स्क्रब टायफसपासून असा करा बचाव

स्क्रब टायफसपासून असा करा बचाव

Scrub Typhus

सध्या हा आजार विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पसरलेला असल्याने तेथील स्थानिक नागरिक तसेच या भागात भेटी देणार्‍या व्यक्तींनी या आजाराबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी झुडुपांमध्ये काम करताना, फिरताना संपूर्ण अंग झाकणारे पूर्ण बाह्यांचे पायघोळ कपडे वापरले पाहिजेत ज्यामुळे चिगार हे किटक चावण्यापासून बचाव होतो.

आपले अंथरुन, पांघरुण व कपड्यांवर किटकनाशकांचा वापर केल्याने चिगारचा नायनाट होतो. झाडाझुडुपांमध्ये जाऊन आल्यावर कपडे गरम पाण्यात भिजवावेत त्यामुळे चिगार मरतात. माईट नियंत्रणासाठी अशा माईट्सच्या राहण्याच्या जागेवर किटकनाशक फवारणी करून घ्यावी.

शौचासाठी खुल्या जागी, झाडाझुडुपांमध्ये जाणे टाळावे. स्क्रब टायफसचे रुग्ण आढळलेल्या भागात घरच्या सभोवताली असणारी खुरटी झुडुपे काढून टाकणे फायद्याचे ठरते. ज्या ठिकाणी चिगार आढळून येतील तेथे जमिनीची नांगरणी करावी व तेथील सर्व पालापाचोळा जाळून टाकावा. असे केल्याने तेथील माईट्स नष्ट होतात. घरातील कोंबड्या वा इतर पाळीव प्राणी यांच्या अंगावर आणि त्यांच्या खुराड्यात व गोठ्यात माईट्स नाहीत ना याची खात्री करावी आणि आवश्यकतेनुसार किटकनाशकांचा फवारा करून माईट्स नष्ट करावेत.

स्क्रब टायफसचा प्रादुर्भाव असलेल्या भागात असे माईट्सचे चिगार चावले किंवा अशा झुडुपांमध्ये जाऊन आल्यानंतर ताप आला वा स्क्रब टायफसची इतर लक्षणे जाणवली तर विनाविलंब डॉक्टरांना दाखवून घ्यावे. सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये या आजारावरील औषधे उपलब्ध आहेत. शेतकरी, शेतमजूर, जंगलात गुरे, शेळ्या, मेंढ्या चारणारे गुराखी यांना या आजाराचा त्यांच्या दैनंदिन कामाच्या स्वरूपामध्ये जास्त धोका असतो. त्यामुळे त्यांनी याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. अशाप्रकारे आपण स्क्रब टायफसपासून बचाव करू शकतो.

माईट्स नष्ट करण्यासाठी मॅलेथिऑन 25 टक्के हे किटकनाशक वापरावे. साधारणपणे 23 किलो माती व अर्धा किलो मॅलेथिऑनचे 25 टक्के या प्रमाणात मिश्रण करून ज्या ठिकाणी चिगार आढळून येतील तेथे याची धुरळणी करावी. झाडाझुडुपांमध्ये जाताना अंगाला व कपड्याला डी.एम.पी. ऑईल, डायमिथील थॅलेट लावावे. असे केल्याने चिगार चावण्यापासून बचाव होतो.

स्क्रब टायफस या आजारावर अद्याप लस अस्तित्वात नाही. त्यामुळे हा आजार होऊ नये म्हणून शक्य तेवढी सर्व काळजी घेणे हा एकच मार्ग आपल्यापुढे आहे. या आजाराची लक्षणे दिसून आल्यास तातडीने वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घेतले पाहिजेत. स्क्रब टायफस आजारावरील प्रभावी औषधे हल्ली सर्वत्र उपलब्ध आहेत.

डॉ. के.आर.खरात, एम.डी.डी.पी.एच.
सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा,

First Published on: March 20, 2019 4:58 AM
Exit mobile version