मुंबईत गोवरचा १५ वा बळी; ५ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू

मुंबईत गोवरचा १५ वा बळी; ५ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई: गोवरच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या २४ तासात आणखीन एका मुलाचा बळी गेला आहे. वडाळा येथे राहणाऱ्या पाच महिन्याच्या मुलाचा गोवरमुळे संशयित मृत्यू झाला असून त्याचा वैदकीय अहवाल आल्यावर त्याचा मृत्यू गोवरमुळे की आणखीन कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला स्पष्ट होणार आहे.

सध्या मुंबईत भायखळा, वरळी, वडाळा-अँटॉप हिल, धारावी, अंधेरी, कुर्ला , भांडुप, मालाड, चेंबूर, गोवंडी, दहिसर आदी भागात आणि मुंबईलगत ठाणे, नालासोपारा आदी भागात ‘गोवर’चा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आतापर्यंत १५ रुग्णांचा बळी गेला आहे. यामध्ये, मुंबईतील १२ रुग्णांचा व मुंबई बाहेरील ३ रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत गोवर बाधित रुग्णांची संख्या ३०८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत गोवरचे ११८ संशयीत रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे गोवरबाधित संशयित रुग्णांची संख्या आता ४,१८० वर पोहोचली आहे. तसेच, गोवर बाधित ४३ रुग्ण उपचारासाठी विविध रुग्णालयात दाखल आहेत. त्यापैकी २ रुग्णांना व्हेंटिलेटर ठेवण्यात आले आहे. दिवसभरात २९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. पालिकेच्या आरोग्य पथकाने आतापर्यंत ५३ लाख ६ हजार ७८७ घरांचे सर्वेक्षण केले आहे.

– वडाळा येथे राहणाऱ्या ५ महिन्याच्या मुलाच्या मृत्यूबाबत माहिती

वडाळा येथे राहणाऱ्या सदर ५ महिन्यांच्या मुलाला गोवरची लस देण्यात आली होती. मात्र ११ नोव्हेंबर रोजी त्याला खोकला आणि सर्दीचा त्रास सुरू झाला. त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र २३ नोव्हेंबर त्याला उपचार सुरू असताना ताप आला होता. त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी त्याच्या चेह-यावर व छातीवर मॅक्युलोपापुलर पुरळ उठले होते.

नंतर त्याला पुढील उपचारासाठी २६ नोव्हेंबर पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू झाले असताना त्याला डोळे आल्याचे निदर्शनास आले. तर २७ नोव्हेंबर रोजी त्याला श्वसनाचा त्रास सुरू झाला व त्याची प्रकृती गंभीर झाली. २८ नोव्हेंबर रोजी सर्व अत्यावश्यक वैद्यकीय उपचार करुनही त्याची स्थिती खालावत जाऊन सायंकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.


हेही वाचा : तुकाराम मुंढेंची दोन महिन्यांत आरोग्य खात्यातून उचलबांगडी, नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत


 

First Published on: November 29, 2022 10:52 PM
Exit mobile version