ऑक्सिजन लेवल ३३, सिटी स्कोर २५, तब्बल १२० दिवस कोरोनाशी झुंज देत मिळवला मृत्यूवर विजय

ऑक्सिजन लेवल ३३, सिटी स्कोर २५, तब्बल १२० दिवस कोरोनाशी झुंज देत मिळवला मृत्यूवर विजय

कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत ४ लाख ३८ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या महामारीच्या काळात जीवघेण्या कोरोनामुळे काहींचा उपचारादरम्यान तर काहींचा भीती पोटी मृत्यू झाल्याचे आपण पाहिले आहे. पण या जीवघेण्या कोरोना व्हायरसवर अनेकांनी मात केली आहे. अशा प्रकारे बीड मधल्या एका व्यक्तीची १२० दिवसांची कोरोनासोबतची झुंज यशस्वी झाली आहे. तब्बल ४ महिन्यांनंतर या व्यक्तीने कोरोनावर मात केली असून त्याला आता रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर १२० दिवसांनी कोरोनावर मात केलेल्या बीडमधल्या व्यक्तीची नाव श्रीहरी ढाकणे असे आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील सारोळा गावाचे ते रहिवाशी आहेत. २८ एप्रिलला त्यांना कोरोना झाल्याचे समजले होते. त्यानंतर त्यांना बीडमधील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातील ढाकणे यांचे ऑक्सिजनचे प्रमाण ३३ टक्के आणि एचआर सिटी स्कोर फक्त २५ इतका होता. त्यामुळे त्यांना बायपेप मशीनवर ठेऊन उपचार सुरू केले होते आणि त्यांना प्रत्येक मिनिटाला ४५ लीटर इतका ऑक्सिजन पुरवठा चालू करण्यात आला होता. सर्व औषधोपचार सुरूच होते. तब्बल ७६ दिवस बायपेप मशीनद्वारे त्यांना ऑक्सिजन पुरवठा केला जात होता.

पण काही काळानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊ लागली. डॉक्टरांच्या अथक परिश्रमामुळे तब्बल १२० दिवसांनंतर त्यांची प्रकृती बरी झाली. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


हेही वाचा – कोरोनाविरोधी लसीकरणात सर्वप्रथम शिक्षकांसह शालेय कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्या – WHO


 

First Published on: August 30, 2021 3:40 PM
Exit mobile version