आदित्य ठाकरेंपासून प्रज्ञा सातव यांच्यावर राज्यात हल्ले, सरकार गुंडांना पाठीशी घालतयं  – अजित पवार

आदित्य ठाकरेंपासून प्रज्ञा सातव यांच्यावर राज्यात हल्ले, सरकार गुंडांना पाठीशी घालतयं  – अजित पवार

सोमवारपासून राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आज अधिवेशनातील रणनितीबाबत बैठक घेतली. या बैठकीत सरकारला विविध मुद्यांवर घेरणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. तसेच, यावेळी अजित पवार यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले. (Ajit Pawar Talk On Law and order in the state)

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये अजित पवारांनी विरोधी पक्षनेत्यांविरोधात दाखल होत असलेल्या गुन्ह्यांबाबत चिंता व्यक्त केली. ‘राज्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती गंभीर झाली आहे. नागपूर अधिवेशानंतर काँग्रेसच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. आव्हाडांच्या जावई आणि मुलीला गुंडांकडून ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती’, असे अजित पवार म्हणाले.

‘ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्याच्या गुंडगिरीच्या ऑडिओ आणि व्हिडीओ व्हायरल झाले. अद्याप त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या रॅलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पाळत ठेवली जात असल्याचे स्वत:च अशोक चव्हाण यांनी सांगितले. संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी गुडांना देण्यात आली होती. हसन मुश्रीफ यांच्यावर छापे टाकण्यात आले. विरोधी पक्षाच्या नेत्यांवरही छापे टाकले जात आहेत’, असेही अजित पवार म्हणाले.

‘सत्ताधाऱ्यांचे आमदार शिवीगाळ करत आहेत. परंतु, त्यांच्यावर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. हे आमदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करत आहेत’, असेही यावेळी अजित पवार म्हणाले.


हेही वाचा –  मनसेचा एकच आमदार, त्यांनी पक्षावर दावा केला तर… अजित पवारांचा निवडणूक आयोगाला सवाल

First Published on: February 26, 2023 4:40 PM
Exit mobile version