खातेवाटप, महामंडळांसह पालकमंत्रीही ठरले, पण शरद पवारांनी आयत्या वेळी कच खाल्ली

खातेवाटप, महामंडळांसह पालकमंत्रीही ठरले, पण शरद पवारांनी आयत्या वेळी कच खाल्ली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच राज्यात भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या दाव्याची खातरजमा करण्यासाठी आपलं महानगरने भाजपच्या ज्येष्ठ नेत्याशी संवाद साधला. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबत झालेल्या चर्चेत भाजप-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करताना कुणाला किती आणि कुठली खाती द्यायची, कुणाला किती महामंडळे मिळतील, हे ठरले होते. पालकमंत्रीपदावरूनच मंत्र्यांमध्ये सर्वाधिक वाद होतात. त्यामुळे पालकमंत्रीपदाचे वाटप आधी व्हावे आणि त्यातही पुण्याचे पालकमंत्रीपद आम्हाला हवे, अशी शरद पवारांची मागणी होती. त्यावर पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय केंद्र पातळीवरच होईल, असे आम्ही त्यांना सांगितल्यानंतरही ऐनवेळी शरद पवार यांनी कच खाल्ली. त्यामुळेच भाजप-राष्ट्रवादीचे सरकार अवघ्या 80 तासांत कोसळले, असा दुजोरा भाजपमधील या ज्येष्ठ नेत्याने मंगळवारी ‘आपलं महानगर’कडे केला.

फडणवीस यांचा दावा पवार यांनी फेटाळून लावला तरी, राज्याच्या राजकारणात फडणवीस यांच्या शब्दाला असलेले महत्त्व तर दुसरीकडे पवार यांची ‘धूर्त राजकारणी’ अशी प्रतिमा सर्वांनाच ठाऊक आहे. म्हणूनच नेमके खरे कोण आणि खोटे कोण बोलत आहे, यावर खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच व्हायला हवा. राज्यात आम्हाला स्थिर सरकार हवे म्हणून राष्ट्रवादीनेच भाजपला सत्ता स्थापनेचा प्रस्ताव दिल्याचे फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केल्याकडे या नेत्याने लक्ष वेधले. फडणवीसांचा निकटवर्तीय अशी या नेत्याची ओळख असून सत्तास्थापनेच्या डावपेचात या नेत्याचा समावेश होता.

ज्यावेळी शिवसेना आणि काँग्रेससोबत मिळून राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीची जुळवाजुळव करीत होती. याचवेळी भाजप-राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेची समांतर बोलणीही सुरू होती. विशेष म्हणजे, या वाटाघाटीच्या बोलणीनंतर राष्ट्रपती राजवटीच्या काळात राष्ट्रवादीच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जे निवेदन देण्यात आले, ते निवेदन देवेंद्र फडणवीस यांनीच ड्राफ्ट करून दिले होते. शरद पवार यांनी भाजपसोबत सत्तास्थापनेची सर्व बोलणी करूनही ते पुढे न आल्याने भाजप-राष्ट्रवादीचे सरकार औटघटकेचे ठरले. शरद पवार या वाटाघाटीवर ठाम राहिले असते तर, राज्यात आजघडीला वेगळे चित्र असते, असेही या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने ‘आपलं महानगर’ला सांगितले

फडणवीसांना पवारांचा सहारा
देवेंद्र फडणवीसांना सध्या शरद पवारांचा सहारा आहे. बिचार्‍या फडणवीस यांना त्यांच्या पक्षात बाकीचे लोक हलायला जागा देत नसतील. त्यामुळे ते शरद पवारांचे नाव घेऊन दररोज काहीतरी नवीन वावड्या उठवतात. सहा-सहा खाती त्यांच्याकडे आहेत. गृहमंत्री, ऊर्जामंत्री म्हणून ते अपयशी ठरले आहेत. ज्या व्यक्तीकडे अर्थमंत्रीपद आहे आणि ज्याच्यावर अर्थसंकल्पाची जबाबदारी आहे, त्या व्यक्तीला अशा कंड्या पिकवायला वेळ कसा मिळतो? त्यामुळे मला आपल्या राज्याची चिंता आहे.
सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस.

First Published on: February 14, 2023 11:30 PM
Exit mobile version