प्रियांका गांधींच्या राजकारण प्रवेशावर, अमृता फडणवीस म्हणाल्या…

प्रियांका गांधींच्या राजकारण प्रवेशावर, अमृता फडणवीस म्हणाल्या…

प्रियंका गांधी यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकांपूर्वी राजकारणात प्रवेश केला आहे. दरम्यान, प्रियांका यांच्या राजकारणातील प्रवेशावर भाजपाकडून जोरदार टीकादेखील होते आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले असून, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही याबाबत आपले मत नोंदवले आहे. मात्र, अमृता फडणवीस यांचं मत टीका करणाऱ्या भाजप नेत्यांपेक्षा वेगळं आहे. ‘प्रियांका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाचं स्वागत आहे’, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. इतंकच नाही तर त्यांनी प्रियंका गांधी यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. बुधवारी (कालच) प्रियंका गांधी यांच्या राजकारण प्रवेशाची काँग्रेसने अधिकृत घोषणा केली. या घोषणेमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. या मुद्दयावरुन काही भाजप नेत्यांनी टीकेची झोडही उठवली. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

प्रियंका गांधी यांना काँग्रेसकडून सरचिटणीस पद देण्यात आले आहे. पूर्व उत्तर प्रदेशच्या त्या प्रभारी असणार आहेत. या थेट प्रवेशानंतर राहुल गांधींना एरवी पडद्यामागून सहकार्य करणाऱ्या प्रियंका गांधी आता प्रत्यक्षात सर्वांसमोर आल्या आहेत. एकीकडे भाजप घराण्याकडून या मुद्द्याला धरुन गांधी घरण्यावर आरोप होत आहेत. अशातच अमृता फडणवीस यांनी मात्र प्रियांका गांधींचे राजकारणात स्वागत केले आहे. ‘एखाद्या महिलेने राजकारणात प्रवेश करणे हे सगळ्याच महिलांच्या हिताचे असते. प्रियंका गांधी यांना राजकारणात आणणे न आणणे हा काँग्रेसचा निर्णय आहे. मात्र, मी त्यांना त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देते’, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली आहे. न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीशी बोलताना अमृता फडणवीस यांनी या भावना व्यक्त केल्या. ‘प्रियंका गांधी राजकारणात सक्रिय झाल्या असल्या तरी भाजपावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही’, असंही अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.


वाचा : प्रियांकांच्या आगमनाने देशातील राजकारण बदलेल – संजय राऊत

First Published on: January 24, 2019 7:40 PM
Exit mobile version