ईडीकडून क्लिन चिट मिळालेली नाही, अजूनही चौकशी चालू – अजित पवार

ईडीकडून क्लिन चिट मिळालेली नाही, अजूनही चौकशी चालू – अजित पवार

Ajit pawar Cleares his stand on Entre in BJP

राजकीय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास गेल्या काही काळासाठी थंडावला होता. परंतू राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं असून यावरील तपासाला वेग आलाय. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने आरोपपत्र दाखल केलंय. मात्र यामध्ये अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचं नाव माहिती ईडीने दिली आहे. त्यामुळे ईडीने अजित पवारांना क्लीन चीट दिला का? अशी चर्चा सध्या राज्यात सुरू झाली आहे. तर अजित पवार लवकरच भाजपमध्ये जाणार अशी अफवा वेगाने पसरतेय. यावर आता अजित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिलीय.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. मात्र, या आरोपपत्रात विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव नाही. त्यामुळे ईडीने अजित पवार व सुनेत्रा पवार यांना क्लीन चीट दिली का?, अशी चर्चा रंगली आहे. यातच काल शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची सिल्वर ओकवर झालेली बैठक आणि त्यापाठोपाठ आज अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची घेत असलेली भे…हा सर्व घटनाक्रम पाहता भविष्यात मोठी राजकीय घडामोड घडणार का? अशी शंका उपस्थित करण्यात येतेय.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (शिखर बँक) घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी मोठी माहिती दिली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अद्याप क्लीनचिट मिळालेली नाही. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरूच असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं. तसंच माध्यमात पसरलेली बातमी चुकीची असल्याचं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलंय.

यानंतर अजित पवार यांना अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्याबाबत प्रश्न केले असताना यात कसलंही तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. अजित पवार भाजपाबरोबर जाणार ही अफवा राजकीय वर्तुळात अगदी वाऱ्यासारखी पसरली. यावर बोलताना “एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे.”, असं मिश्कीलपणे सांगत अजित पवार यांनी बोलण्याचं टाळलं.

अजित पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात अवकाळी पाऊसाचं संकट आहे. पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे. सरकारने त्यांना लवकरात लवकर मदत केली पाहिजे. यासाठी अजित पवार हे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना देण्यासाठी जाणार आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या आणि शेतकऱ्यांना बारमाही १ लाख रूपयांची मदत जाहीर करा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली.

तसंच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावरही अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केलाय. “कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नेहमी काहीही वक्तव्य करतात. कॉंग्रेसचा प्रश्न त्यांचा अंतर्गत विषय आहे. कॉंग्रेसने त्यांचे अंतर्गत प्रश्न स्वतः सोडवावेत. महाविकास आघाडी टिकावी अशी आमची इच्छा आहे.”, असं अजित पवार म्हणाले. गोंदियातील एपीएमसी युतीवरून आता नाना पटोले आणि अजित पवार यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपासोबत युती केल्यास राष्ट्रवादीही शेतकरीविरोधी होईल, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलंय. त्यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिलीय. “माध्यमांमध्ये वक्तव्य करण्यापेक्षा आधी नेत्यांसोबत चर्चा करा. अशी वक्तव्य केल्यानंतर महाविकास आघाडीत अंतर पडू शकतं. असे प्रकार बंद केले पाहिजेत. जेव्हा महाविकास आघाडीची बैठक होईल, त्यात हा विषय मांडणार आहे.”, असं देखील अजित पवार म्हणाले.

गारपीटीने शेतकऱ्यांचे एक लाख एकरापेक्षा जास्त नुकसान कालपर्यंत झाले होते. अजुनही गारपीठ आणि अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. यामुळे उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान होणार आहे. गारपीट जी होत आहे त्याने अक्षरशः बर्फाचा थर जमा होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मंगळवारी पत्र देऊन प्रतिहेक्टर ५० हजार रुपये आणि एक लाख रुपये प्रति हेक्टर फळबागांसाठी द्या अशी मागणी केली आहे.या संदर्भात आज भेट घेतली असे अजित पवार यांनी सांगितले.

कुणामुळे कुणाच्या जीवाला धोका असेल आणि ज्याने तक्रार दिली असेल तर सरकारने संरक्षण दिले पाहिजे. गंभीर असेल तर स्टेनगनधारी संरक्षण दिले पाहिजे.तुम्हाला तरी वाटते का ?की ,माझ्यामुळे कुणाला धोका आहे. मी कायदा व सुव्यवस्था पाळणारा, संविधान पाळणारा, असा माणूस आहे असे अजित पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले.

First Published on: April 12, 2023 1:38 PM
Exit mobile version