पक्षातून नाराजी व्यक्त होताच अजित पवारांनी जनसंघाच्या नेत्याबद्दलचे ट्विट केलं डिलीट

पक्षातून नाराजी व्यक्त होताच अजित पवारांनी जनसंघाच्या नेत्याबद्दलचे ट्विट केलं डिलीट

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांची भूमिकेबाबत पुन्हा एकदा संभ्रम निर्माण करणारी घटना घडली आहे. आज दीनदयाळ उपाध्याय यांच्या जंयतीबद्दल त्यांना अभिवादन करणारे ट्विट अजित पवार यांनी केले होते. मात्र पक्षातून ‘समज’ दिल्यानंतर त्यांनी हे ट्विट काही वेळातच डिलीट केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते हे पुरोगामी विचारधारेच्या महापुरुषांव्यतिरीक्त हिंदुत्त्ववादाचा पुरस्कार करणाऱ्या महापुरुषांबद्दल सोशल मीडियावर व्यक्त होत नाहीत. हाच पायंडा अजित पवार यांनी देखील गेली काही वर्ष पाळला होता. मात्र मागच्या काही काळापासून त्यांच्या ट्विटरवर विरोधी विचारांच्या महापुरुषांना जागा मिळाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिलीट केलेले ट्विट

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भाजपच्या आधी असलेल्या भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक नेते होते. त्यांच्या जयंतीनिमित्त भाजपचे अनेक नेते अभिवादन करत असतात. मात्र अजित पवार यांनी पहिल्यांदाच असे ट्विट केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्याचे ट्विट केले आहे. उपमुख्यमंत्री या नात्याने अजित पवार यांनी देखील तेच केले होते. मात्र त्यांच्या ट्विट डिलीट करण्याच्या कृतीमुळे आता विविध चर्चांचे पेव फुटले आहे.

अजित पवार यांच्या ट्विटवर पक्षातूनच नाराजी प्रकट झाल्यानंतर हे ट्विट डिलीट केल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, “हयात नसलेल्या व्यक्तिंबद्दल आपण चांगलं बोललं पाहिजे, ही आपली संस्कृती आहे. परंपरा आहे. त्यानुसार मी ते ट्विट केले होते. परंतू समाजकारण आणि राजकारण करत असताना वरिष्ठांच्या सूचना ऐकाव्या लागतात.”

हे वाचा – अजित पवार यांचा सोशल मीडिया पुत्र पार्थ पवार हाताळतात?

First Published on: September 25, 2020 4:45 PM
Exit mobile version