राज्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या १०३

राज्यात कोरोना चाचणी प्रयोगशाळांची संख्या १०३

राज्यात कोरोना चाचण्यांसाठी प्रयोग शाळांची संख्या आता १०३वर पोहेाचली आहे. यात ६० शासकीय तर ४३ खासगी प्रयोगशाळांचा समावेश आहे. २६ मे ते २० जून या कालावधीत प्रयोगशाळांच्या संख्येत ३० ने वाढ झाली असून प्रति दशलक्ष चाचण्यांची संख्याही दुप्पटीने वाढली आहे. अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. ९ मार्च रोजी राज्यात कोरोनाचा पाहिला रुग्ण आढळून आला त्यावेळेस मुंबई आणि पुणे या दोन ठिकाणी चाचण्यांची सुविधा होती. त्यानंतर कोराना चाचण्यांच्या सुविधेत राज्यशासनाने वाढ केल्याने ही संख्या आता १०३ एवढी झाली आहे. राज्याचे प्रतिदशलक्ष प्रयोगशाळा नमुन्यांचे प्रमाण ५८४७ एवढे असून देशपातळीवरील हे प्रमाण ४६१० एवढे आहे.
देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत असून गेल्या तीन महिन्यात सातत्याने चाचण्यांची क्षमता वाढविण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याचा दावा आरोग्य मंत्र्यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते रत्नागिरी, सिंधुदूर्ग, मुंबईतील जी.टी. हॉस्पीटल येथील प्रयोगशाळांचा शुभारंभ गेल्या आठवड्यात करण्यात आला. कालपर्यंत ७ लाख ७३ हजार ८६५ एवढे नमुने पाठविण्यात आले असून त्यापैकी १ लाख ३२ हजार ७५ एवढे नमुने पॉझीटीव्ह आले आहेत. एकूण पाठविलेल्या नमुन्यांपैकी पॉझिटीव्ह आलेल्या नमुन्यांचे प्रमाणे हे १७ टक्के आढळून आले आहे.
२६ मे रोजी राज्यात ७३ प्रयोगशाळा होत्या त्यावेळी प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ३ हजार ३४७ एवढे होते. २९ मे रोजी ७७ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ३३८७ होते. ५ जून रोजी राज्यात ८३ प्रयोगशाळा होत्या तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ४०८६ एवढे होते. १२ जून रोजी ९५ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाणे ४८६१ एवढे होते. २१ जून रोजी १०३ प्रयोगशाळा तर प्रतिदशलक्ष चाचण्यांचे प्रमाण ५८४७ एवढे आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हावार प्रयोगशाळांची संख्या

मुंबई- २७(शासकीय १२, खासगी १५), ठाणे- ७(शासकीय २, खासगी ५), नवी मुंबई- ३(शासकीय १, खासगी २), पुणे- २२, (शासकीय १०, खासगी १२), नागपूर- ११(शासकीय ७, खासगी ४), कोल्हापूर- ३(शासकीय २, खासगी १), नाशिक- ४(शासकीय २, खासगी २), सातारा- २(शासकीय १, खासगी १), अहमदनगर – २ (शासकीय १, खासगी १), पालघर (डहाणू) – १, रत्नागिरी -१, सिंधुदूर्ग – १,सांगली (मिरज)- १, सोलापूर- २, धुळे- १, जळगाव – १, अकोला- १, अमरावती- २, यवतमाळ- १, गडचिरोली- १, चंद्रपूर-१, गोंदिया – १, वर्धा- १, औरंगाबाद- १, नांदेड- २, बीड- १, लातूर- १, परभणी- १

First Published on: June 22, 2020 7:41 PM
Exit mobile version