अजित पवारांचे अंतिम ध्येय म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे…, ठाकरे गटाचा निशाणा

अजित पवारांचे अंतिम ध्येय म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे…, ठाकरे गटाचा निशाणा

मुंबई : शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष (Nationalist Congress Party chief Sharad Pawar) आहेत व पवारांचा पक्ष हा महाराष्ट्र केंद्रित आहे. त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळण्याचा वकुब असलेला नेता निवडताना काळजी घ्यावी लागेल. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राजकारणाचे अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) दिल्लीत असतात. त्यांचा तेथील वावर चांगला आहे. संसदेत त्या उत्तम काम करतात, मात्र भविष्यात त्यांना पक्षाचे नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

शरद पवार यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर राष्ट्रवादीतून विविध प्रतिक्रिया उमटल्या. त्यावर ‘सामना’ दैनिकातील अग्रलेखातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – पवारांच्या राजीनाम्यानंतर कुंपणावरच्या नेत्यांचाच जास्त विलाप, ठाकरे गटाची टिप्पणी

माणसाला जास्त मोह नसावा व कधीतरी थांबायला हवे हे खरेच, पण राजकारणातला मोह कुणाला सुटला? धर्मराज व श्रीकृष्णालाही सुटला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी तर स्वतःला फकीर मानतात. मात्र त्यांनाही राजकीय मोहमायेने जखडून ठेवले आहे. त्यात पवार हे पूर्णवेळ राजकारणी. अशा राजकीय माणसाने राजीनामा देऊन खळबळ उडवावी यामागचे राजकारण काय? याचा शोध काही जण घेऊ लागले तर आश्चर्य नाही. पक्षातील ‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांमुळे निर्माण झालेली अस्वस्थता व त्या अस्वस्थतेतून सहकाऱ्यांनी निवडलेला भाजपाचा मार्ग हे कारण राजीनाम्यात आहे काय? हा पहिला प्रश्न. विरोधी पक्षनेते अजित पवार व त्यांचा गट वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असताना त्यांना अडवण्यासाठी पवारांनी हे पाऊल उचलले आहे काय? हा दुसरा प्रश्न, असे या ठाकरे गटाने म्हटले आहे.

शिवसेना फुटली. चाळीस आमदार सोडून गेले, पण संघटना व पक्ष जागेवरच आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले तरी, जिल्हास्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी यादृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो, असा तर्कही या अग्रलेखात मांडण्यात आला आहे.

शरद पवार यांनी राजीनामा देताच त्यांची मनधरणी सुरू झाली हे स्पष्ट दिसते. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी नेते करीत असताना अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली. ‘पवारसाहेबांनी राजीनामा दिला. ते मागे घेणार नाहीत. त्यांच्या संमतीने दुसरा अध्यक्ष निवडू,’ असे अजित पवार म्हणतात. हा दुसरा अध्यक्ष कोण? असा प्रश्नही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

First Published on: May 4, 2023 8:14 AM
Exit mobile version