येवल्यातल्या तरुणांची अनोखी कल्पकता, पैठणीवर साकारले गड-किल्ले

येवल्यातल्या तरुणांची अनोखी कल्पकता, पैठणीवर साकारले गड-किल्ले

साडी हा सगळ्याच स्त्रियांचा आवडीचा विषय आहे. प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या वॉर्डरोबमध्ये वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनच्या आणि डिझाईन्सच्या साड्या असाव्यात असे नेहमीच वाटत असते. सध्याच्या काळात जेवढ्या युनिक डिझाइन्स तेवढी त्या साडीला जास्त मागणी असते. त्यात जर ती पैठणी असेल तर त्या पैठणीचं (paithani) जास्त आकर्षण असते. पैठणीचे माहेरघर असलेल्या येवला शहरात (yeola saree) पैठणीवर खूप आकर्षक आणि वेगळ्या पद्धतीच्या नक्षी साकारण्यात आल्या आहेत… जाणून घेऊया पैठणीच्या या नव्या लुक विषयी.

पैठणीचे माहेरघर असलेल्या नाशिकच्या (nashik) येवला शहरातील पैठणी या जगप्रसिद्ध आहेत. येवल्याचे पैठणी कारागीरसुद्धा त्यांच्या कलेत अगदी निपूण आहेत. हे कारागीर त्यांची कला नेहमीच साडीवर साकारत असतात. त्यापैकीच दोन कारागिरांनी आपल्या कल्पकतेने साड्यांवर काही विशेष असे नक्षीकाम केले आहे. रोहित पैंजणे (rohit painjane)आणि प्रशांत पैंजणे ( prashant painjane) येवल्याच्या या भावंडानी अशीच एक वेगळी नक्षी साडीवर साकारली आहे. या दोघांनी साडीवर शनिवार वाडा, प्रतापगड सारखे गडकिल्ले, मावळे, ढाल तलवार यांचे नक्षीकाम केले आहे. हे दोघं नेहमीच साड्यांवर विविध नक्षी साकारत असतात. आपल्या महाराष्ट्राचा वैभवशाली आणि भव्यदिव्य असा इतिहास इथल्या नागरिकांनी जपावा यासाठी या भावंडांनी इतिहासातले दाखले देत गड – किल्ले आणि राजवाडे यांचे विणकाम साडीवर केले आहे.  या पुढेही विविध नक्षीकाम साडीवर करत आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीतील विविध संदर्भ देत असं अनोखं विणकाम करत संस्कृती जपणार असल्याचे या विणकर भावंडांनी सांगितले. या कामासाठी त्यांना पाच ते सहा महिने एवढा कालावधी लागतो, असेही त्यांनी सांगितले.

पैठणी विणकर पैंजणे यांनी सांगितले की, येवला हे पैठणीचं जगप्रसिद्ध शहर आहे. आमच्या घरी मागच्या १०० ते १२० वर्षांपासून पैठणीवर विणकाम करून ती तयार करण्याची परंपरा आहे. माझ्या आजोबांपासून आम्ही पैठणीचे काम करत आहोत. मी स्वतः मागच्या १५ वर्षांपासून पैठणीवर नक्षीकाम करत आहे. आतापर्यंत येवल्यामध्ये अनेक कारागिरांनी अनेक प्रकारच्या नक्षी पैठणीवर केल्या आहेत. पण मी थोडा वेगळा विचार करत एक वेगळे नक्षीकाम करण्याचा प्रयत्न केला आणि एक अनोखी पैठणी तयार केली आहे. त्यामध्ये शनिवार वाडा (shaniwar wada) आणि प्रतापगडाच्या (pratapgad) नक्षीचे कॉम्बिनेशन केले आहे. ही साडी बनविण्यासाठी मला पाच ते सहा महिन्यांचा वेळ लागला. ही साडी संपूर्णतः रेशमी असून तिला रेशमाची जर सुद्धा आहे. येणाऱ्या आषाढी एकादशीचे औचित्य साधून मी साडीवर विठ्ठल आणि रुख्मिणी यांच्या प्रतिमेचे विणकाम करत आहे. पुढी काहीच दिवसात नवे नक्षीकाम केलेली साडी पूर्ण होणार आहे’

रोहित आणि प्रशांत (rohit, prashant) या भावंडांची ही पैठणी विणकाम करण्याची कला नक्कीच वेगळी आहे. आणि त्यामधून त्यांचा वेगळा प्रयत्नसुद्धा दिसतो. साड्यांची आवड असणाऱ्या स्त्रिया प्रत्येक वेळी काही खास कार्यक्रमासाठी साड्यांचे नवनवीन ऑप्शन्स शोधत असतात. त्यांच्यासाठी या पैठणी नक्कीच खास ठरतील.

 

First Published on: May 25, 2022 8:46 PM
Exit mobile version