यंदाची आंगणेवाडीची यात्रा २५ फेब्रुवारीला

यंदाची आंगणेवाडीची यात्रा २५ फेब्रुवारीला

नवसाला पावणारी अशी ख्याती सर्वदूर पसरलेल्या आणि लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी (मालवण) येथील भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाची तारीख निश्चित झाली आहे. देवीने कौल दिल्यानुसार सोमवार २५ फेब्रुवारी २०१९ ही तारीख निश्चित करण्यात आली. आज, १८ डिसेंबर रोजी सकाळी आंगणे कुटुंबीय यांची मंदिरात बैठक झाल्यानंतर यात्रेची तारीख जाहीर करण्यात आली. कोकणातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील देवी भराडी मातेच्या वार्षिक जत्रोत्सवात महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.

जत्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी जमते 

मालवणमधील भराडी देवी ही अनेकांची कुलदैवत आहे. दरवर्षी भराडी देवीचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक मालवणमध्ये येतात. नेहमीप्रमाणे यंदाही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावर्षी भाविकांची संख्या १० लाखांहून अधिक असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच गोवा आणि कर्नाटकमधील भाविकही मालवणमधील भराडी देवीच्या जत्रेला येतात. देवीच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या लांबच्या लांब रांगा लागतात. महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेते, मराठी अभिनेते, अभिनेत्री या यात्रोत्सवासाठी आवर्जून हजेरी लावतात. भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस, होमगार्डचे जवान तैनात असणार आहेत.

First Published on: December 18, 2018 3:18 PM
Exit mobile version