बदलत्या वातावरणात जपा बाळाला

बदलत्या वातावरणात जपा बाळाला

ऑक्टोबर हिट संपल्यानंतर देखील दुपारच्या वेळी उन्हाचा पारा वाढलेला दिसतोय. या कडक उन्हात अंगाची अक्षरशः लाही लाही होते. या उन्हाचा पारा वाढला की, त्याचा परिणाम मोठ्यांसह लहानग्यांना या उन्हाचा विशेष त्रास होतो. कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी विशेषतः चिमुकल्या बाळाच्या आरोग्याची काळजी अधिक घेणं आवश्यक असते. बऱ्याचदा लहान मूल मग ते अगदी नवजात बालकांना नेमकं काय होत असते याचा अंदाज लावणं कठीण होतं.

नवजात किंवा एक- दोन वर्षाच्या तुमच्या चिमुकल्याला उन्हाळ्यात असे जपता येऊ शकते. उन्हाळा सुरू झाला की, शरीरातील पाणी कमी होऊन अतिशुष्कता होऊ शकते. यामुळे ताप येणे, डोके दुखणे, मळमळ होणे, उलट्या होणे असा त्रास लहान बाळाला होऊ शकतो.

अशी घ्या तुमच्या बाळाची काळजी

लहान बाळांची त्वचा अतिशय नाजूक असते. अशा वेळी उन्हाळ्यापासून त्यांच्या नाजूक त्वचेची काळजी अशी घेता येईल

बाळासाठी सुती कपड्यांचा वापर

उन्हाळा असो किंवा इतरवेळी देखील नवजात बालकांना नेहमी कपडय़ांत गुंडाळून ठेवले जाते. उन्हाळ्यात आवर्जून बाळाला सुती कपडे घालण्याला प्राधान्य द्या. हे सुती कपडे घट्ट नसून बाळाला आरामदायी वाटावे असे असावेत. बाजारपेठेमध्ये सुती कपड्याचे लांब हात-पाय असलेले कपडे मिळतात. त्याचा वापर केल्यास बाळाला आराम मिळेल.

बाळाला अंघोळ घाला

उन्हात सतत घाम येत असतो. लहानग्याची त्वचा अधिक संवेदनशील असल्याने घामामुळे बाळाच्या शरिरावरील घामावर धूळ बसते. ही धूळ बाळाच्या शरिरावर बसल्यामुळे घामोळ्यांसाठी पोषक वातावरण निर्माण होते. उन्हाळ्यातील बाळाचं घामोळं घालवण्यासाठी एसी किंवा सतत फॅन खाली बाळाला न ठेवता सकाळी व संध्याकाळी अंघोळ घाला. बाळाला आंघोळ घालणे शक्य नसेल तर त्याला थंड पाण्याने पुसून काढू शकता. यामुळे तुमच्या बाळाचे आरोग्य सुदृढ राहील.

डायपरचा वापर शक्यतो टाळा

उन्हाळ्यात बाळाला डायपर लावणे शक्यतो टाळा. सतत या डायपरच्या वापरामुळे घाम बाळाच्या त्वचेवरच राहतो. त्वचा सतत ओलसर राहिल्यामुळे त्वचेवर पुरळ येऊन त्वचेचे विकार होऊ शकतात. म्हणून उन्हाळ्याच डायपरचा वापर शक्यतो टाळावा.

पावडर लावणं टाळा

बऱ्याचदा बाळाला खूप घाम येतो म्हणून फ्रेश वाटावं याकरता अधिक पावडरचा वापर बाळाच्या शरिरावर केला जातो. मात्र घाम आल्यावर त्यात ही पावडर मिसळली जाते. यामुळे बाळाच्या शरिरावर खाज उठते. म्हणून शक्यतो डायपर आणि ओल्या जागी पावडर न लावणेच उत्तम राहिल.

First Published on: November 5, 2019 6:30 AM
Exit mobile version