मधुमेही रुग्णांचा नाश्ता

मधुमेही रुग्णांचा नाश्ता

बदलत्या जीवनशैलीनुसार मधुमेह हा आजार होतो. तसेच अनेकवेळा हा आजार अनुवांशिकतेमुळेही होतो. जेव्हा स्वादुपिंडात इन्सुलिनचा प्रवाह कमी होतो तेव्हा रक्तात ग्लूकोजचं प्रमाण वाढतं, याच स्थितीला मधुमेह असे म्हटले जाते. मधुमेह झाल्याने अन्नाचं उर्जेत रूपांतर करणे काहीवेळा शक्य नसतं, यामुळे डोळे, मूत्रपिंड, यकृत, हृदय असे शरीराचे महत्त्वपूर्ण भाग कमकूवत होतात. पूर्वी श्रीमंतांचा रोग म्हणून ख्याती असलेला मधुमेह आता सर्वसामन्यांपर्यंत पोहचला असून यात २५ ते ३५ वयोगटातील तरुण आणि महिलांचा समावेश सर्वाधिक आहे. अनुवंशिक मधुमेह असल्याने हल्ली लहान मुले आणि किशोरवयीन तरूणांचा समावेश या आजारात बघायला मिळतो.

मधुमेही रूग्णांनी सतत काही काही अंतराने खाणे आवश्यक असते. यामध्ये वेळच्या वेळी आहाराचे नियोजन करणे जास्त महत्त्वाचे असते. या नियोजनात सकाळचा नाश्ता हा ९ ते १० वाजेपर्यंत तर जेवण साडेअकरा ते दोनपर्यंत व संध्याकाळचा हलका आहार साडेचार ते साडेपाच या वेळेत घेतला पाहिजे. यानंतर साडेनऊपर्यंत रात्रीचे जेवण करावे. या रात्रीच्या जेवणानंतर आणि झोपेच्या वेळात किमान दोन ते तीन तासांचे अंतर असावे.

मधुमेह झाला की, तो पुर्णतः कधीच नष्ट होऊ शकत नाही. मात्र योग्य आहार आणि जीवनशैलीमुळे त्यावर नियंत्रण मिळवता येते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी सकाळचा नाश्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. बेसनाचा वापर करून तयार केलेला थालीपीठ हा एक पदार्थ उत्तम नाश्ता ठरू शकतो. बेसन आणि भाज्यांपासून तयार केलेलं हे थालीपीठ आरोग्यासाठी पौष्टिक असते.

द्विदल धान्यामध्ये मुगाची डाळ आणि त्याचे पदार्थ, मसूर डाळ, मटकी, कुळीथ आणि त्याची डाळ हे पदार्थ खाण्याला प्राधान्य द्यावे. कुळथाचे पिठले मधुमेहींना अधिक गुणकारी ठरते, तर हरभऱ्याची आणि मटकीची डाळसुद्धा लाभदायक ठरते; परंतु ज्या मधुमेहींना जडत्व, वाताचा त्रास जास्त प्रमाणात आहे, त्यांनी या दोन डाळी सेवन न केलेल्या नेहमीच उत्तम. तसेच रताळे, गाजर, काळी द्राक्षे, स्ट्रॅाबेरी, हिरवे सफरचंद, कडधान्यात द्विदल मोड आलेली कडधान्ये, पालेभाजीत कारले, मेथी, पालक, आले तसेच अक्रोड खाण्यास मधुमेही रुग्णांनी प्राधान्य द्यावे.

असा असावा मधुमेही रुग्णांचा नाश्ता

मोड आलेले कडधान्य

मोड आलेली कडधान्यात भरपूर प्रोटीन आणि पोषकत्त्व असतात. मधुमेहासाठी फायदेशीर असे काकडी, कांदा, टॉमेटो आणि शिमला मिर्ची घालून वरून लिंबाचा रस घालून खाऊ शकतात.

पनीरचे पदार्थ

मधुमेहासाठी पनीर हा एक चांगला पर्याय आहे. पनीर हे फॅट- फ्री असते याशिवाय याचा उपयोग मल्टीग्रेन सॅण्डविच किंवा पराठ्यात करता येऊ शकतो.

मेथीची भाजी

हिवाळा तसेत इतर ऋतूत मेथीची भाजी उपलब्ध असते. मेथीपासून हे पराठे तयार करता येऊ शकतात. यामुळे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवता येत.

पौष्टिक इडली

मधुमेहाला फायदेशीर असे ज्वारी, बाजरी, ओट्स, मेथीचे दाणे आणि गव्हाचं पीठ एकत्र करून इडली तयार केली जाऊ शकते. हा नाश्ता अधिक पौष्टिक करण्यासाठी त्यात काही भाज्याही घातल्या जाऊ शकतात.

First Published on: November 7, 2019 6:30 AM
Exit mobile version