बोलेरो गाड्यांच्या कर्जप्रकरणी राजन तेली यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात? वाचा काय आहे प्रकरण…

बोलेरो गाड्यांच्या कर्जप्रकरणी राजन तेली यांच्याविरोधात कारवाईला सुरुवात? वाचा काय आहे प्रकरण…

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी निवडणुकीच्या प्रचारासाठी बोलेरो पिकअप गाड्यांचा वापर केला होता. या गाड्यांबाबतची महत्त्वपूर्ण माहिती आता समोर आली आहे. माहिती अधिकाराच्या अंतर्गत समोर आलेल्या माहितीनुसार या प्रकरणी आता नारायण राणे यांचे खंदे समर्थक आणि सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष राजन तेली यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाई सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये निलेश राणे यांच्या प्रचारासाठी बोलेरो गाड्या वापरण्यात आल्या होत्या. बँकेतून कर्ज काढून या गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या, तसेच या गाड्यांचा वापर प्रचारासाठी करण्यात आला होता. पण या गाड्यांसाठी कर्ज मंजूर करून घेण्यासाठी खोटी माहिती देण्यात आल्याचा दावा प्रदीप भालेकर यांनी केला आहे.

या गाड्यांसाठी कर्ज मंजूर करून घेण्यासाठी खोटी नावे, खोटे पत्ते देण्यात आले होते, असा दावा आरटीआय कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी केला आहे. त्यामुळे राजन तेली यांनी अशी अनेक खोटी प्रकरणे केली असण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी राजन तेली यांच्याविरोधात प्रदीप भालेकर यांनी तक्रार दाखल केली असून कारवाई करण्यास सुरुवात झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?
डिसेंबर २०२० मध्ये हे प्रकरण बाहेर पडले होते. त्यावेळी निलेश राणे यांच्या ताफ्यात दिसणाऱ्या १ इन्होवा आणि तब्बल १३ बोलेरो गाड्यांच्या मालकांना १०१ ची नोटीस देण्यात आली होती. २०१४ मध्ये निलेश राणे यांनी काँग्रेस पक्षातून निवडणूक लढवली होती. यावेळी त्यांनी १३ बोलेरो गाड्या वेगवगेळ्या लोकांच्या नावावर खरेदी केल्या होत्या. परंतु या गाड्यांच्या कर्जांची रक्कम थकल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने या गाड्यांच्या मालकांना १०१ च्या नोटीस बजवाल्या होत्या.

हेही वाचा – “त्यांना केवळ कागदावरची शिवसेना मिळाली आहे…”; संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

दरम्यान, या गाड्यांचे मालक हे वेगवेगळे असले तरी या सर्व गाड्या राणे कुटुंबीयांच्या बंगल्याच्या आवारात उभ्या होत्या. तर यातील चार गाड्या या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकांच्या नावावर खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. पण त्यावेळी बँकेच्या संचालक मंडळामधून बाद होऊ नये, यासाठी त्या संचालकांनी स्वतःच्या खात्यातून या गाड्यांचे पैसे भरले होते, अशी माहिती तेव्हा सतीश सावंत यांच्याकडून देण्यात आली होती. तसेच त्यावेळी राजन तेली यांनी देखील या प्रकरणात उडी घेत याप्रकरणातील लोकांवर टीका करण्यास सुरुवात केली होती.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नवी मुंबईच्या डिलरकडून एकाच दिवशी केवळ ७४  हजार रुपये डाऊनपेमेंट करून या बोलेरो गाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. पण त्यावेळी करण्यात आलेली १३ बोलेरो गाड्यांची खरेदी ही सिंधुदुर्ग येथील मालकांचे भिवंडीत दाखवण्यात आलेले पत्ते आणि आचारसंहितेचा भंग या कारणामुळे वादात आली होती. आता राणेंसोबत असलेल्या भाजपानेच त्यावेळी या खरेदीला न्यायालयात त्यावेळी आव्हान दिले होते. पोलिसांनी या बोलेरो गाड्या न्यायालयाचा आदेश येईपर्यंत जप्त देखील केल्या होत्या.

First Published on: March 5, 2023 12:47 PM
Exit mobile version