सख्ख्या मैत्रिणी

सख्ख्या मैत्रिणी

Two friends

आयुष्यात नातीही असायला पाहिजेत.नात्यांशिवाय जगण्यात काही अर्थ नसतो. आपण नाती जपण्यासाठी कितीतरी वेळा आपल्या मर्जीविरुद्ध त्यांना पाठिंबा देतो. सर्व नाती रक्ताचीच असतात असे नाही. काही नाती आपल्या मानण्यावर अवलंबून असतात. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे माझ्या कार्यालयातील एक मैत्रिण आहे. तिच्याशी माझे मैत्रीचे नाते गेली ५ दशके चालू आहे. अशी समजूतदार लाघवी व वेळप्रसंगी उपयोगी पडणारी माझी मैत्रिण म्हणजे श्रीमती पुष्पा शंकर चव्हाण.

मी नोकरीत १७-८-१९६८ रोजी लागले. त्याच दिवशी तिची आणि माझी आमच्या कार्यालयात ओळख झाली. त्या दिवसापासून तिची आणि माझी मैत्री एखाद्या चिंगमसारखी चिवट व पक्की आहे. पुष्पा एल्फिन्स्टन व मी ग्रॅन्टरोडला रहात होते, त्यामुळे सकाळी ९:१०ची बांद्रा-चर्चगेट गाडी ठरलेली होती. चर्चगेटला उतरून आम्ही गप्पा मारत, रमत, गमत कार्यालयात ठीक १० वाजता पोहचत होतो. कार्यालयात वेगवेगळ्या विभागात आम्ही काम करीत होतो. तरी दुपारच्या लंच टाइममध्ये, संध्याकाळी ५ वाजता कार्यालयाची वेळ संपली की भेटत होतो. कालांतराने तिचे घर व माझे घर एकच वाटायला लागले इतके आम्ही एकरूप झालो. एकमेकींच्या सुखदुःखाच्या वेळी मदत करणे, काही अडचणी असल्यास त्यातून मार्ग काढणे, दोन्ही घरातील नातेवाइकांच्या आजारपणाच्या वेळी आपुलकीने विचारपूस करून जेवढी आपल्याकडून मदत करता येईल तेवढी करणे, असं आमचं कौटुंबिक नातं अद्यापपर्यंत चालू आहे व तसेच पुढे चालू राहील.

आता तर खूपच सोयीचे मार्ग उपलब्ध झाले आहेत. दूरध्वनी, मोबाईल वगैरे. वयोमानानुसार जरी आमच्या भेटीगाठी होत नसल्या तरी दूरध्वनी, मोबाईल या मार्गाने आम्ही दोघीही एकमेकींच्या संपर्कात असून व पुढेही राहू. माझा माझ्या मैत्रिणीवर खूप जीव आहे. मैत्रीच्या या नात्याला मी आदराने पाहते व हा मैत्रीचा धागा आम्ही दोघी हयात असेपर्यंत असाच मजबूत राहू दे अशी देवापुढे प्रार्थना करते.

-वृंदा वसंत हरयाण

First Published on: November 21, 2018 5:51 AM
Exit mobile version