकर, चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्यांनी ज्या मतदारसंघांचं प्रतिनिधित्व केलं, ते मतदारसंघ गमवावे लागले आहेत. मागच्या निवडणुकीत बंडखोरी झाल्याने चंद्रकांतदादांचा विजय झाला होता, त्याचा वचपा आता राष्ट्रवादी काँग्रेसने काढला. काँग्रेसचा धुळे-नंदुरबार मतदारसंघात पराभव झाला असला, तरी त्या पक्षाने नागपूर पदवीधर आणि पुण्यातील शिक्षक मतदारसंघाची जागा पदरात पाडून घेऊन हिशोब बरोबरीत आणला आहे.
कोणत्याही परिस्थितीत उमेदवार पडता नये, म्हणून चंद्रकांतदादा आणि जयंत पाटील या दोन प्रदेशाध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. चंद्रकांत पाटील यांनी तर कोल्हापूर सोडून पुण्यात तळ उभारण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही त्यांनी कोल्हापूरऐवजी पुण्यातून उमेदवारी अर्ज भरला. पुढे विधानसभेत निवडून येण्यासाठी त्यांनी कोल्हापूरचा धोका पत्करला नाही. राज्यातील सर्वात सुरक्षित मतदारसंघ समजल्या जाणार्‍या कोथरूडमधून त्यांनी निवडणूक लढवली. आपली कर्मभूमी सोडून पाटील कोथरूडमध्ये पोहोचले तेव्हा अनेकांच्या संधी त्यांनी खेचून घेतल्या. मेधा कुलकर्णी यांना तर विधान परिषदेचं आश्वासन देण्यात आलं. पण तेही पूर्ण करण्यात आलं नाही. नंतर पुणे जिल्हा भाजप महिला अध्यक्षपद देण्याची आशा दाखवण्यात आली. पण तेही केले नाही. दिलेल्या आश्वासनांची वासलात लावताना आता तर मेधा कुलकर्णींना वार्ड बैठकांनाही येऊ दिलं जात नाही.
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात जयंत पाटील यांनी प्रतिष्ठा राखली. पदवीधर मतदारसंघ आतापर्यंत भाजपचे बालेकिल्ले होते. त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं सुरुंग लावले. नाशिक पदवीधर मतदारसंघ डॉ. सुधीर तांबे यांनी भाजपकडून हिसकावून घेतला, तर सतीश चव्हाण यांनीही औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ भाजपकडून काढून घेतला. चव्हाण यांनी तिसर्‍यांदा विजय मिळवून हॅट्ट्रिक केली. त्याअगोदर भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत हातात घड्याळ बांधलं. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय. या मतदारसंघातून नितीन गडकरी यांनी प्रतिनिधित्त्व केलं. काँग्रेसनं वंचित आघाडीतून आलेल्या अभिजीत वंजारी यांना उमेदवारी दिली. त्यावरून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी थेट प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली होती. त्याच वंजारी यांना ५५ हजार ९४७ मतं मिळाली आहेत, तर भाजपचे उमेदवार संदीप जोशी यांना ४१ हजार ५४० मतांवर समाधान मानावं लागलं. वंजारी यांचा विजय म्हणजे फडणवीसांचा पराजय समजला जातो. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मानला जात असताना, वंजारी यांचा विजय म्हणजे ५५ वर्षांच्या कामगिरीवर पाणीच होतं.
धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या पटेल यांना ३३२ मतं मिळाली. काँग्रेसचे अभिजित पाटील यांना केवळ ९८ मतं मिळाली. पटेल यांनी विरोधकांची ११५ मतं फोडण्यात यश मिळवलं. या निवडणुकीसाठी भाजपच्या १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केलं होतं. त्यात महाविकास आघाडीच्या आणि विशेषत: काँग्रेसच्या ५० हून अधिक मतदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. काँग्रेसचं संख्याबळ १५७ असतानाही पाटील यांना केवळ ९८ मतंच मिळाली. महाविकास आघाडीच्या अंदाजे ११५ मतदारांनी क्रॉस व्होटिंग केलं. महाविकास आघाडीची २१३ मतं असतानाही पाटील यांना शंभरीही गाठता आली नाही. औरंगाबाद पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचा दारुण पराभव करत चव्हाण यांनी सलग तिसर्‍यांदा निवडून येण्याचा बहुमान मिळवला आहे. चव्हाण यांना १ लाख १८ हजार ६३८ मतं मिळाली, तर बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मतं मिळाली. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि भाजपत बंडखोरी होऊनही राष्ट्रवादीच्या उमेदवाराने दुप्पट मतं मिळवित विजय मिळविला. राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता पडायचा मुहूर्त काढणार्‍या भाजपला विधान परिषदेच्या हक्काच्या जागाही गमवाव्या लागल्या, त्यामुळे त्यांची अवस्था तेलही गेले आणि तूपही गेले अशी झाली आहे.

First Published on: December 6, 2020 8:20 PM
Exit mobile version