मुलांच्या सुट्टीचे नियोजन करताना…

मुलांच्या सुट्टीचे नियोजन करताना…

Children

वार्षिक परीक्षेनंतर येणारी दीड-दोन महिन्यांची उन्हाळी सुट्टी मुलांनी केवळ आळसात न घालवता या सुट्टीचा मुलांच्या प्रगतीसाठी सदुपयोग व्हावा अशीच भावना आज पालकांमध्ये दिसून येते. किंबहूना मुलांनी या सुट्टीत केवळ भटकंती न करता, काही छंदवर्ग, शिबिरांना हजेरी लावावी यासाठी पालक उन्हाळी सुट्टीचे नियोजन करण्याचा विचार करतात. मुलांच्या उन्हाळी सुट्टीचे नियोजन करताना काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.

मुलांच्या सुट्टीचे नियोजन करण्यापूर्वी सर्व पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की वर्षभर मुले अभ्यासात मग्न असतात. तेव्हा सुट्टीचे नियोजन करताना जो काही कार्यक्रम किंवा छंदवर्ग तुम्ही मुलांसाठी निवडणार आहात त्यात मुलांच्या आवडी-निवडी तसेच त्यांना स्वच्छंद वागण्याला सगळ्यात जास्त वाव असू द्या.

१ ली ते ४ थीतील मुले

ज्यांची मुले ६ ते १० वर्षे वयोगटात मोडतात, अशा पालकांनी मुलांच्या सुट्टीचे नियोजन करताना त्यांच्या वयाचा विचार करावा. या वयोगटातील मुलांच्या आवडीनिवडी विकसित झालेल्या नसतात. तेव्हा त्यांना चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे यासारख्या वर्कशॉप्सना किंवा शिबिरांना तुम्ही घालू शकता, पण त्याचीही वेळ मर्यादा दोन तासांपेक्षा जास्त नसावी. त्याचप्रमाणे या वयोगटातील मुलांना शाळेमध्ये कार्यानुभवाच्या तासाला शिकवल्या जाणार्‍या गोष्टी घरी करून बघणे फार आवडते. त्यामुळे त्यांना आवडत्या कार्टूनचे चित्र काढणे, त्यात वेगवेगळे रंग भरणे, चित्रावर डाळी चिकटवणे यासारखे प्रकल्प द्या. मात्र, असे प्रकल्प देताना मुलांना तो प्रकल्प कंटाळा न वाटता चॅलेंज वाटावा, असा असावा. त्यामुळे मुलांनी प्रकल्प पूर्ण करताच त्यांना बक्षीस देऊन त्यांच्या कामाची स्तुती करावी. असे केल्याने मुले लक्ष देऊन प्रकल्प पूर्ण करतात, त्यामुळे त्यांची एकाग्रता वाढीस लागण्यास मदत होते. त्याचबरोबर घरच्या कामात त्यांना सहभागी करून घ्या, त्यामुळे त्यांना मोठ्या मुलांसारखे ट्रीट केल्याचे समाधान मिळते.

४ थी ते ७ वीतील मुले

या वयोगटातली मुले दहा ते बारा वयोगटातील असतात. या वयोगटातल्या मुलांना धाडसी किंवा साहसी खेळ, मैदानी खेळ या गोष्टींबद्दल कुतूहल असते आणि त्या गोष्टी करून पहायच्या असतात, पण त्यांच्या कुतूहलाला प्रोत्साहन देण्याबरोबरच त्यांच्यात परिणामांची जाणीव निर्माण करणे महत्त्वाचे असते. जंगल कॅम्पस, पोहणे, बॅडमिंटन यांसारख्या शिबिरांना जायला मुलांना आवडते, परंतु मुलांना अशा शिबिरांना पाठवण्याआधी अशा शिबिराच्या सुरक्षिततेविषयी संपूर्ण माहिती करून घेणे अत्यावश्यक ठरेल. या वयातल्या मुलांना जर आवड असेल तर विज्ञानाच्या छोट्या-छोट्या वर्कशॉप्सना पाठवता येईल. या मुलांबरोबर तुम्ही वेगवेगळी म्युझियम्स, राष्ट्रीय उद्याने, प्राणीसंग्रहालये पहायला जाऊ शकता, पण जंगलात जाताना किंवा म्युझियम्स पहायला जाताना एखादा गाइड किंवा पुस्तक आठवणीने सोबत घेऊन जावे. यामुळे मुलांच्या प्रश्नांना लगेच उत्तरे देता येतात.

८ वी ते १० वीतील मुले

या वयात मुलांना आईबाबांबरोबर कुठे जाण्यापेक्षा मित्रमैत्रिणींबरोबर जाणे जास्त आवडते. त्यांच्यासाठी शाळांमधून होणारे वर्कशॉप्स, छंदवर्ग, दूरच्या गावात एखाद्या शाळेत जाऊन राहणे अशी शिबिरे निवडावीत, पण ती निवडताना ती मान्यताप्राप्त व विश्वासार्ह संस्थांची असतील याची काळजी घ्यावी. गडकिल्ल्यांच्या सफरीवर नेल्यासही मुले खूप खुश असतात. या वयोगटात मुलींसाठी स्टफ्ड टॉईज मेकिंग, ज्वेलरी मेकिंग, मेंदी, एम्ब्रॉयडरी असे वेगवेगळे कोर्स उपलब्ध असतात. ज्या मुला-मुलींना पुढे जाऊन फॅशन इंडस्ट्री किंवा फॅब्रिक इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी सुट्टीमध्येच फॅशन डिझायनिंग, एम्ब्रॉयडरी, फॅब्रिक पेंटिंग असे कोर्सेस करणे उपयोगाचे ठरू शकते. हे कोर्सेस करणे त्यांना आवडीचेही असते तसेच त्यातून त्यांना थोडेफार शिक्षणही मिळून जाते.

First Published on: March 31, 2019 4:26 AM
Exit mobile version