प्रोटीन शेक पिताय तर हे वाचाच

प्रोटीन शेक पिताय तर हे वाचाच

प्रोटीन शेक

धकाधकीच्या जीवनात स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक विविध मार्गांचा अवलंब करतात. व्यायामशाळेत जाऊन घाम गाळणे, आहारात बदल करणे, योगा करणे असे बरेच पर्याय फिट राहण्यासाठी उपयुक्त ठरतात. पैकी व्यायामशाळेत जाणार्‍यांपैकी बहुतेक सर्वच जण प्रोटीन शेक पितात, पण तुम्हाला माहीत आहे का प्रोटीन शेक अधिक प्रमाणात पिणे धोकादायक ठरू शकते?

एका अभ्यासानुसार असे पुढे आले आहे की, वजन वाढण्याबरोबरच मृत्यूचा धोकादेखील वाढतो. युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या चार्ल्स पेरकिन्स सेंटरच्या संशोधकांनी एका तपासातून सिद्ध केले आहे की, प्रोटीन पावडरमध्ये बिसिसिए म्हणजेच ब्रँचेड चेन एमिनो अ‍ॅसिड मोठ्या प्रमाणात आढळते. हे बिसिसिए सप्लिमेंट स्वरूपात मार्केटमध्ये उपलब्ध असते.

या सप्लिमेंट पावडरचा पाण्यात मिसळून शेकच्या स्वरूपात सेवन केले जाते. नेचर मेटाबॉलिजम या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अनुमानानुसार, बिसिसिए जरी मसल्स बनविण्यात फायदेशीर ठरत असले तरी त्याच्या सेवनाचा शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतो. यामुळे केवळ वजनच वाढले जाणार नाही तर मृत्यूचा धोकाही मोठ्या पटीने वाढतो.

संशोधकांच्या म्हणण्यानुसार रक्तात बिसिसिएचे प्रमाण वाढल्यास व्यक्तीच्या झोपेवर परिणाम होऊ शकतो. बिसिसिए झोपेला आवश्यक सेरेटोनीन नामक हार्मोनचे प्रमाण कमी करते. परिणामी व्यक्तीची झोप कमी होऊ शकते. या अभ्यासाचे संशोधक सामंथा सोलोन यांच्या म्हणण्यानुसार आपल्या शरीरात अमिनो अ‍ॅसिडचे संतुलन असणे फार महत्त्वाचे आहे.

त्यामुळे केवळ प्रोटीन शेकवर अवलंबून राहण्यापेक्षा इतर विविध स्रोतांच्या माध्यमातून शरीरातील अमिनो अ‍ॅसिडचे संतुलन राखता येईल. त्यामुळे आहारात चिकन, मासे, अंडी, डाळ यांचा समावेश करावा. प्रथिनांचे इतर महत्त्वपूर्ण स्रोत पुढीलप्रमाणे

काबुली चण्यांमध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात. तेव्हा काबुली चण्याचे पीठ, काबुली चणे यांचा आहारात समावेश करावा.
चीजमध्ये कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात आढळत असले तरी, चीजमधून प्रथिनेही मिळतात.
राजमामध्येही प्रथिने मोठ्या प्रमाणात आढळतात.
दह्यात कॅल्शिअम प्रमाणेच प्रथिनेही आढळतात. शिवाय दह्यात कॅलरीज पण फार कमी आढळतात.
भोपळ्याच्या एक कप बियांमध्ये एका अंड्यापेक्षा दुप्पट प्रथिने आढळतात.

First Published on: May 5, 2019 4:50 AM
Exit mobile version