डॉ. अमोल कोल्हे रागात आणि भाजपचे अवधूत वाघ जोशात

डॉ. अमोल कोल्हे रागात आणि भाजपचे अवधूत वाघ जोशात

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, अमोल कोल्हे क्रोधात; भाजपचे वाघ जोशात

‘ईडीचा कुटील डाव समजायला माणसे काही वेडे नाहीत. त्यामुळे त्याचा करारा जवाब मिळणार’, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधातही ईडीने गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारणात मोठा भूकंप आला आहे. ईडीने केलेल्या कारवाईवर राज्यभरातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत. काही कार्यकर्त्यांनी तर ईडीच्या विरोधात आंदोलने देखील केले आहेत. बुधवारी राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी मुंबईच्या ईडी ऑफिसच्या बाहेर आंदोलन केले. त्यामुळे हा विषय आणखी तापत चालला आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असताना भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटरवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना टोला लगावला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण आता कोणत्या दिशेला जाईल? याचा अंदाज बांधणे कठीण बनले आहे.


हेही वाचा – ..उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांसमोरच दिलं नेत्याला शिवसेनाप्रवेशाचं आमंत्रण


‘करारा जवाब मिलेगा’; अमोल कोल्हे यांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

राज्य सहकारी बँकेच्या कर्जवाटपात तब्बल २५ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे, असा अहवाल नाबार्डने दिला होता. या अहवालानंतर सुरेंद्र अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी अजित पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आता शरद पवार यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारची कारवाई झाल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी ईडीच्या विरोधात आंदोलन पुकारले. याशिवाय अमोल कोल्हे यांनी देखील ट्विटरवर मुख्यमंत्र्यांना या गोष्टींचा करारा जवाब दिला जाईल, असा इशारा दिला.

अवधूत वाघ यांचा खोचक चिमटा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील काही मातब्बर नेत्यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षात प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षावर मोठे संकट ओढावले. या सर्व घडामोडीनंतरही शरद पवार यांनी ‘एकला चलो रे’ असा नारा देत राज्यव्यापी दौऱ्याला सुरुवात केली. पवारांच्या या दौऱ्याला पक्षातील तरुण कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता. अशातच अचानक ईडीने शरद पवारांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची बातमी मंगळवारी संध्याकाळी सर्वत्र पसरली. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी ‘बारामती बंद’ची हाक दिली. यावर भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खोचक चिमटा खोडला. ‘बारामती बंद करण्याऐवजी आपल्या करामती बंद करा’, असे अवधूत वाघ म्हणाले.

बुधवारी राज्यभरात शरद पवारांच्या समर्थनार्थ अनेक युवा कार्यकर्त्यांनी आंदोलने केले. याशिवाय भाजप सरकार ईडीचे हत्यार वापरुन विरोधकांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे.

First Published on: September 25, 2019 4:33 PM
Exit mobile version