मुंबई-गोवा महामार्गावरील ‘मधुबन’

मुंबई-गोवा महामार्गावरील ‘मधुबन’

Hotel Madhuban

माझं गाव तिथावली, तालुका वैभववाडी, जिल्हा सिंधुदुर्ग आहे. खारेपाटणला आलो की, मधुबन हॉटेलला वळसा घालून गाडी ‘जामदा पुला’ कडे जाते व तशीच पुढे तिथावली गावाला जाते.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून जाताना बरीचशी हॉटेल, ढाबे लागतात. सर्व हॉटेलमध्ये जाऊन तेथील पदार्थांचा आस्वाद घेऊ शकत नाही. पण आम्ही गावी गेलो की, एखादा दिवस तरी हॉटेल मधुबनमध्ये जेवावयास जातो. मधुबनचा परिसर इतका सुरेख आहे की तेथून आपल्याला परत यावेसे वाटत नाही. अशा निसर्गरम्य वातावरणात जेवण घेतल्यास खूप आनंद व ताजेतवाने वाटते. मधुबन हे लॉजिंग बोर्डिंग असले तरी तेथील जेवण चविष्ट आहे.

हॉटेल मधुबन येथे जेवणाचे शाकाहारी व मांसाहारी हे दोन्ही प्रकार मिळतात. मांसाहारीमध्ये पापलेट मसाला, कोळंबी मसाला, सुरमई मसाला, तिसर्‍या मसाला, बोंबील फ्राय वगैरे माशांचे वेगवेगळे प्रकार मिळतात. याशिवाय अंडा मसाला, गावठी कोंबडी मसाला, अंडी चिकन वगैरे मांसाहारी पदार्थ मिळतात व ते खूप छान व चवदार असतात.शाकाहारी जेवणामध्ये भात, रोटी, पराठा वेगवेगळ्या भाज्या, पापड, लोणचे, कोशिंबीर असते. भाज्यांमध्ये वांगी मसाला, चणा मसाला, काजू मसाला, फ्लॉवर मसाला अशा भाज्या असतात. मधुबनमधील जेवण गावातील घरगुती पद्धतीसारखे गरम मसाला व भाजके वाटण यांनी केलेले असते. त्यामुळे त्याची चव आणखी स्वादिष्ट होते. तसेच पनीर मसाला, पनीर टिक्का वगैरे पनीरचे प्रकारही असतात.

गावी आता बरीच हॉटेल्स झाली आहेत. पण मधुबनचा अगदी मोक्याच्या जागेवर असलेला परिसर व तेथील निसर्गरम्य वातावरण पाहून समाधान होते. तसेच चवदार व स्वादिष्ट जेवणाने मन तृप्त होते. कधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून प्रवासाचा योग आला तर आठवणीने मधुबनला भेट द्या. जेवण लय भारी. पोटोबा अगदी तृप्त होईल.

-वृंदा वसंत हरयाण

First Published on: November 5, 2018 12:22 AM
Exit mobile version