पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी ‘हा’ नवा क्रमांक; ‘१००’ नंबर होणार इतिहासजमा!

पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी ‘हा’ नवा क्रमांक; ‘१००’ नंबर होणार इतिहासजमा!

महाराष्ट्रात पोलिसांशी संपर्क साधण्यासाठी यापूर्वी ‘१००’ हा नंबर होता. मात्र आता तो बदलला जाणार असून, ‘११२’ या एकाच हेल्पलाइनवरून सर्व प्रकारची मदत मिळणार आहे. पोलिस, अग्निशमनदल आणि महिला हेल्पलाइनची एकत्रित मदत उपलब्ध करून देण्यासाठी देशपातळीवर हा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशासह देशातील २० राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही पोलिसांशी संपर्क साधण्याचा ‘१००’ हा नंबर बदलणार आहे.

दरम्यान देशातील २० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी एकच आपत्कालीन हेल्पलाइन क्रमांक ‘११२’ स्वीकारला आहे. वर्षभरापूर्वी २६ ऑक्टोबरला उत्तर प्रदेश सरकारने १०० क्रमांक बंद करून ‘११२’ ही हेल्पलाइन स्वीकारली होती. त्यानंतर आता महाराष्ट्र पोलिसांकडूनही या नव्या हेल्पलाइनचा अवलंब करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.

सध्या राज्यात पोलिसांसाठी संपर्क करायचा झाल्यास १००, अग्निशमनदल १०१ आणि महिला हेल्पलाइन १०९० या क्रमांकांवर संपर्क साधावा लागतो. या सर्व हेल्पलाइनचे एकत्रीकरण केले जात आहे. दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर केंद्र पातळीवर एकच हेल्पलाइन असावी, असा सूर सर्व स्तरातून उमटला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य प्रणाली (ईआरएसएस) निर्मितीचा निर्णय घेण्यात आला आहे.

एकाच वेळी सर्व प्रकारची मदत पीडितांना मिळावी यासाठी केंद्र पातळीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ३१ डिसेंबरपर्यंत राज्यात ११२ ही हेल्पलाइन सुरू व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. सेंट्रलाइज कंट्रोल रूममध्ये एका वेळेस किमान ७० ते ८० प्रशिक्षित लोक काम करणार आहेत. त्यामुळे नागरिकांना कमीत कमी वेळात सर्व प्रकारची मदत पोहोचविली जाईल. ‘११२’ सुरू झाल्यावर पुढील काही दिवसांसाठी १०० क्रमांकही क्रमांकही सुरू ठेवण्यात येणार आहे.

वर्षाअखेरीपर्यंत राज्यात ‘११२’ हेल्पलाइन कार्यान्वित होणार 

मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षाअखेरीपर्यंत राज्यात सर्वत्र ‘११२’ हेल्पलाइन कार्यान्वित करण्यासाठी पोलिस प्रशासनाचे प्रयत्न आहेत. यासाठी सविस्तर प्रशिक्षण संबंधितांना दिले जाणार आहे. राज्यात असलेल्या पोलिस प्रशिक्षण केंद्रातून टप्प्याटप्याने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विशिष्ट यंत्रणेच्या साह्याने एका ठिकाणी फोन लावल्यावर अवघ्या काही सेकंदात हा फोन कोठून आला आहे, हे संबंधितांना समजणार आहे. त्यानंतर तेथील पोलिस नियंत्रण कक्ष, अग्निशमनदल, महिला हेल्पलाइन, चाइल्ड हेल्पलाइन यांना एकाच वेळेस या कॉलची माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यकतेनुसार सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे.


अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह ‘यांना’ही लोकलची परवानगी द्या; हायकोर्टाच्या राज्य सरकारला सूचना

First Published on: October 20, 2020 9:35 AM
Exit mobile version