एकीकडे शिवसेनेची घटना मानायची आणि दुसरीकडे विरोध करायचा; अनिल देसाईंचा शिंदे गटावर हल्लाबोल

एकीकडे शिवसेनेची घटना मानायची आणि दुसरीकडे विरोध करायचा; अनिल देसाईंचा शिंदे गटावर हल्लाबोल

Anil Desai

शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचे या मुद्द्यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान वकिल कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडत असताना मागील सुनावणीवेळी शिंदे गटाने मांडलेले सर्व दावे खोडून काढले. याबाबत ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी माहिती दिली. तसेच, समोरच्या गटाकडून एकीकडे शिवसेनेची घटना मान्य केली जात आहे तर, दुसरीकडे घटनेला विरोध केला जातोय, असेही अनिल देसाई यांनी म्हटले. (Anil Desai Slams Shinde Group Shiv Sena Uddhav Thackeray Kapil Sibbal Election Commission)

निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाल्यानंतर अनिल देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अनिल देसाई यांनी सांगितले की, “आज निवडणूक आयोगासमोर झालेल्या सुनावणीत आमचे वकील कपिल सिब्बल यांनी समोरच्या गटाने मागच्या सुनावणीत मांडलेले सर्व दावे चुकीचे असल्याचे दाखवत खोडून काढले. तसेच, एक संघटना दोन गटांत विभागलेली असताना त्या संघटनेबाबतचे मुळापासूनचे सर्व मुद्दे पुरावे देत कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. त्यानंतर निवडणूक आयोगानेही त्याची नोंद घेतली”.

याशिवाय, “मागच्या सुनावणीत समोरच्या पक्षाने (शिंदे गट) जे दावे केले होते ते बघता असे वाटतं की, समोरच्या गटाकडून एकीकडे शिवसेनेची घटना मान्य केली जात आहे तर, दुसरीकडे घटनेला विरोध केला जातोय. शिवाय, त्यांनी सादर केलेल्या सर्व कागदपत्रांमध्ये त्रुटी आहेत. त्यामुळे आता पुढील सुनावणी येत्या शुक्रवारी होणार असून त्यावेळी निवडणूक आयोग योग्य काय तो निर्णय घेईल”, असेही अनिल देसाई यांनी सांगितले.

काय म्हणाले कपिल सिब्बल?

केंद्रीय निवडणूक आयोगासमोर सुरू असलेल्या सुनावणीत वकील कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत. यावेळी “उद्धव ठाकरे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. शिवसेनेत फूट पडलेली नाही. जी फूट पडल्याचे भासवले जातेय ती एक कल्पना आहे” असा दावा कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसेच, “मागील सुनावणीत एकनाथ शिंदे यांच्या गटाने जे दावे केले होते, ते सर्व दावे आज कपिल सिब्बल यांनी खोडून काढले आहेत. तसेच, मूळ शिवसेना आम्हीच आहोत आणि शिवसेनेत जी काही फूट पडल्याचे बोलले जाते आहे. त्याचा पक्षावर काहीही परिणाम झालेला नाही. ही फूट मुळीच ग्राह्य धरू नये”, असेही कपिल सिब्बल यांनी म्हटले.


हेही वाचा – ठाकरे vs शिंदे : शिवसेना ठाकरेंचीच, ‘त्या’ फुटीला काहीच अर्थ नाही; कपिल सिब्बल यांचा दावा

First Published on: January 17, 2023 6:24 PM
Exit mobile version