विदर्भात आता महाराष्ट्र समृद्ध आघाडीचा नारा!

विदर्भात आता महाराष्ट्र समृद्ध आघाडीचा नारा!

समृद्ध महाराष्ट्र आघाडी

अवघ्या काही महिन्यांत देशभरात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी आम आदमी पक्ष दिल्लीतून आता थेट महाराष्ट्रात उतरला आहे. विदर्भावर आम आदमी पक्षाने लक्ष केंद्रीत केलं असून विदर्भासाठी तब्बल १२ पक्षांची आघाडी करण्यात आली आहे. महाराष्ट्र समृद्ध आघाडी असं या आघाडीला नाव देण्यात आलं आहे. या आघाडीमध्ये बच्चू कडू, श्रीहरी अणे, वामनराव चटप, जांबुवंतराव धोटे यांच्या संघटनांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाचे राज्यातील नेते ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबईत गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही घोषणा केली. ‘ज्या ज्या ठिकाणी भाजपला हरवणं शक्य आहे, त्या त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू’, असं देखील सावंत यावेळी म्हणाले.

मुंबईतल्या सर्व जागा लढवणार

श्रीहरी अणे यांची विदर्भ पार्टी, बच्चू कडू यांची प्रहार संघटना अशा एकूण १२ संघटना या आघाडीमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्याशिवाय रघुनाथ दादा पाटील यांच्या शेतकरी समूहासोबत देखील आघाडीसाठी चर्चा सुरू आहेत, अशी माहिती यावेळी आपचे नेते सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली. महाराष्ट्रातल्या जवळपास २५ जागांवर तर मुंबईतल्या सर्वच जागांवर निवडणूक आम आदमी पक्ष निवडणूक लढवणार आहे.

वेगळ्या विदर्भाला आम आदमी पक्षाचा पाठिंबा आहे. महाराष्ट्रात जर छोटी छोटी राज्य असतील, तर त्याचा विकास चांगल्या पद्धतीने होऊ शकतो.

ब्रिगेडियर सुधीर सावंत, प्रदेशाध्यक्ष, आप

‘भाजपला मुळापासून उखडून टाकू’

दरम्यान, भाजपला जिथे जिथे पराभूत करणं शक्य आहे, तिथे आम्ही निवडणूक लढवणार असल्याचं सावंत यावेळी म्हणाले. ‘आम्ही यांना उखडून टाकू. दिल्लीत भ्रष्टाचार मुळापासून उखडून काढल्यामुळेच आज दिल्लीत पैसा जास्त आहे. पण जर २०१९मध्ये भाजप पुन्हा निवडून आली, तर देशात पुन्हा निवडणुका होणार नाहीत. त्यामुळे भाजपला हरवण्यासाठी आम्ही आघाडी केली आहे’, असं सावंत यांनी सांगितलं.

First Published on: February 7, 2019 2:38 PM
Exit mobile version