पाच तासापेक्षा कमी झोप घेताय, मग ‘हे’ नक्की वाचा

पाच तासापेक्षा कमी झोप घेताय, मग ‘हे’ नक्की वाचा

प्रातिनिधिक फोटो

तुम्ही रात्री जर पाच तासापेक्षा कमी झोप घेत असाल, तर हा तुमच्यासाठी खूप मोठा धोका आहे हे लक्षात घ्या. ५ तासांपेक्षा कमी झोपणाऱ्या व्यक्तींना ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता दुपटीनं वाढते. सर्व्हेक्षणामध्ये हे सिद्ध करण्यात आलं असून ५० वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तींवर याबाबत निरीक्षण करण्यात आलं. यामधून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. स्वीडनमधील युनिव्हर्सिटी ऑफ गोथेनबर्गमध्ये यासंबंधी अभ्यास करण्यात आला आहे. करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, अतिशय व्यस्त राहणाऱ्या लोकांसाठी झोप घेणे म्हणजे वेळ वाया घालवणे असं गणित असतं. मात्र, कमी झोप घेतल्यास, भविष्यात कमी वयातच ह्रदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असल्याचं या अभ्यासातून सिद्ध झालं आहे.

कमी झोपल्यानं रक्तदाब आणि मधुमेह वाढतो

अभ्यासानुसार, ५ तासांपेक्षा कमी झोपल्यास, पुरुषांना उच्च रक्तदाब, मधुमेह, जाडेपणा, झोप खराब होणे अशा तऱ्हेच्या समस्या उद्भवतात. तर यापासून वाचण्यासाठी दिवसभरात किमान ८ तासांची झोप आवश्यक आहे असाही निष्कर्ष काढण्यात आला आहे.

महिलांमध्ये कॅन्सरचा धोका

यापूर्वी करण्यात आलेल्या अभ्यासातून वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, कमी झोप घेणाऱ्या महिलांमध्ये स्तनाचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. तसंच एकदा बरा झालेला कॅन्सर पुन्हा होण्याचीदेखील शक्यता असते. दरम्यान, ‘केस वेस्टर्न रिझर्व्ह युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन’ च्या सहायक प्राध्यापक शेरील थॉम्पसनच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, महिलांची मासिक पाळी बंद झाल्यानंतर कॅन्सरच्या रूग्णांमध्ये ४१२ महिलांचं सर्व्हेक्षण करण्यात आलं. या अभ्यासातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं आपल्या झोपेकडे योग्य लक्ष देणं आवश्यक असल्याचंही या अभ्यासातून सांगण्यात आलं आहे.

First Published on: August 28, 2018 7:53 PM
Exit mobile version