पावसाळ्यातील सर्वसाधारण आजारांचा सामना कसा करावा

पावसाळ्यातील सर्वसाधारण आजारांचा सामना कसा करावा

पावसाळ्यातील सर्वसाधारण आजारांचा सामना कसा करावा

पावसाच्या हवामानातील बदल अनेकदा आपल्यासोबत अनेक प्रकारचे संसर्ग आणि आजारपण घेऊन येतो. वातावरणातअचानक झालेल्या या बदलाचा ज्येष्ठ नागरिक आणि मुले यांच्या तब्येतीवर सर्वाधिक परिणाम होतो, कारण त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असू शकते. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांना सहज होणारे काही आजार आणि पालकांना त्यावर घरच्याघरी करता येण्यासारखे उपाय पुढीलप्रमाणे

सर्दी आणि ताप म्हणजे लहान मुलांमध्ये अगदी सर्रास आढळणारे विषाणूजन्य आजार आहेत, कारण हे आजार शिंकणे, खोकणे, हात मिळविणे अशा कृतींमधून बाधित व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे संक्रमित होत असतात. शाळांमध्ये हे सहजच घडते. तेव्हा आपले मूल इतरांच्या टॉवेल्स, रुमाल यांसारख्या वस्तू वापरणार नाही याची दक्षता घ्या. त्यांना सॅनिटायझर्स किंवा मेडिकेटेड साबण देऊन ठेवा आणि मुले या वस्तू वापरतील याची खातरजमा करून घ्या. मुलांना वैद्यकीय सल्ल्यानुसार अँटी व्हायरल औषधे द्या.

अन्नातून विषबाधा किंवा अतिसार यांसारखे आतड्यांना होणाऱ्या संसर्गाचे प्रकार हे प्रामुख्याने दूषित पाणी किंवा खराब झालेले अन्न पोटात गेल्याने होतात. त्यामुळे पालकांनी पाणी केवळ गाळूनच नव्हे तर उकळूनही घ्यावे. यामुळे मुलांना जलजन्य आजार होणार नाही. पोटाच्या समस्या दूर ठेवण्यासाठी अन्न नेहमी झाकून ठेवा व ताजे, शिजवलेले अन्नच खा. रस्त्याच्याकडेला मिळणारे पदार्थ आणि कापून ठेवलेली फळे खाणे टाळा.

डेंग्यू हा पावसाळ्यात सर्रास उद्भवणारा आणखी एक आजार आहे; या आजारापासून दूर राहण्यासाठी घरात असताना किंवा घराबाहेर जाताना मुलांना मस्किटो रिपेलन्ट लावणे योग्य. मुलांचे संपूर्ण अंग झाकले जाईल, असे कपडे त्यांना घालावेत. घरामध्ये किंवा घराच्या भोवताली उघड्या टाक्यांत पाणी साठवून ठेवू नये म्हणजे डासांच्या पैदाशीला प्रतिबंध होईल. मुलांना डबक्यांमध्ये आणि चिखलात खेळणे आवडते. मात्र, असे केल्याने त्यांना लेप्टोस्‍पायरोसिसची लागण होऊ शकते, कारण हा आजार प्राण्यांच्या मूत्रामुळे दूषित झालेल्या पाण्याच्या किंवा मातीच्या संपर्कात आल्याने होतो. तेव्हा तुमच्या मुलांच्या शरीरावर उघड्या जखमा असल्यास त्यांना धोका आहे. लेप्टोस्पायरोसिसच्या घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वच्छतेचा दर्जा सुधारणे तसेच मूत्रविसर्गामुळे दूषित झालेल्या जलस्त्रोतांजवळ जाणे टाळले पाहिजे.

टायफॉइड हा जलजन्य आजार आहे, जो दूषित पाणी किंवा अन्नामुळे होतो. या दिवसांत मुलांना घरी बनविलेले अन्नच द्या. कारण बाहेरचे अन्न तितक्या चांगल्या दर्जाचे नसू शकेल किंवा अस्वच्छ स्थितीमध्ये बनविले गेले असेल. भरपूर पाणी पिणे, खाण्याआधी आणि शौचास जाऊन आल्यानंतर हात स्वच्छ धुणे या गोष्टी तसेच रोगप्रतिबंधात्मक लसीकरण या गोष्टी या आजारास अटकाव करण्यासाठी उपयुक्त आहेत.

– डॉ. जेसल सेठ आणि डॉ. समीर सदावर्ते; बालरोगतज्ज्ञ, फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड

First Published on: August 27, 2019 6:00 AM
Exit mobile version