एसटीसह आता खासगी बसमध्येही महिलांना ५० टक्के सवलत, कुठे झाला निर्णय?

एसटीसह आता खासगी बसमध्येही महिलांना ५० टक्के सवलत, कुठे झाला निर्णय?

50 Percent Discount in Private Bus for women | चंद्रपूर – राज्यातील महिलांसाठी राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या बसमधून (ST Busses) प्रवासासाठी ५० टक्के सवलत दिली आहे. आता खासगी बसचालकांनीही महिलांसाठी ५० टक्के सवलत देऊ केली आहे. चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने (Chandrapur-Gadchiroli Travels Association) या संदर्भातील घोषणा केली आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी झाली आहे.

चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने यासंदर्भात मंगळवारी बैठक घेतली होती. या बैठकीत महिलांना ५० टक्के सवलत देण्यासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेनंतर सवलत देण्याविषयी निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे, आज गुढीपाडव्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – एसटी प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत, पण ‘हे’ नियम लागू!

महिला सन्मान योजनेअंतर्गत राज्य सरकारने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एसटीच्या सर्व बसमध्ये ५० टक्के सवलत देण्याची घोषणा केली. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना याबाबत घोषणा केली होती. राज्यभरातील महिला वर्गाकडून या योजनेला सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या असून हजारो महिला प्रवाशांनी या सवलतीचा लाभही उचलला आहे. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस राज्यातील सर्वच कोपऱ्यात सेवा देतात. परंतु, अनेक ठिकाणी एसटी बसेसच्या फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांना खासगी वाहतुकीचा वापर करावा लागतो. एसटी महामंडळाने महिलांना सवलत देण्याचा निर्णय घेतल्याने अनेक खासगी बसचालकांनीही यासंदर्भात निर्णय घेतला आहे. त्यानुसार, चंद्रपूर-गडचिरोली ट्रॅव्हल्स असोसिएशनने याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

हेही वाचा – महिलांच्या हाफ तिकीटने एसटीचा गल्ला फुल्ल; एकाच दिवसात इतक्या कोटींची कमाई

राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. खासगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्याही मोठी आहे. महिलांच्या सन्मानासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असं ट्रॅव्हल्स असोसिएशनचे अध्यक्ष चंदन पाल म्हणाले.

First Published on: March 22, 2023 2:38 PM
Exit mobile version