पालघर विमानतळाच्या विकासासाठी आदित्य ठाकरेंचे ज्योतिरादित्य सिंधियांना पत्र

पालघर विमानतळाच्या विकासासाठी आदित्य ठाकरेंचे ज्योतिरादित्य सिंधियांना पत्र

मुंबई येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. मुंबईच्या जवळ असलेल्या पालघर आणि नवी मुंबईमध्ये विमानतळ नसल्याने मुंबई विमानतळावर ह्याचा सर्व भर येत आहे. तसेच नवी मुंबई येथे देखील विमानतळ तयार होणार आहे, परंतु यासाठी विलंब होत आहे, ज्यामुळे पालघर येथे विमानतळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना आदित्य ठाकरे यांनी यासाठी पाऊले उचलली होती. परंतु सरकार कोसळल्यानंतर हा प्रश्न पुन्हा एकदा मागे पडला. पण आता आदित्य ठाकरे यांनी पालघर येथील विमानतळाच्या विकासासाठी केंद्रीय वाहतूक नागरी मंत्री ज्योतिरादित्यसिंधिया यांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी फर्दापूर येथे विमानतळ व्हावे, अशी मागणी या पत्रातून केली आहे. तर नाशिक आणि पुणे विमानतळांचा देखील उल्लेख केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी ज्योतिरादित्य सिंधिया यांना लिहिलेल्या पत्राची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “मी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहून पालघर जिल्ह्यातील नवीन विमानतळांच्या विकासासाठी विनंता केली आहे. फर्दापूर, पुणे आणि नाशिकच्या विमानतळांसाठी स्पष्टता मागितली आहे. मला आशा आहे की ते या 4 विमानतळांचा विकास करतील, कारण यामुळे विकासाला चालना मिळेल आणि प्रवासी कनेक्टिव्हिटी, उद्योग, कृषी आणि पर्यटन यांना मदत होईल.”

महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असताना लंडनच्या धर्तीवर पालघरमध्ये छोट्या विमानांसाठी सॅटेलाईट विमानतळ उभारण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. पालघरमध्ये विमानतळाची उभारणी करण्याच्या सर्वेक्षणाला गती देण्याचे आदेश देखील महविकास आघाडीमधील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळ विकास कंपनीला दिले होते.

तर 17 वर्षांच्या प्रयत्नानंतर कांदिवलीच्या चारकाेपमधील इमारतीच्या गच्चीवर बनवण्यात आलेल्या स्वदेशी बनावटीच्या विमानाने मेक इन इंडियाच्या सप्ताहात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले हाेते. या विमानाची निर्मिती करणाऱ्या अमाेल यादव याला राज्य सरकारकडून पालघर येथे जमीन देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. तर नुकतेच शिवसेना-भाजप सरकारने थ्रस्ट एअरक्राफ्ट प्रायव्हेट लिमिटेड या व्यावसायिक या कॅप्टन अमोल यादव यांनी स्थापन केलेल्या कंपनीला 19 आसनी विमान तयार करण्यासाठी तब्बल 12.91कोटी रुपये मंजूर केले आहेत.

हेही वाचा – “भाजपने पंकजा मुंडेसह अनेक नेत्यांचा वापर करून…” सुषमा अंधारे बरसल्या

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी पालघर, फर्दापूर, नाशिक आणि पुणे विमानतळांच्या विकासासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पाठवलेल्या पत्राला मंत्री सिंधिया नेमके काय उत्तर देतात? तसेच यांवर काय पाऊले उचलले जातात? हे पाहेव्ही लागणार आहे. कारण पालघर येथील विमानतळाचा विकास झाला तर ह्याचा पालघरच्या विकासामध्ये आणि पर्यटनामध्ये नक्कीच हातभार लागेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on: March 8, 2023 12:52 PM
Exit mobile version