शरद पवारांचा राजीनामा मागे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…

शरद पवारांचा राजीनामा मागे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…

मुंबई | “राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद गावोगावी व प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा” असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करत केले आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्षपद पुन्हा स्वीकारल्याचे पत्रकार परिषदेतून सांगितले. ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदी कोण विराजमान होणार, यावरून अनेक नावावर चर्चा रंगल्या होत्या. परंतु, शरद पवार हेच पुन्हा पक्षाचे अध्यक्षपदी विराजमान झाल्याचे त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले.

जयंत पाटील ट्वीटमध्ये म्हणाले, “आदरणीय शरद पवारसाहेब यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद गावोगावी व प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा असे आवाहन मी करत आहे,” असे म्हटले आहे. या ट्वीटमध्ये जयंत पाटील यांनी NCPspeaks ला टॅग केले आहे.

 

शरद पवार निवृत्तीचा निर्णय मागे घेताना म्हणाले

लोक माझे सांगाती’ ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती.

परंतु मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्त पदाधिकारी व माझे सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली.

हेही वाचा – शरद पवारांचा राजीनामा मंजूर न करण्याचं कारण काय? जयंत पाटलांचा मोठा खुलासा

लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने भी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

 

 

First Published on: May 5, 2023 7:41 PM
Exit mobile version