मंदीचा लांडगा आला रे आला!

मंदीचा लांडगा आला रे आला!

– सायली दिवाकर

‘लांडगा आला रे आला!’ ही खोडकर गुराख्याच्या मुलाची कथा सर्वांनाच परिचित आहे. ‘लांडगा आला रे आला!’ म्हणत गुराख्यांना घाबरवणारा मुलगा ज्याप्रमाणे गुराख्यांच्या डोकेदुखीचा विषय बनला होता, अगदी तसाच डोकेदुखीचा विषय सध्या आयटी क्षेत्रातील नोकरदार वर्गाला ‘जॉब ले ऑफ’मुळे सहन करावा लागत आहे. ‘लांडगा आला रे आला!’ या आरोळीप्रमाणेच जॉब गेल्याचा मेल कधीही येईल या भीतीच्या दहशतीखाली बहुतांश नोकरदार वर्ग सध्या जगत आहे. खरंतर नावाजलेल्या आयटी कंपनीतील ‘ड्रीम जॉब’ जेव्हा मिळतो तेव्हा आता सर्व स्वप्नांची पूर्ती होणार अशी आस निर्माण झालेली असते यात शंकाच नाही.

लाखो रुपयांचे पॅकेज, मेट्रोसिटीत वास्तव्य, देशी-परदेशी विमान प्रवासाची मौज, तर शनिवार-रविवारच्या सुट्टीमुळे कुटुंबासोबत धमाल मस्ती करण्याची संधी, अजून काय हवे जगायला. ‘लाईफ तो सेट है भाऊ!’ म्हणत आयटीमध्ये जॉब करणारा जणू हवेतच जातो असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे ह्या भुरळ पडणार्‍या जीवनशैलीमुळेच प्रत्येक कुटुंबात आपलं लहान मुल शाळेत जाण्याआधीच बहुतांश आई-बाबा आपल्या मुलाला आयटी क्षेत्रातील नोकरीची स्वप्न दाखवायला सुरुवात करीत असतात. त्यामुळे ‘भरमसाठ पगाराची नोकरी’ हे एकमेव ध्येय प्रत्येक घरातील मुलांसमोर असते आणि याच मानसिकतेत मुलांची जडणघडण होत असते.

सध्या काही महिन्यांपासून आयटी क्षेत्रातील मोठमोठ्या कंपन्यांमधून प्रचंड प्रमाणात कामगारांना काढून टाकण्याचा सपाटा सुरू आहे. अमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, मेटा, सिस्को, ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, झोमॅटो, स्विगी अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी कर्मचार्‍यांना कामावरून कमी केले आहे. त्याचबरोबर त्यातील काही कंपन्यांनी नवीन भरती कमी केली आहे किंवा सध्या नवीन भरतीच स्थगित केली आहे. अशी विचित्र संभ्रमात टाकणारी परिस्थिती सध्या नोकरदार वर्गासमोर निर्माण झाली आहे. म्हणजेच ज्यांची नोकरी अजूनही गेली नाही, त्यांच्या डोक्यावर नोकरी जाईल याची टांगती तलवार लटकत आहे, तर जे फ्रेशर्स आहेत त्यांना नोकरी मिळेल का याची काळजी वाटत आहे आणि सगळ्यात वाईट अवस्था अशा कर्मचार्‍यांची आहे ज्यांनी आयटी क्षेत्रातील नोकरी मिळवूनदेखील आज ती गमावलेली आहे.

परिस्थितीनुसार जॉब ले ऑफ, जागतिक मंदी, महागाई, रुस-युक्रेन युद्धाचा परिणाम अशी अनेक कारणे असतात सध्याच्या मुलांच्या करियरचा बॅन्डबाजा वाजवायला, पण अशा वेळी ह्या मुलांनी आपली मनःस्थिती कशी मजबूत ठेवायची याची शिकवणूक आई-बाबांनी आवर्जून आपल्या मुलांना दिली आहे का? आताच्या इन्स्टंट जमान्यात हल्ली ‘भावना’देखील इन्स्टंट झाल्या आहेत. नोकरी गेली की लगेच आयुष्य उद्ध्वस्त होऊन आत्महत्येचे विचार मनात घोळायला लागतात. डिप्रेशन, निराशा, काळजी, आयुष्यात आता काहीच उरलं नाही असं वाटायला लागून कुटुंबातील लोकांच्या नजरेस नजर देणेदेखील लाजिरवाणं वाटू लागतं. अशा बिकट परिस्थितीत ह्या युवावर्गाला कोण सावरणार, असा प्रश्न सतावत असतो.

कारण आजच्या धावत्या युगात ‘लांडगा आला रे आला!’ अशी दडपणाची स्थिती आयुष्यात वेळोवेळी असणारच आहे, मग वेळोवेळी ‘संकटरूपी लांडगा’ समोर आला तर नेमकी परिस्थिती कशी हाताळायची याचे धडे आयुष्यात मुलांना दिले जातात का? मोठ्या पगाराची नोकरी म्हणत म्हणत कळत नकळत लहान मुलांचे बालपण कोमोजून टाकले जाते, तर तारुण्य करियरच्या बागुलबुवामागे धावण्यात करपून टाकले जाते. त्यानंतर नोकरी मिळवून थोडंबहुत स्थिरस्थावर होईल असे वाटत असतानाच अनेक वावटळी नोकरीच्या वाटेवर घोंगावत असतात. अशा वेळी ह्या मुलांनी परिस्थिती कशी हाताळावी, असा प्रश्न कुणालाच सतावत नाही का?

कथेतील नटखट गुराख्याचं पोर जसं ‘लांडगा आला रे आला!’ अशी आरोळी देऊन भीतीचे वातावरण बाकीच्या गुराख्यांत निर्माण करीत होतं, त्याच पद्धतीने नामांकित कंपन्यांनी ‘मंदी आली रे आली!’ची भीती दाखवत झपाझप नोकर कपात सुरू केली अन् सगळीकडेच भीतीचं वातावरण निर्माण झाले, परंतु तसं पाहिलं गेल्यास एखाद्या कंपनीत नोकर भरती व नोकर कपात ह्या सामान्य घटना आहेत. कंपनीच्या भविष्याच्या तरतुदीसाठी हे आवश्यक असते, परंतु माणसाच्या आयुष्यात नोकरी जाण्याचा दणका इतका मोठा असतो की ह्या बसलेल्या दणक्यातून सावरणे खूप अवघड होऊन बसते आणि त्यातल्या त्यात आयटी कंपनीतील जॉब जेव्हा जातो तेव्हा तर आयुष्यभरासाठी तो धब्बा तसाच राहतो. कारण इतकी मोठी संधी, भलामोठा पगार आणि ह्या पगाराच्या आकड्यांवर मांडलेला लग्नाचा डाव सगळंच एका क्षणात उद्ध्वस्त होण्याची संभावना नाकारली जाऊ शकत नाही.

खरंतर कित्येक युवावर्ग असा आहे ज्यांना नोकर्‍या नाहीत किंवा नोकरी असली तरी ते स्वतःचा खर्च कसाबसा भागवत आहेत. कित्येकांना नोकरी चांगली नाही म्हणून लग्न जुळत नाही. म्हणजेच युवावर्गाला करियरमध्ये खूप सार्‍या समस्या आहेत व असणार आहेत, परंतु ही परिस्थिती सावरायची कशी याचे शिक्षण महत्त्वाचे आहे. कारण सध्याचे तांत्रिक युग हे परिवर्तनशील आहे. सतत नवीन बदलांना या नव्या पिढीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वतःला सतत अपडेट करीत राहणे गरजेचे आहे. बारकाईने लक्षात घेतले तर असे दिसून येते की जे कर्मचारी कंपनीचे काम व्यवस्थित करीत आहेत, अशा सिन्सियर कर्मचार्‍यांना कामावरून काढले नाही.

जसे की अ‍ॅलन मस्कने ट्विटर कंपनी ताब्यात घेताच धडाधड कर्मचारी कपात सुरू केली, असा आरोप त्यांच्यावर लावला गेला, परंतु जमेची बाजू ही आहे की ७४०० कर्मचार्‍यांपैकी ३७०० कर्मचार्‍यांना नोकरीवरून फायर केले, पण बाकी अर्ध्या लोकांना कामावर ठेवले ना? कष्टाळू, वक्तशीरपणा आणि हरहुन्नरी कर्मचारी कंपनी का गमावेल? चांगले कौशल्य असणारे कर्मचारी कंपनीला हवेच आहेत. बहुतांश नोकरदार वर्ग कामात सतत चुका करणे, कामाची टाळाटाळ करणे या गोष्टी करण्याच्या मानसिक स्थितीत असतात. नुसती डिग्री मिळवणं पुरेसं नसतं तर नोकरीदेखील मिळवावी लागतेच आणि नोकरी मिळाली तरी ती टिकवण्यासाठी परिश्रम तर करावे लागतीलच ना?

म्हणूनच ज्या पद्धतीने पालक आपल्या मुलांना आयुष्यात मोठे होण्याची स्वप्नं दाखवत असतात त्याच पद्धतीने ती स्वप्नं काही कारणांनी पूर्ण झाली नाही, तर अशा वेळी स्वत:ला व कुटुंबाला कसं सावरायचं याचंदेखील बाळकडू द्यायलाच हवं. तेव्हा काही महिन्यांपासून जो ‘जॉब ले आऊट’ चा लांडगा आयटी कर्मचार्‍यांना भीतीच्या सावटाखाली ‘चैन से जिने नहीं दे रहा’ या परिस्थितीचे गांभीर्य फक्त नोकरी जाणार्‍या कर्मचार्‍यांपर्यंत न राहता सगळ्यांनीच यातून शहाणपणाचा धडा घ्यायला हवा.

(लेखिका साहित्यिक आहेत)

First Published on: December 18, 2022 3:00 AM
Exit mobile version