‘IIT’ च्या अहवालानंतर कसारा घाटाचे काम; ऑस्ट्रेलियाच्या भुगर्भ तज्ज्ञांची घेणार मदत

‘IIT’ च्या अहवालानंतर कसारा घाटाचे काम; ऑस्ट्रेलियाच्या भुगर्भ तज्ज्ञांची घेणार मदत

नाशिकहून मुंबईला जोडणारया एकमेव राष्ट्रीय महामार्ग कसारा घाटाच्या रस्त्याच्या खचण्याच्या कारणांचा शोध घेण्याचे काम आय.आय.टी.मुंबई आणि ऑस्ट्रेलियाच्या भूगर्भ शास्त्रज्ञांच्या पथकाने पूर्ण केले आहे.  या पथकाच्या अहवालानंतरच कसारा घाट पूर्ववत होईल, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक दिलीप पाटील यांनी सांगितले. या पथकाचा अहवाल कधीपर्यंत येणार हे स्पष्ट नसल्याने पुढील काही दिवस घाटातील एकाच बाजुने दुहेरी वाहतूक सुरू राहणार आहे.

मुंबई IITच्या तज्ञांसह ऑस्ट्रेलियातील भुगर्भ तज्ज्ञांची मदत

मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग हा सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग असून दोन भागांना जोडण्याचे काम कसारा घाटामुळे होते. यंदा जिल्हयात विक्रमी पावसाची नोंद झाली. त्यात कसारा घाट परिसरात मोठया प्रमाणावर पाऊस होऊन पावसामुळे रस्त्याखाली दाबवण्यात आलेली माती प्रमाणापेक्षा मऊ होऊन सुटली आणि रस्ता खचला अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे मुंबईकडून नाशिककडे येणार्‍या कसारा घाटातील रस्ता काही मीटर खचला. प्रशासनाने लागलीच या मार्गावरील वाहतूक बंद करीत रस्ता दुरस्तीचे काम हाती घेतले. महामार्ग खचण्याची घटना धोकेदायक असून याकरीता रस्ता खचण्याच्या योग्य कारणांचा तसेच त्यावरील उपायांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई आयआयटीच्या तज्ञांसह ऑस्ट्रेलियातील भुगर्भ तज्ज्ञांची मदत घेण्यात आली.

कसारा घाटातील मुंबईहून नाशिककडे येणारा रस्ता खचल्याने हा रस्ता वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. ही बाब विभागाने गांभीर्याने घेतली असून याकरीता आयआयटी मुंबई आणि ऑस्ट्रेलियातील भुगर्भ तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. या पथकाच्या अहवालानंतरच या रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल.

– दिलीप पाटील (अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण)

या पथकाने कसारा घाटात अभ्यास करत रस्ता विविध चाचण्या घेतल्या. आता या पथकामार्फत या रस्त्यावर करावयाच्या उपाययोजनांचा अभ्यास करण्यात येत असून तज्ञांच्या अहवालानंतरच कसारा घाटातील खचलेल्या रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने सांगण्यात आले.


‘महाशिवआघाडी’ नैतिकतेला धरुन नाही; सुप्रीम कोर्टात याचिका
First Published on: November 14, 2019 7:17 PM
Exit mobile version