माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे- रायगडचे चौघे सज्ज; मुख्यमंत्र्यांनी भारतीय ध्वज देत दिल्या मोहिमेस शुभेच्छा

माउंट एव्हरेस्ट मोहीमेसाठी ठाणे- रायगडचे चौघे सज्ज; मुख्यमंत्र्यांनी भारतीय ध्वज देत दिल्या मोहिमेस शुभेच्छा

Chief Minister Eknath Shinde gave flag to Mount Everest climb people and wished them success

ठाणे: भारतीय रेल्वे सेवेत काम करणारे आणि ठाण्याचे सुपुत्र असलेले हेमंत जाधव, संदीप मोकाशी आणि बँकेत काम करणारे धनाजी जाधव यांच्यासह रायगड जिल्ह्यातील कर्जत रहिवाशी असलेले संतोष दगडे असा चार जणांचा चमू १ एप्रिलपासून माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी आगेचूक करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या चमूला भारतीय ध्वज देऊन मोहिम यशस्वी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. या मोहिमेमुळे निश्चितच ठाणे जिल्ह्यासह रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार आहे. दरम्यान या मोहिमांमागे छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमीच प्रेरणादायी असे सांगताना, हा चमू १ एप्रिल ते २७ मे २०२३ दरम्यान आता जगातील सर्वात ८८४८.८६ मीटर उंच असेलेले माउंट एव्हरेस्ट हे शिखर (29031 फूट) चढण्यासाठी सज्ज आहेत.

या मोहिमेचे प्रमुख असलेले बदलापूरचे हेमंत जाधव हे मध्य रेल्वेत अभियांत्रिकी विभागात कार्यरत आहेत तर डोंबिवलीचे संदीप मोकाशी हे मध्य रेल्वेमध्ये इलेक्ट्रिकल विभागात कार्यरत आहेत. कर्जतचे रहिवासी असलेले संतोष दगडे हे व्यावसायिक असून ठाण्यातील माजीवाडा येथील रहिवासी असलेले धनाजी जाधव हे बँकेत कार्यरत आहेत. हा चमूतील सर्वजण साहसी क्षेत्रात ३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अनुभवी गिर्यारोहक आहेत आणि त्यांनी NIM, HMI  येथून मूलभूत, प्रगत व शोध आणि बचाव क्रम अभ्यासक्रमासह व्यावसायिक प्रशिक्षण घेतले आहे. या कौशल्यांचा आणि ज्ञानाचा उपयोग माउंटन रेस्क्यू ऑपरेशनसारख्या सामाजिक सेवांसाठी आणि तरुणांमध्ये पर्यावरणाविषयी सकारात्मक विचार विकसित करण्यासाठी केला जातो. अनेक विद्यार्थी, मित्र आणि नातेवाईक यांना निसर्गाशी जोडण्यासाठी ते प्रेरणादायी आहेत. कोविड-19 दरम्यान या चमूतील सदस्यांनी काही दुर्गम भागातील लोकांना आवश्यक अन्न पुरवले. जेथे योग्य रस्ते उपलब्ध नाहीत अशा काही किल्ल्यांच्या पायथ्याशी/वाडी/वस्ती येथे अन्न पुरवले होते. त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये कारगिलमधील तांत्रिक आणि अवघड असलेले ७ हजार १३५ मीटर उंच माउंटन शिखर यशस्वीरित्या सर केले आहे. त्याशिवाय त्यांनी १२ हून अधिक ६ हजार मीटर वरील हिमालयीन शिखरे सर केली आहेत, अशी माहिती हेमंत जाधव यांनी दिली.

हा चमू १ एप्रिल रोजी मुंबईतून एव्हरेस्ट मोहिमेसाठी काठमांडू नेपाळ येथे रवाना होणार आहे. गुरुवारी रात्री त्या चमूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर अंबे मातेच्या दरबारात माउंट एव्हरेस्ट मोहीम-२०२३ ला भारताचा ध्वज सुपूर्द करुन मोहीम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

( हेही वाचा: April Fool’s Day 2023 : ‘एप्रिल फूल डे’ का साजरा केला जातो? ‘हा’ आहे इतिहास )

दानशूर व्यक्तींना मदतीचे आवाहन

ही मोहीम खर्चिक आहे. यासाठी प्रत्येकी ३० लाख रुपये इतका खर्च आहे. त्यानुसार पीएफ तसेच कर्ज घेऊन हा चमू निघाला आहे. जवळपास प्रत्येकाने १५ लाख जमा केले असून उर्वरित निधीचीही जमावाजमाव सुरू आहे. त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळीही प्रयत्नशील आहेत . याशिवाय या मोहिमेसाठी त्यांनी दानशूर व्यक्तींना शक्य तितकी मदत करण्याचे आवाहनदेखील केले आहे. या मदतीसाठी 9833558128 या नंबरवर संपर्क करून सहकार्य करा असे, या संघातील सदस्यांकडून आवाहन करण्यात आले आहे.

First Published on: March 31, 2023 6:40 PM
Exit mobile version