भारतीय तरुणांना सतावतोय मधुमेह..का? वाचा!

भारतीय तरुणांना सतावतोय मधुमेह..का? वाचा!

भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने वाढणारे मधुमेहाचे प्रमाण ही चिंताजनक बाब असून त्यास राष्ट्रीय समस्या समजून वेळीच उपाययोजना न केल्यास फार मोठ्या प्रमाणात युवकांची क्रयशक्ती नष्ट होण्याची भिती आहे, असं वक्तव्य आंतरराष्ट्रीय किर्तीचे ख्यातनाम मधुमेह व हृदयरोग तज्ज्ञ डॉ. वसंत कटारिया यांनी केलं आहे. जागतिक मधुमेह दिन व बालदिनाचे औचित्य साधून ते बोलत होते. जगातील प्रत्येक चौथा मधुमेही हा भारतीय आहे. सध्या भारतात या रोगाचे ८ कोटींपेक्षाही जास्त रुग्ण आहेत. याशिवाय आपल्याला मधुमेह झालेला आहे, हे माहितीच नसणाऱ्यांची संख्याही खूप मोठी आहे, असंही ते म्हणाले.

भारतीय परिस्थिती मधुमेहासाठी पोषक

भारतीय तरुणांमध्ये आढळणाऱ्या मधुमेहाविषयी बोलताना ते पुढे म्हणाले, आपण भारतीय असल्यामुळेच मधुमेहाची शक्यता वाढते. पोटाभोवती चरबी जमा होणे (सेंट्रल ओबेसिटी) ही क्रिया जगात फक्त भारतीय उपखंडातच आढळते. आणि यानंतर दुसरे कारण अनुवांशिकता आहे. ४० वर्षांनंतर होणारा हा आजार आता विशीच्या आत बाहेरील तरुणांमध्येही मोठ्या प्रमाणात आढळत आहे. हीच गंभीर बाब आहे. आपल्या देशात साधारणतः रक्तामध्ये साखरेचे प्रमाण आढळल्यानंतर मधुमेह झाला असे समजले जाते. मात्र, मधुमेहाची लागण झाल्यानंतर प्रारंभीची काही वर्षे रक्तात साखर आढळतच नाही. शिवाय मधुमेह हा लक्षणेविरहीत आजार असल्यामुळे सामन्य व्यक्ती जोपर्यंत आपणास काही मोठा त्रास जाणवत नाही तोपर्यंत रक्ताची तपासणी करून घेत नाही. जेव्हा समजते तेव्हा या आजारामुळे हृदय, मूत्रपिंड, डोळे, मज्जातंतु यावर दुष्परिणाम सुरू झालेले असतात. नियमित उपचाराने या रोगावर नियंत्रण मिळवता येते. परंतु नैसर्गिक अवयवांसारखी कार्यक्षमता पुन्हा मिळत नाही. हा रोग झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा तो होऊच नये यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करण्याची आवश्यकता आङे असंही डॉ. कटारिया यावेळी बोलताना म्हणाले.


तुम्ही हे वाचलंत का? – महाराष्ट्रातील ५ लाख लोक मधुमेहग्रस्त

काय आहेत वाढत्या मधुमेहाची कारणं?

सामान्यपणे व्यायामाचा अभाव, ताणतणाव, अनियमित आहार, लठ्ठपणा, अनुवंशिकता बदलती जीवनपद्धती, व्यसने यामुळे मधुमेह होत आहे. त्याशिवाय फेसबुक, व्हॉटस्अॅपमध्ये तासन् तास गुंतून पडणे, कम्प्युटर गेम्स, टीव्हीसमोर बसून खाणे, मैदानी खेळांचा अभाव यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण वाढते. मैदा व साखरयुक्त पदार्थांमुळे मधुमेहास पोषक वातावरण निर्माण होते. याला आवर घालण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना तंतुमय, पौष्टिक चौरस आहार द्यायला हवा. चॉकलेट, पिझ्झा, बर्गर, आईस्क्रीमपासून त्यांना दूर ठेवणं गरजेचं आहे, असंही ते म्हणाले.


हेही वाचा – मधुमेहाबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का
First Published on: November 14, 2018 7:53 PM
Exit mobile version