नाते आपुलकीचे

नाते आपुलकीचे

relationship

असे म्हणतात जगामध्ये कोणतीही गोष्ट शाश्वत नसते. तसेच नात्यांचेही आहे. सुरुवातीला प्रत्येक विशेषतः प्रेमाच्या नात्यामध्ये वाटणारी आपुलकी, काळजी, जिव्हाळा हा वर्षानुसार बोथट होत जातो आणि मग खर्या अर्थाने नात्याच्या उलथापालथीला सुरुवात होते. एकमेकांविषयी नात्यात पूर्ण गुंतण्याआधी सतत विचार आणि काळजी केली जाते. ती नंतर नात्याला गृहीत धरून दुर्लक्षित करण्यात येते. पण त्याचवेळी खरं तर गरज असते ती आपुलकीच्या नात्याची.

वास्तविक नात्यांचा तिढा कसा सोडवावा याचे उत्तर कोणाकडेही नसले. तरी त्या दोन माणसांनी पुन्हा नीट विचार करून आपुलकीचे नाते जपल्यास, हा तिढा लवकर सुटू शकतो. नात्यात तोचतोचपणा येण्यासाठी अर्थातच दोन्ही व्यक्ती जबाबदार असतात. त्यामुळे या नात्यामध्ये पुन्हा एकदा आपुलकीचा ओलावा निर्माण करून एकमेकांना दोष न देता जवळीक निर्माण करण्याची गरज भासते. कोणताही डॉक्टर नात्यांना एकत्र बांधून ठेवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एखाद्याबद्दल आपुलकी वाटण्याची गरज आहे. ती आपुलकी वाटण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने नात्याचा विचार करून त्या आपुलकीच्या नात्याला एक हात देण्याची गरज आहे.

कोणत्याही नात्यात आपली चूक असेल तर ती सहज मान्य करायला हवी. इतकंच नाही तर समोरचा माणूस आपल्यासाठी जर ९५ वेळा एखादी गोष्ट करत असेल आणि तुमच्याकडून छोटीशी अपेक्षा ठेवत असेल तर त्याच आपुलकीच्या नात्याने त्या माणसाच्या मनाचा विचार करून ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वतःला निदान पाच वेळा तरी झोकून देणं आवश्यक आहे. नाहीतर एक वेळ अशी येते की, हे नातं फक्त आणि फक्त तुटण्याच्या वळणावर येतं आणि अशावेळी प्रयत्न करूनही कोणाहीदरम्यान असं नातं टिकू शकत नाही. प्रत्येक नात्यात जबाबदारी ही दोन व्यक्तींची असते आणि आपली जबाबदारी समजून दोन्ही व्यक्तींनी वागणंही गरजेचं असतं. त्यामुळे त्याच आपुलकीच्या नात्याने ती जबाबदारी समजून वागायला हवं.

आपुलकीशिवाय कोणत्याही नात्यामधील बंध टिकत नाहीत हे प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे. मग ते नाते रक्ताचे असो अथवा मैत्रीचे. प्रत्येक नात्यात आपुलकी आणि आत्मीयता महत्त्वाची आहे. वास्तविक मनुष्य हा समाजप्रिय असतो त्यामुळे रक्ताच्या नात्यापलीकडेही नाती तो निर्माण करतो. पण ती जपण्यासाठी मात्र त्याला अमाप कष्ट करावे लागतात. त्यामध्ये विश्वास, आपुलकी या सर्व घटकांचीही तितकीच आवश्यकता असते. हे सगळं मिश्रण असल्याशिवाय कोणतंही नातं पूर्ण नाही होऊ शकत अर्थातच टिकू शकत नाही. कारण फक्त एखाद्या व्यक्तीचे नावापुरते नाते असण्यापेक्षा त्याच्यामध्ये ओलावा असणं आवश्यक आहे आणि हा ओलावा कोणत्याही आपुलकी वा काळजीशिवाय येत नसतो.

आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते अधिक सुंदर करण्यासाठीच कोणत्याही नात्याचा गाभा हा आपुलकीचा असायला हवा. वास्तविक आपुलकीच्या दोन शब्दांनीही एखाद्याशी नाते जोडता येते हे विसरून कसं चालेल? आपुलकीसह फुलावे नाते, जपावे नाते हेच आयुष्याचं सार होऊन जायला हवं. असं झाल्यास, जगात फारच कमी लोक दुःखी दिसतील. कारण सध्याच्या तांत्रिक युगात ही आपुलकी आणि प्रेम सध्या पाहायला मिळत नाही. हे नातं आपल्यापासूनच सुरु होतं आणि तसंच जपायला हवं.

First Published on: October 31, 2018 1:44 AM
Exit mobile version