लढा हिस्टरेक्टॉमीशी – भाग १

लढा हिस्टरेक्टॉमीशी – भाग १

Hysterectomy

भारतात हिस्टरेक्टॉमी करून घेणार्‍या तरुण महिलांची संख्या वाढताना दिसून येत आहे. हिस्टरेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढून घेण्याची शस्त्रक्रिया. या वाढत्या आकडेवारीबद्दल तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात ७ लाख महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांच्यापैकी १५ ते ४९ या वयोगटातील २२,००० महिलांनी २०१८ या वर्षात हिस्टरेक्टॉमी शस्त्रक्रिया करून घेतली. ही शस्त्रक्रिया करून घेणार्‍यांचे सरासरी वय ३४ आहे. याचा संबंध रजोनिवृत्ती आधी येण्याशी त्याचप्रमाणे गर्भधारणेशी असलेल्या समस्यांशी असू शकतो. जगभरात अशाप्रकारचा ट्रेंड दिसून येत आहे, ही चिंता वाढविणारी बाब आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही शस्त्रक्रिया टाळता येऊ शकते किंवा पर्याय उपलब्ध असताना हिस्टरेक्टॉमी करून घेण्याची आवश्यकता नाही असे मत वैद्यकीय वर्तुळातून व्यक्त होताना दिसत आहे.

हिस्टरेक्टॉमीचा परिणाम

मासिकपाळीदरम्यान प्रमाणापेक्षा अधिक रक्तस्त्राव होणे, दीर्घकालीन श्रोणीभागात होणार्‍या वेदना किंवा एंडोमेट्रऑसिस, गर्भाशयातील ट्युमर्स (फायब्रॉइड्स) किंवा स्त्रीच्या प्रजनन यंत्रणेतील कर्करोग (गर्भाशयाचा, अंडाशयाचा, सर्व्हायकल, फेलोपिअन ट्युब्स) यासारख्या आजारांसाठी हिस्टरेक्टॉमी करण्याचा सल्ला देण्यात येऊ शकतो. अशा शस्त्रक्रियांविषयी डॉक्टरांशी विस्तृत चर्चा करणे आवश्यक आहे. कारण या शस्त्रक्रियेवर एकूण आरोग्यावर, मूत्राशयाशी संबंधित अवयवांवर, लैंगिक आरोग्यावर, आयुर्मानावर आणि महिलेच्या प्रजननक्षमतेवर परिणाम होत असतो. वय किती असले तरी यामुळे रजोनिवृत्ती लवकर येते आणि त्यामुळे प्रजननक्षमतेवर आणि गर्भधारणेच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होत असतो. या शस्त्रक्रियेनंतर हाडांची घनता कमी होणे, संप्रेरकांच्या असंतुलनामुळे वागणुकीतील/भावनिक बदल होण्याचीही शक्यता असते.

हिस्टरेक्टॉमी वर्ज्यच केली पाहिजे, असा याचा अर्थ नव्हे. गर्भाशयाचा, सर्व्हिक्स, ओव्हरीज, फॅलोपिअन ट्युब, योनी या अवयवांना झालेला कर्करोग, उपचारांना दाद न देणारा गंभीर स्वरूपाचा संसर्ग (उदा. श्रोणीमार्गाला सूज), अ‍ॅडेनोमायोसिसमुळे गंभीर स्वरूपाचे आणि नियंत्रणाबाहेर असलेले गर्भाशयातून होणारा रक्तस्त्राव, प्रसूतीदरम्यान गर्भाशय फाटणे, गर्भाशयाचे स्खलन होणे इत्यादी प्रकारच्या गुंतागुंती असतील तर ही शस्त्रक्रिया करणे आवश्यक होऊन बसते.

हिस्टरेक्टॉमीला पर्याय असलेल्या उपचारपद्धती

गर्भाशयातील फायब्रॉइड्स

गर्भाशयातील फायब्रॉइड्ससाठी बहुतेक वेळा हिस्टरेक्टॉमी करण्याचा सल्ला देण्यात येतो. फायब्रॉइड्स हे सौम्य प्रकारचे ट्युमर्स असतात, बहुधा याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. किंबहुना हे ट्युमर्स प्रजननक्षम वयापासून वाढू लागतात आणि ते रजोनिवृत्तीपर्यंत राहतात. त्यानंतर वैषयिक संप्रेरकांचा र्‍हास झाल्यामुळे ते तातडीने कमी होऊ लागतात. म्हणजे, शस्त्रक्रिया टाळता येऊन प्रतीक्षा करणे व निरीक्षण करणे हा दृष्टिकोन अवलंबता येऊ शकतो. गर्भाशयातील फायब्रॉइड्सची दृश्य लक्षणे असतील तर किमान छेद देणार्‍या मायोमेक्टॉमी शस्त्रक्रियेने त्यावर उपचार करता येऊ शकतात. हाय-फ्रेक्वेन्सी अल्ट्रा साऊंड अ‍ॅब्लेशन, गर्भाशयातील रक्तवाहिनीचे एम्बोलायझेशन इत्यादींचा समावेश असलेल्या मायोमेक्टॉमीने फायब्रॉइड्स काढून टाकता येतात. युटेरिन अर्टरी एम्बोलायझेशनमध्ये गर्भाशयातील रक्तवाहिन्यांमध्ये सूक्ष्म कण इंजेक्ट करण्यात येऊन फायब्रॉइड्सना खाद्य पुरविण्यात येते आणि त्यांना होणारा रक्त पुरवठा तोडण्यात यतो. या शस्त्रक्रियांच्या यशाचा दर हिस्टरेक्टॉमी एवढाच असतो आणि यात गुंतागुंत कमी होण्याची शक्यता असते. गोनाडोट्रॉपिन रिलिझिंग हार्मोन (जीएनआरएच) प्रचारक, तोंडावाटे घेण्याच्या संततीनियमनाच्या गोळ्या इत्यादींचा वापर करून हॉर्मोनल थेरपी यांचाही वापर करून उपचार करण्याचा सल्ला देता येऊ शकेल.

एंडोमेट्रिऑसिस

या आजारामध्ये युटेरिअन लायनिंगची (एंडोमेट्रिअम) इतर अवयवांमध्ये, सामान्यपणे ओव्हरीज, फॅलोपिअन ट्युब्स, आतडी, गर्भाशयाचे बाहेरील पटल आणि क्वचित मूत्रपिंड, मूत्राशय किंवा फुफ्फुसात वाढ होते. अशा आजारामध्ये त्या स्त्रीला गर्भधारणा करण्यास अडथळा निर्माण होतो. श्रोणीभागात किंवा ओटीपोटात वेदना होणे किंवा ताण येणे आणि मासिकपाळी दरम्यान प्रमाणापेक्षा जास्त स्त्राव होणे, ही लक्षणे दिसून येतात. दोन मासिक पाळ्यांमधील कालावधीतही स्पॉटिंग किंवा रक्तस्त्राव होतो. कालांतराने या आजारामुळे त्याचा परिणाम झालेल्या अवयवांच्या उतीवर चट्टा उठतो आणि यात प्रजननक्षमता समाविष्ट असते तेव्हा त्याची परिणती वंध्यत्वात होते.

एंडोमेट्रिऑसिसवर उपचार करण्यासाठी शस्त्रक्रिया न करता पर्यायी उपचार म्हणून एंडोमेट्रिअमचे छेदन/विशिष्ट उती काढून टाकणे, स्कार टिश्युमुळे झालेले ऑब्लिटरेशन कापणे. किमान छेद देऊन करण्यात आलेल्या उती काढण्याच्या शस्त्रक्रियेने वाढीव/स्कार टिश्यु पूर्णपणे काढले जात नाहीत, त्यावेळी लॅपरेक्टॉमी करण्याचा सल्ला देण्यात येऊ शकतो. या शस्त्रक्रियेमध्ये अधिक छेद द्यावा लागत असला आणि या शस्त्रक्रियेनंतर प्रकृती पूर्णपणे सामान्य होण्यास लागणारा कालावधी अधिक असला तरी हिस्टरेक्टॉमीच्या तुलनेत या शस्त्रक्रियेमध्ये कमी छेद द्यावा लागतो आणि गर्भधारणेची क्षमतेला धक्का लागत नाही.

फायब्रॉइड्सप्रमाणेच याही प्रकरणांमध्ये हॉर्मोनल थेरपी करण्याचा सल्ला देण्यात येऊ शकतो. वेदना शमविण्यासाठी नॉन-स्टरॉडिअल अँटि-इन्फ्लेमेटरी औषधे घेण्यास सांगितले जाईल. अ‍ॅक्युपंक्चर, बायोफीडबॅक यांचाही एंडोमेट्रिऑसिसचे व्यवस्थापन करण्यासाठी उपयोग होऊ शकतो.

डॉ. अनु विनोद विज स्त्रीरोगतज्ज्ञ

First Published on: April 23, 2019 4:56 AM
Exit mobile version