ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचे 7 महत्त्वाचे निर्णय, मोहफुलांच्या दारूला विदेश मद्याचा दर्जा

ठाकरेंच्या मंत्रिमंडळाचे 7 महत्त्वाचे निर्णय, मोहफुलांच्या दारूला विदेश मद्याचा दर्जा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबईः ठाकरेंच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली असून, या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेत. काजूबोंडे, मोहफुलांच्या दारूला विदेश मद्याचा दर्जा देणार असल्याचं मंत्रिमंडळात एकमतानं ठरवण्यात आलंय. त्यामुळे गावठी दारूला आता विदेश मद्याचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे मेट्रो भुयारी मार्ग, काजूबोंडे, मोहफूल मद्य आणि नवी मुंबईतीली तिरुपती देवस्थानास मंदिर उभारण्यास भूखंड देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय.

मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

>> जिल्हा वार्षिक योजने(सर्वसाधारण) अंतर्गत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाशी संबंधित योजनांची पुनर्रचना करून, त्यासाठी किमान ५ टक्के निधी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग)
>> तिरुपती देवस्थानास नवी मुंबई येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारणीसाठी भूखंड प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (नगरविकास विभाग)
>> पुणे महानगर मेट्रो रेल्वे टप्पा-१ची विस्तारीत मार्गिका स्वारगेट ते कात्रज पूर्णत: भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्प करण्यास मान्यता देण्यात आलीय. (नगरविकास विभाग)
>> महसूल वाढीसाठी विद्यमान एफएल-२ परवान्यातून अतिउच्च दर्जाची मद्यविक्री परवाना आणि उच्च दर्जाची मद्यविक्री परवाना असे उपवर्ग निर्माण करण्यास मान्यता मिळालीय. (गृह विभाग)
>> काजूबोंडे, मोहफुलेपासून उत्पादित केलेल्या मद्यास विदेशी मद्य, असा दर्जा देण्याचा आणि या पदार्थांसह फळे, फुले यापासून मद्यपार्क उत्पादन आणि त्यातून विदेशी मद्यनिर्मिती करण्यासाठी धोरण ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (गृह विभाग)
>> शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या भागभांडवलाची मर्यादा वाढविण्यास मान्यता देण्यात आली आहे. (इतर मागास बहुजन कल्याण विभाग)
>> मुंबईतील मौजे मनोरी (ता. बोरिवली) येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला भाडेपट्ट्याने मंजूर शासकीय जमिनीचा भाडेपट्टा पुढील ३० वर्षासाठी नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. (महसूल विभाग)

काजू, मोहाच्या दारूला विदेशी मद्याचा दर्जा

काजूबोंडे, मोहाफुले यापासून उत्पादित केलेल्या मद्याची वर्गवारी “देशी मद्य” याऐवजी आता  “विदेशी मद्य” अशी करण्याचा निर्णय बुधवारी राज्यत मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.   या पदार्थांसह फळे, फुलांच्या मद्यार्काद्वारे “स्थानिक मद्य” निर्मितीच्या धोरणास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. काजूबोंडे आणि  मोहाफुलांच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणा-या मद्याचे वर्गीकरण हे २००५  पासून “देशी मद्य” असे करण्यात आले होते. या वर्गीकरणामुळे या मद्याच्या विपणनास आणि  मुल्यवृद्धीस मर्यादा येत होत्या. त्यामुळे काजूबोंडे, मोहाफुले या पदार्थांसह  स्थानिकरित्या उत्पादित होणाऱ्या फळे,फुले यापासून तयार होणाऱ्या मद्यार्कापासून जे मद्य तयार केले जाईल त्यास ‘देशी मद्य’ याऐवजी ‘विदेशी मद्य’ असा दर्जा देण्यास मान्यता देण्यात येत आहे. अशा मद्यार्कापासून निर्मित होणा-या मद्यास “स्थानिक मद्य” असे संबोधण्यात येईल.
व्यंकटेश्वराचे मंदिर भाविक तसेच  पर्यटकांसाठी आकर्षण  ठरणार
 
नवी मुंबईतील उलवे नोड येथे व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडेपट्टयाने १० एकर  जमीन देण्यास बुधवारी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.  शहर पातळीवरील सुविधा (सिटी लेवल फॅसिलिटी) म्हणून विशेष प्रकल्पाअंतर्गत श्री व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणीसाठी उलवे नोडमधील सेक्टर-१२, भुखंड क्र.३ येथे जमीन देण्यात येणार आहे. त्यानुसार  उलवे नोडमधील सेक्टर-१२  भुखंड क्र.३   एक  चटईक्षेत्र निर्देशांकासह भाडेपट्टयाने  थेट वाटप करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानम बोर्डातर्फे देशात हैद्राबाद, चेन्नई, कन्याकुमारी, बंगलुरु, विशाखापट्टनम, भुवनेश्वर, जम्मू, नवी दिल्ली, कुरुक्षेत्र व ऋषिकेश या ठिकाणी शहर पातळीवरील सुविधा म्हणून भगवान श्री व्यंकटेश्वराचे मंदीर उभारणी करण्यात आली आहे. या धर्तीवर नवी मुंबईमध्ये मंदिर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानाने जमीन उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.
नवी मुंबईतील श्री व्यंकटेश्वराचे मंदीर भाविकांसाठी तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यामुळे त्या परिसराला धार्मिक व सामाजिक महत्त्व प्राप्त होऊन स्थानिक परिसरात रोजगार संधी निर्माण होतील. या देवस्थानामार्फत या परिसरात अनेक समाज उपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. सर्व बाबींचा विचार करुन एक विशेष बाब म्हणून हा भूखंड उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
गगनगिरी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या जमिनीच्या भाडेपट्ट्याचे नूतनीकरण

मुंबईतील मनोरी (ता.बोरीवली) येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्टला दिलेल्या शासकीय जमिनीच्या भाडेपट्टयाचे पुढील ३० वर्षासाठी नुतनीकरण करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज आश्रम चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेस मौजे मनोरी  येथील स.नं.२६०  मधील ५५ एकर १५ गुंठे शासकीय जमीन, झाडे लावून त्यांची जोपासना करण्यासाठी ४ एप्रिल १९९० पासून ३०  वर्षाच्या कालावधीसाठी वार्षिक १ रुपये या नाममात्र भाडेपट्टयाने मंजूर केलेली होती.  या जमिनीचा भाडेपट्टा ३  एप्रिल २०२० रोजी संपुष्टात आला होता.

शासकीय जमीन प्रदान करतांना आकारावयाच्या भूईभाडयाच्या नाममात्र दरात अथवा सवलतीच्या दरात सुधारणा करण्याचे धोरण निश्चित होईपर्यंत या संस्थेकडून १ रुपये इतके वार्षिक नाममात्र भुईभाडे आकारण्यात येणार आहे. त्यानंतर सुधारित धोरणातील तरतुदीप्रमाणे ४ एप्रिल २०२०  पासून पूर्वलक्षी प्रभावाने वार्षिक भुईभाडे आकारण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.  याबाबत या संस्थेला मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांना हमीपत्र लिहून देतांना विहीत अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे.
 शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास 100 कोटींचे भागभांडवल

शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे अधिकृत भागभांडवल १००  कोटी रुपये करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ हे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि  विकास महामंडळाची कोकण विभागाची उपकंपनी आहे. यापूर्वी महामंडळाचे अधिकृत भागभांडवल १५ कोटी रुपये होते. त्यामध्ये भरीव वाढ करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

पुण्यातील स्वारगेट ते कात्रज भुयारी रेल्वे प्रकल्पास मान्यता

पुणे महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज या भुयारी रेल्वे प्रकल्पास बुधवारी  झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा प्रकल्प एप्रिल 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (महामेट्रो) मार्फत हा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यामध्ये महानगर मेट्रो रेल्वे प्रकल्पातील स्वारगेट ते कात्रज ही  टप्पा-१ ची विस्तारीत मार्गिका भुयारी पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे.  या प्रकल्पासाठी ३ हजार ६६८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

स्वारगेट ते कात्रज (कॉरिडोर-२ए) या ५.४६४  कि.मी. लांबीच्या मार्गावर ३ स्थानके असतील. पुणे शहरातील स्वारगेट व कात्रज प्रमुख उपनगरे असून त्यादरम्यान गुलटेकडी, पद्मावती, मार्केट यार्ड, बिबवेवाडी, धनकवडी, बालाजीनगर, साईबाबानगर, आंबेगाव अशी महत्वाची ठिकाणे आहेत.  या परिसरातील वांरवार होणारी वाहतुकीची कोंडी टळून रस्त्यावरील दुर्घटना, प्रदूषण, इंधन खर्च, प्रवास कालावधी यामध्ये बचत होणार आहे.  पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना वातानुकूलित, सुरक्षित, आरामदायक प्रवासासाठी स्वारगेट ते कात्रज ही  भूयारी मेट्रो रेल्वे मार्गिका उपयोगी  ठरणार आहे.

हेही वाचाः “मटणकरीं’नी जरा सांभाळून…”; संदीप देशपांडेंचा अमोल मिटकरींना धमकीवजा इशारा

First Published on: April 20, 2022 8:09 PM
Exit mobile version