एक अतिशय सुंदर नानिवडे गावातील एकविरा देवीचे देऊळ

एक अतिशय सुंदर नानिवडे गावातील एकविरा देवीचे देऊळ

एकविरा देवीचे देऊळ

मुंबईहून कोकणात जाण्यासाठी एस.टी (लालपरी) लक्झरी बसेस, रेल्वे उपलब्ध आहेतच त्या व्यतिरिक्त प्रायव्हेट कारही उपलब्ध असतात. कारने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाताना रायगड जिल्हा सोडला कि रत्नागिरी जिल्हा सुरु होतो. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजा, हातखंबा, रत्नागिरी राजापूर, खारेपाटण लागते. खारेपाटण नदीवर असलेला पूल दिसला कि आपलं गाव जवळ आल्याचा आनंद होतो. मी तीथावली, तालुका वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या गावाची आहे.

खारेपाटाच्या मधुबन हॉटेलला वळसा घालून गगनबावड्याला जाणारा मार्ग आहे. त्या रस्त्याने जाताना गाडी जामदा पुलावरून खाली आली कि, ’तीथवली’ गाव लागते. त्या तीथावली गावच्या शेवटी डाव्या हाताला नानिवडे गावाला जाणारा फाटा आहे. नानिवडयाला जाताना आजूबाजूचा परिसर हिरवागार आहे. तेथेच एकविरा देवीचे कोकणातील एक अतिशय सुंदर देऊळ आहे.

परशुरामाने कोकणची भूमी निर्माण केली. आंबा, फणस, नारळ यांनी वेढलेले कोकण असून ते अतिशय निसर्गरम्य आहे. आदिमाता श्री रेणुका हिच्या पोटी भगवान परशुरामासारखा ’एकविर’ पुत्र जन्माला आला म्हणून ती एकविरा होय. रेणुकादेवीला एकविरा नाव शंकरांनी दिले असे सांगितले जाते. महाराष्ट्रातील आदिमाता श्री रेणुका हि एकविरा असल्याने रेणुकेची स्थाने हि एकविरेची आहेत. एकवीरादेवी, संत एकनाथांची कुलस्वामिनी होती. आपली संस्कृती सीतेची, रामाची, भगवान परशुरामाची, माता एकविरेची आहे. एकविरा मातेने आपल्या पोटी परशुरामासारखा वीर जन्माला घातला. आज अशा असंख्य वीराची आपल्या देशाला गरज आहे. या देशातील माता एकवीरेसारख्या व पुत्र पराक्रमी भगवान परशुरामासारखे असावेत.

नानिवडे गावातील गावकर्‍यांची ही कुलदेवता आहे. माझे आजोळ देखील ’नानिवडे’ असल्याने एकविरा देवी बद्दल मला खूप आत्मीयता व श्रद्धा आहे. एकविरा देवीच्या देवळाची पुनर्बांधणी केली असून त्याचा वर्धापन दिन ९ मे आहे. एकविरा देवीच्या देवळात गेल्यावर आपले मन आनंदित व प्रसन्न राहते. देवीला मनोभावे नमस्कार करून एकविरा देवीचे देऊळ व त्याच्याभोवतालचा परिसर कायम स्मरणात ठेऊन आम्ही पुढे मार्गस्थ झालो. ’’जय एकविरा देवी’’.

वृंदा वसंत हरयाण

First Published on: November 13, 2018 5:51 AM
Exit mobile version