आईच्या पाठबळामुळे मुले होतात हुशार

आईच्या पाठबळामुळे मुले होतात हुशार

तुमच्या मुलांची बुद्धी तल्लख झाली पाहिजे असे वाटत असेल किंवा मुले खूप हुशार झाली पाहिजेत असे वाटत असेल तर महिलांनो, तुमच्या मुलांना नेहमी योग्य पाठबळ द्या. कारण आईने दिलेल्या पाठबळामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते, असे एका वैज्ञानिक संशोधनातून समोर आले आहे.

आई मुलांना त्यांच्या प्रत्येक गोष्टीत नेहमीच प्रोत्साहन तर देतेच सोबतच पुरेपूर पाठबळही देते. आईने मुलांना पाठबळ दिले पाहिजे हे आपण नेहमी ऐकतो. आता या गोष्टीला वैज्ञानिक मान्यता मिळाली असून जीवनातील ताणतणावाला सामोरे जाताना अशा पाठबळाचा खूप उपयोग होतो. लहान मुले ही वडिलांच्या तुलनेत आईशी भावनिकतेने जास्त जवळ असतात. आईने जर मुलांना त्यांच्या कामासाठी प्रोत्साहन दिले आणि पाठिंबा दिला तर मुले न घाबरता ते काम पूर्ण करतात. असे म्हणता येईल की मुलांमध्ये आईच्या प्रोत्साहनाने एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण होतो.

वॉशिंग्टन विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत अभ्यास केला आहे. मुले लहान असताना ज्या मातांनी त्यांच्या मुलांना सतत पाठबळ दिलंय, योग्य वागणूक दिली, त्या मुलांच्या मेंदूमधील स्मृती व भावना या गोष्टींना नियंत्रित करणार्‍या भागावर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आला. त्यातूनच मुलांच्या बुद्धीचा विकास होण्यास सुरुवात होते. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी काही मुलांचा अभ्यास केला. यात शाळेत न जाणार्‍या तसेच शाळेत जाणार्‍या दोन्ही मुलांचे निरीक्षण करण्यात आले होते. ज्या पालकांनी मुलांना लहानपणी मायेच्या उबेने वागवले, त्यांना वयाच्या सात ते तेरा या काळात आई-वडिलांच्या पाठिंब्याची खूप गरज असते. त्यातून ते तणावावर मात करू शकतात. त्यातूनच त्यांना तणावाचे व्यवस्थापनही कळू लागते, असे वैज्ञानिक संशोधनातून समोर आले आहे. लहान मुले ही शरीराने आणि मनाने नाजूक आणि हळवी असतात, त्यामुळे त्यांच्याशी कठोरतेने वागून चालत नाही. तसे वागले तर त्यांच्या नाजूक मनावर मोठा आघात होऊ शकतो.त्यावेळी ती गप्प बसली, तरी भावी काळात त्यांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतात.

लहानपणी त्यांना अभ्यासासाठी किंवा त्यांच्या मस्तीला आवर घालण्यासाठी पालक त्यांच्यावर अतिशय रागावतात किंवा त्यांना मारहाण करतात, त्यांना कोंडून ठेवतात. त्याचा परिणाम मुलांच्या भावी जीवनावर होऊन एक तर ती भित्री बनतात किंवा अत्यंत आक्रमक बनतात. त्यामुळे ती पालकांसाठीच त्रासदायक ठरू शकतात किंवा कुठल्याही प्रसंगाला सामोरे जाताना कच खातात. त्यामुळे मुलांविषयी लहानपणी विशेषत: आईने जास्त सजग राहण्याची गरज असते. काही वेळा कामाच्या ताणामुळे वडील मुलांच्या बाबतीत कठोर होतात. पण अशा वेळी आईची माया हाच मुलांना आधार असतो. जीवनात यशस्वी झालेल्या अनेक मान्यवरांनी यशाचे श्रेय त्यांनी केलेल्या मेहनतीसोबतच त्यांच्या आईने लहानपणी त्यांना दिलेल्या पाठबळाला आणि वाढवलेल्या आत्मविश्वासाला दिले आहे.

हिप्पोकॅम्पस काय आहे?

भावना व स्मृतीशी संबंधित विशिष्ट भागाला वैज्ञानिक परिभाषेत हिप्पोकॅम्पस असे म्हटले जाते. मेंदूचा हिप्पोकॅम्पस हा भाग सतत कार्यरत असतो. कोणतीही गोष्ट, घटना, प्रसंग, व्यक्ती, केलेला अभ्यास, गाणं, नुकताच लक्षात ठेवलेला फोन नंबर, कुठेतरी ठेवलेली किल्ली या गोष्टी आधी हिप्पोकॅम्पस या भागात जातात. तिथे त्या रेंगाळतात. जर त्या जास्त काळासाठी लक्षात ठेवायच्या आहेत, असं वाटलं तर त्या पुढे पाठवल्या जातात. कारण त्या बाबी दीर्घकाळ लक्षात ठेवण्याची-लाँगटर्म मेमरीत साठवण्याची गरज पडते.

हिप्पोकॅम्पस या भागातून तणावाचे व्यवस्थापन आणि नियंत्रण केले जाते, असे प्रोफेसर जॉन लुबी यांनी सांगितले. ते या विषयावरील संशोधन चमूचे प्रमुख आहेत. पूर्ण पालकत्व किती महत्त्वाचे असते, हे दाखवणारे याचे निष्कर्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

First Published on: September 22, 2018 12:52 AM
Exit mobile version