अंधेरीतील पोटनिवडणुकीत ऐतिहासिक घडामोड, पहिल्यांदाच…, निवडणूक आयोगाने दिली माहिती

अंधेरीतील पोटनिवडणुकीत ऐतिहासिक घडामोड, पहिल्यांदाच…, निवडणूक आयोगाने दिली माहिती

मुंबई – मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत एकूण २ लाख ७१ हजार ५०२ मतदारांपैकी ३१.७४ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावत मतदान केले. मात्र भारताच्या निवडणूक इतिहासात प्रथमच या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणूक आयोगाने शारिरीक आजाराने पीडित व ८० किंवा त्यापेक्षाही जास्त वयस्कर मतदारांसाठी ‘घरून मतदान’चा उपक्रम यशस्वीपणे राबविला. त्यामुळे निवडणूक विभागाचे सर्वत्र विशेष कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा -अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ३१.७४ टक्के मतदान पूर्ण, ६ नोव्हेंबरला होणार मतमोजणी

वास्तविक, या मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांची यादी ७ हजारांपर्यंत होती. निवडणूक विभागाने केलेल्या आवाहनाला ४३० ज्येष्ठ नागरिक मतदारांनी घरूनच मतदानास प्रतिसाद दिला होता. मात्र प्रत्यक्षात त्यापैकी ३९१ मतदारांनी (९१ टक्के) घरूनच मतपत्रिकेद्वारे आपला गुप्त मतदानाचा हक्क बजावत मतदान केले. ज्येष्ठ नागरिकांनी केलेले हे मतदान भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सीलबंद करून जमा करण्यात आले आहे.

हेही वाचा – गुजरात की दिल्ली? आप कुठे लक्ष देणार? अरविंद केजरीवाल संभ्रमात

विशेष म्हणजे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार व मुंबई उपनगर जिल्ह्याच्या ‘जिल्हा निवडणूक अधिकारी’ तथा जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘घरूनच मतदान’ हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ‘अंधेरी पूर्व’ मतदार संघातील ४३० मतदारांनी ‘घरून मतदान’ या पर्यायास सहमती दर्शविली होती. यापैकी तब्बल ९१ टक्के मतदारांनी म्हणजेच ३९२ मतदारांनी ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत ‘घरून मतदान’ करून आपले लोकशाही विषयक कर्तव्य पार पाडले आहे, अशी माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

घरीच तात्पुरता मतदान केंद्र, मतपत्रिका

या निवडणुकीत ४३० ज्येष्ठ मतदारांनी ‘घरून मतदान’ या पर्यायासाठी सहमती नोंदविली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या ३ दिवसांच्या कालावधी दरम्यान ‘अंधेरी पूर्व’ मतदारसंघातील अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेली ७ व्यक्तींचा चमू या ज्येष्ठ नागरिकांच्या घरी गेलीा. घरी पोहचल्यानंतर या चमूद्वारे तात्पुरते मतदान केंद्र उभारण्यात आले. या तात्पुरत्या मतदान केंद्रात घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्तीने नाव नोंदविले आहे, त्या व्यक्तीने निवडणूक विभागाने उपलब्ध केलेल्या मतपत्रिकेचा वापर करून आपले मत हे ‘गुप्त मतदान’ पद्धतीने नोंदविले. घरून मतदान प्रक्रियेला पहिल्याच प्रयत्नांत ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद लाभला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली.

First Published on: November 4, 2022 7:28 PM
Exit mobile version