घरताज्या घडामोडीअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ३१.७४ टक्के मतदान पूर्ण, ६ नोव्हेंबरला होणार...

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत ३१.७४ टक्के मतदान पूर्ण, ६ नोव्हेंबरला होणार मतमोजणी

Subscribe

महाराष्ट्र विधानसभेच्या ‘१६६ – अंधेरी पूर्व’ या मुंबई उपनगर जिल्ह्याच्या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या कालावधीत मतदान निर्विघ्नपणे पार पडले. या निवडणुकीत १४ पात्र उमेदवारांपैकी भाजप उमेदवार मुरजी पटेल यांसह अन्य सहा उमेदवार अशा एकूण सात उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे फक्त सात उमेदवार निवडणूक रिंगणात होते. साहजिकच मतदानावर काहीसा परिणाम झाला. त्यानुसार, सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत एकूण ३१.७४ टक्के मतदान झाले आहे. तर ६८.२६ टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली असल्याचे समोर आले आहे.

मतदानानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदान यंत्र सील केले व सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. आता ६ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदान यंत्रात निवडणूक रिंगणातील सात उमेदवारांचे भविष्य दडलेले आहे. मतमोजणी पूर्ण होऊन निकाल घोषित झाल्यावर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत.

- Advertisement -

या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने २५६ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था केली होती. तसेच, चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या निवडणुकीकरिता गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानास शांततेत सुरुवात झाली होती. मात्र सकाळपासूनच मतदारांचा उत्साह कमी होता. त्यामुळे सकाळी ११ वाजेपर्यंत फक्त ९.७२ टक्के इतकेच मतदान झाले होते. दुपारी १ वाजेपर्यंत १६.८९ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी ३ वाजेपर्यंत २२.८५ टक्के मतदान झाले होते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत २८.७७ टक्के मतदान झाले. तर शेवटच्या एका तासात म्हणजे सायंकाळी ६ वाजेपर्यंत एकूण ३१.७४ टक्के मतदान झाले. या मतदार संघातील मतदारांची एकूण संख्या ही २ लाख ७१ हजार ५०२ एवढी होती. यासंदर्भातील माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

 शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांच्यासह ७ उमेदवार निवडणूक रिंगणात

- Advertisement -

या पोटनिवडणूकीसाठी एकूण १४ उमेदवार अर्ज छाननी प्रक्रियेत पात्र ठरले होते. त्यापैकी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके व भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात प्रमुख लढत होणार होती. मात्र काही राजकीय घडामोडींमुळे व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दबाव आणल्याने मुरजी पटेल यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज अचानकपणे मागे घेतला.

त्याचबरोबर आणखीन सहा उमेदवारांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे अखेर निवडणूक रिंगणात फक्त ७ उमेदवार शिल्लक राहिल्याने त्यांच्यात ही लढत झाली. त्यातही प्रमुख दावेदार शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना मानले जात आहे. मात्र राजकारणात कधीही व कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते. त्यामुळे जोपर्यंत अंतिम निकाल जाहीर होत नाही तोपर्यन्त कोणाचाही प्रबळ दावा शंभर टक्के खरा मानणे कठीण आहे.

निवडणुकीतील सात उमेदवार :

१) श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे)

२) श्री. बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी – पीपल्स)

३) श्री. मनोज नायक (राईट टू रिकॉल पार्टी)

४) श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)

५)श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)

६) श्री. मिलिंद कांबळे (अपक्ष)

७) श्री. राजेश त्रिपाठी (अपक्ष)


हेही वाचा : ३०० युनिटपर्यंतचे वीजबील मोफत देणार, गुजरातच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच काँग्रेसची मोठी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -