लढा हिस्टरेक्टॉमीशी – भाग २

लढा हिस्टरेक्टॉमीशी – भाग २

युटेरिन प्रोलॅप्स (गर्भाशय भ्रंश)

या आजारात श्रोणीभागातील स्नायू आणि अस्थिबंधन अशक्त होतात. त्यामुळे गर्भाशय खाली घसरते आणि ते योनीमध्ये किंवा त्याही खाली येते. अशा परिस्थितीत गर्भाशय काढावे की नाही याबद्दल स्त्रीरोगतज्ज्ञांमध्ये कायम वाद होत असतो. अशक्त झालेले अस्थिबंध व स्नायू यांना सशक्त करणे आणि फिजिओथेरपी रिहॅबिलिटेशन (श्रोणीभागाचे बळकटीकरण) गर्भाशय पकडून ठेवण्यासाठी पुरेसे आहे. हे लॅपरोस्कोपीने (लॅपरोस्कोपिक सॅक्रो-हिस्टरोपेक्सी) साध्य करता येते. गर्भाशय वाचविण्यासाठी व्हजायनल युटेरोसॅक्रल हिस्टेरपेक्सी हा योनीमार्गाद्वारे करण्यात येणार्‍या शस्त्रक्रियेचा पर्यायही अमलात आणता येऊ शकतो. या शस्त्रक्रियेमध्ये ओटिपोटावर व्रणही राहत नाहीत.

नॉन-सर्जिकल व्यवस्थापनात व्हजायनल पेसरीचा वापर केला जातो. यात काढता येऊ शकणारे अंगठीच्या आकाराचे रबराचे उपकरण योनीमार्गात बसविण्यात येते आणि उतरणार्‍या उतींच्या भागाला आधार देण्यात येतो. अनेक प्रकारच्या पेसरी उपलब्ध आहेत. त्यापैकी तुमच्यासाठी कोणती पेसरी योग्य आहे, ते तुमचे डॉक्टर ठरवतील. पेसरीमुळे घसरण थांबवता येत नसेल तरी त्याची लक्षणे अंशतः किंवा पूर्णपणे घालवता येऊ शकतात. गर्भधारणा केली असता गर्भाशय प्रसरण पावून योनीमार्गात येण्याआधी जागच्या जागी ठेवण्यासाठी याची मदत होऊ शकते.

गर्भाशयातून होणारा असाधारण रक्तस्त्राव

गर्भाशयात असाधारण रक्तस्त्राव होत असेल तर डायलेशन अँड क्युरेटेज (डी अँड सी) म्हणजेच सर्व्हिक्सचे विस्फारण आणि स्क्रॅपिंग किंवा स्कूपिंग करून गर्भाशयाच्या आतून टिश्यु (उती) काढणे. प्रोस्टॅग्लँडिन इनहिबिटर्स, संततीनियमनाच्या गोळ्या, जीएनआरएच प्रचालक, अँटि-फायब्रिनोलिटिक एजंट्स आदीं फार्मोकोलॉजिकल एजंट्ससह एंडोमेट्रिअल अ‍ॅब्लेशन ही सुद्धा उपचारपद्धती असू शकते. डी अँड सी नंतर गर्भाशयात एनएनजी-आययूएस किंवा मिरेना बसविता येऊ शकते. हे एक हॉर्मोनल डिलिव्हरी उपकरण आहे, जे एंडोमेट्रिअल वाढीस प्रतिबंध करू शकते आणि मासिक रक्तस्त्रावाच्या प्रमाणात घट होऊ शकते.

श्रोणीभागात होणार्‍या वेदना

वर नमूद केलेले आजार किंवा श्रोणीभागात सूज आल्यामुळे, अ‍ॅडहेसिव्ह आजार, आतड्याला सूज इत्यादीमुळे श्रोणीभागात वेदना होऊ शकतात. उपचारपद्धती निश्चित करण्यासाठी या आजाराचे निश्चित कारण शोधून काढणे अत्यावश्यक आहे. अ‍ॅडहेसिऑलिसिस म्हणजे अवयवाला आणि कार्याला अडथळा निर्माण करणार्‍या अ‍ॅडहेजन्स (चिकटलेल्या घटकांना) काढून टाकून कार्य सुरळीत करण्याची प्रक्रिया. त्याचप्रमाणे श्रोणीभागातील वेदना शमविण्यासाठी नसांचा अवरोध, चेताखंडन (डिनर्व्हेशन) प्रक्रिया, गर्भाशयातील अस्थिबंध काढून टाकणे इत्यादी प्रक्रिया करता येऊ शकतात. वेदनाशामक ट्रिगर पॉइंट इंजेक्शन, अ‍ॅक्युपंक्चर, फिजिकल थेरपी या उपचारपद्धतींचाही वापर करण्यात आला असून, त्याचे निरनिराळे परिणाम दिसून आले.

गर्भाशय काढून टाकल्यामुळे स्त्रीच्या शारीरिक, भावनिक आणि प्रजननक्षमतांवर परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या आजारासाठी उपलब्ध असलेल्या विविध उपचारपद्धतींच्या परिणामाबद्दल सखोल चर्चा करून मग निर्णय घेणे हितावह असते.

डॉ. अनु विनोद विज स्त्रीरोगतज्ज्ञ

First Published on: April 24, 2019 4:39 AM
Exit mobile version